नाशिक,
Honey Villages सातारा जिल्ह्यातील मांघर आणि कोल्हापूरमधील पाटगावमध्ये यशस्वीपणे राबवलेल्या मधमाशी पालन प्रयोगानंतर आता नाशिक जिल्हा देखील राज्याच्या ‘मधाचे गाव’ योजनेत सहभागी होत आहे. शासनाने जाहीर केलेल्या राज्यातील पहिल्या दहा मधाच्या गावांमध्ये नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या निसर्गरम्य चाकोरे गावाचा समावेश करण्यात आला आहे.
सामूहिक मधुबन
मधाचे गाव योजनेंतर्गत चाकोरे गावात सातेरी मधमाश्यांच्या पेट्यांचे सामूहिक मधुबन उभारण्यात येणार आहे. या योजनेची सुरुवात प्रायोगिक तत्त्वावर मांघर आणि पाटगाव येथे झाली होती. या दोन गावांमध्ये मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर महाराष्ट्रातील नैसर्गिक साधनसंपत्तीचा विचार करून, मधोत्पादनासाठी अनुकूल असलेल्या गावांमध्ये हा उपक्रम राबवण्याची संकल्पना पुढे आली.महाराष्ट्राला मधाच्या क्षेत्रात देशातील अग्रणी राज्य बनवण्याची संधी म्हणून ओळखून या योजनेला शासनाने मान्यता दिली आहे. योजनेसाठी राज्यातील वनसंपदा, फुलशेती, पिकांचे उत्पादन आणि नैसर्गिक फुलोऱ्याचा सखोल अभ्यास करून सुरुवातीला दहा गावांची निवड करण्यात आली आहे.
योजनेचा उद्देश फक्त Honey Villages मध काढण्यापुरता मर्यादित नसून मधमाश्यांसाठी पोषक वृक्षांची लागवड, मध संकलन, प्रक्रिया, दर्जेदार पॅकिंग आणि प्रभावी ब्रँडिंगपर्यंतची संपूर्ण साखळी तयार करणे हा आहे. याद्वारे मधासोबतच मधमाशांपासून मिळणाऱ्या इतर उपपदार्थांची विक्री करून ग्रामीण भागातील तरुणांना स्थानिक पातळीवर शाश्वत रोजगार उपलब्ध करून देण्याची योजना आहे.त्र्यंबकेश्वरमधील चाकोरे गाव निसर्गाच्या सानिध्यात असून पर्यटनासाठी अतिशय पोषक आहे. या वैशिष्ट्याचा विचार करून गावात सामूहिक सुविधा केंद्र, मधमाशी पालन माहिती दालन, ‘मधाचे गाव’ दर्शनी कमान, सेल्फी पॉईंट आणि मधुबन उभारण्यासाठी शासनाकडून ४०.१२ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या माध्यमातून या योजनेची अंमलबजावणी होत असून, गावातील २५ लाभार्थ्यांना तांत्रिक प्रशिक्षण देण्यात आले आहे, असे प्रभारी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी वैशाली भामरे यांनी सांगितले.
९० टक्के अनुदान...
योजनेत लाभार्थ्यांना ९० टक्के अनुदान मिळणार असून, फक्त १० टक्के स्वतःचा हिस्सा भरून मधपालकांना सातेरी मधमाश्यांच्या १२५ वसाहती, मधपेट्या आणि आधुनिक यंत्रसामग्री पुरवली जाणार आहे. याशिवाय गावात २५ ते ५० पेट्यांचे सामूहिक केंद्र उभारले जाईल, जिथे शेतकरी, विद्यार्थी आणि पर्यटक प्रत्यक्ष प्रशिक्षण घेऊ शकतील.मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे व माजी संचालक दिग्विजय पाटील यांनी प्रकल्प स्थळांची पाहणी केली असून, विविध तज्ज्ञ व शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली काम जलद गतीने सुरू आहे. या उपक्रमात गावाचे सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक आणि ग्रामस्थांनी उत्साहात सहभाग नोंदवला आहे. Honey Villages आशा व्यक्त केली जाते की चाकोरे गाव लवकरच मधाच्या गोडवा पसरवणारे गाव म्हणून ओळखले जाईल.