महायुतीच्या मिरवणुकीने शहर दणाणले

    दिनांक :06-Feb-2026
Total Views |
धुमधडाक्यात विजयोत्सव
 
अमरावती, 
Election of Mayor and Deputy Mayor महापौर व उपमहापौराची निवडणुक जिंकल्यानंतर भाजपा, युवा स्वाभिमान, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या महायुतीच्या घटक पक्षाने शहरात विजयी मिरवणूक काढली. ढोलताशांचा निनाद, फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण करत धुमधडाक्यात विजयोत्सव साजरा करण्यात आला. या मिरवणुकीने शहर दणाणले.
 
 
mahopor
 
मनपा सभागृहात महापौर व उपमहापौर निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना महायुतीचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने महापालिकेच्या परिसरात एकत्र आले होते. त्यात भाजपाचे आमदार संजय कुटे, शहराध्यक्ष डॉ. नितीन धांडे, निवडणूक प्रमुख जयंत डेहनकर, प्रवक्ता शिवराय कुळकर्णी, तुषार भारतीय, प्रा. दिनेश सूर्यवंशी, निवेदिता चौधरी, नानकराम नेभणानी यांच्यासह अन्य पदाधिकारी होते. श्रीचंद तेजवानी व सचिन भेंडे यांच्या विजयाची घोषणा होताच ढोलताशे वाजायला लागले. फटाक्यांची आतषबाजी सुरू झाली. अनेक कार्यकर्ते नाचायला लागले. इकडे सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी आशिष येरेकर, आयुक्त सौम्या शर्मा यांनी पुष्पगुच्छ देऊन महापौर व उपमहापौराचे अभिनंदन केले. त्यानंतर भाजपा गटनेता चेतन गांवडे यांनी नवनिर्वाचीत उपरोक्त दोघांचाही अभिनंदनाचा ठराव मांडला. त्याला राष्ट्रवादीचे मनीष बाजाज यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर शिवसेनेचे डॉ. राजेंद्र तायडे, युवा स्वाभिमानचे प्रा. प्रशांत वानखडे, काँग्रेसचे बबलू शेखावत, विलास इंगोले, एमआयएमचे हाजी इमरान व इतरांनी महापौर व उपमहापौराचे अभिनंदन केले. सभागृह स्थगित झाल्यानंतर सर्व सदस्यांनी टप्प्याटप्प्याने दोघांचेही अभिनंदन केले. भाजपा व युवा स्वाभिमानच्या सदस्यांनी भगवे फेटे बांधले होते.
 
 
Election of Mayor and Deputy Mayor  श्रीचंद तेजवानी व सचिन भेंडे सदस्य व कार्यकर्त्यांच्या गराड्यात खाली आल्यानंतर मिरवणुकीला सुरूवात झाली. दोघेही दोन वेगवेगळ्या खुल्या गाडीत विराजमान झाले. महापौरांसोबत शहराध्यक्ष डॉ. नितीन धांडे, गटनेता चेतन गांवडे, जयंत डेहनकर, शिवराय कुळकर्णी, चेतन पवार, सुनील काळे, बादल कुळकर्णी, सुनील खराटे व अन्य होते. उपमहापौरांसोबत सुनील राणा, संजय हिंगासपुरे, प्रशांत वानखडे, विनोद गुहे व अन्य होते. वाजत गाजत या दोन्ही मिरवणुका मार्गस्थ झाल्या. राजकमल, श्याम, बापट, जयस्तंभ चौ मार्गे भाजपा व युवा स्वाभिमान कार्यालयाकडे आल्या. मार्गात महापौरांचे ठिकठिकाणी व्यापारी बंधूंनी व नागरिकांनी शाल व हार घालून स्वागत केले. फटाके फोडले, गुलाल उधळला. रॅलीत दोन्ही पक्षाचे नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येन सहभागी झाले होते.
 
 

महापौर व उपमहापौरांचे अभिनंदन करताना काँग्रेसचे नेते बबलू शेखावत यांनी सभागृहात लावण्यात आलेला डॉ. आंबेडकरांचा फोटो एका बाजुने झाला आहे. तो सभापतींच्या आसनाच्यावर मधोमध लावावा. मनपाचे मानचिन्ह दुसर्‍या बाजुने घ्यावे, अशी सूचना केली. पुढच्या सभेत हा बदल व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.