शेतकऱ्यांची कमाल ४ महिन्यांत कमवले १० लाख रुपये

भोर तालुक्यातील चर्चेचा विषय!

    दिनांक :06-Feb-2026
Total Views |
पुणे
Farmer Rajendra Mahadev Sonawane योग्य नियोजन, आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि कुटुंबाच्या मेहनतीच्या जोरावर भोर तालुक्यातील शेतकरी राजेंद्र महादेव सोनवणे यांनी अवघ्या एक एकर क्षेत्रात काळ्या भरिती वांग्याचे तब्बल ३० टन उत्पादन घेत सुमारे १० लाख रुपयांचा नफा कमावला आहे. चार महिन्यांत मिळालेल्या या उत्पन्नामुळे सोनवणे यांची शेती परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे.
 

Farmer Rajendra Mahadev Sonawane 
गेल्या तीन वर्षांपासून वांग्याची यशस्वी लागवड करणारे राजेंद्र सोनवणे यंदाचा हंगाम त्यांच्यासाठी सर्वाधिक लाभदायक ठरला असल्याचे सांगतात. ऑक्टोबर ते जानेवारी या चार महिन्यांमध्ये त्यांनी आतापर्यंत १६ वेळा वांग्याची तोड घेतली असून या कालावधीत सुमारे ३० टन वांग्यांची विक्री झाली आहे. शेतकऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे, झाडांवर अजूनही भरघोस फळधारणा सुरू आहे आणि मार्च महिन्यापर्यंत वांग्याची तोड सुरू राहणार आहे.
 
 
योग्य निवड योग्य वापर!
उत्पादन वाढीमागे Farmer Rajendra Mahadev Sonawane  बियाण्यांची योग्य निवड हा महत्त्वाचा घटक ठरला आहे. सोनवणे यांनी इंझा कंपनीच्या ‘बारटोक’ जातीचे काळे भरिती वांगे लागवडीसाठी वापरली. एक हजार बियाणे असलेली एक मुडी साडेचार हजार रुपयांना खरेदी करण्यात आली. एकूण तीन हजार बियाणांसाठी सुमारे १५ हजार रुपयांचा खर्च झाला, तर नर्सरीमध्ये रोपे तयार करण्यासाठी प्रत्येक रोपामागे सुमारे १ रुपया २० पैसे खर्च झाला.सोनवणे यांनी लागवडीपूर्वी शास्त्रोक्त पद्धतीने बेड तयार केले. निंबोळी पेंड, वसाडोस आणि कोंबडी खताच्या सुमारे ५० बॅग्सचा वापर केला. ऑगस्ट महिन्यात मलचिंग पेपर टाकून पाच बाय तीन फूट अंतरावर रोपांची लागवड करण्यात आली. मलचिंगमुळे तण नियंत्रण, जमिनीत ओलावा टिकून राहणे आणि उत्पादनात वाढ होण्यास मदत झाली. लागवडीनंतर फक्त दोन महिन्यांत ऑक्टोबरमध्ये पहिली तोड झाली.
औषध फवारणीचे काटेकोर नियोजन
पीक संरक्षणासाठी औषध फवारणीचे काटेकोर नियोजन करण्यात आले असून इकोला अ‍ॅग्रो कंपनीचे अर्जुन शिंदे यांनी याबाबत मार्गदर्शन केले. तसेच बियाणे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वेळोवेळी शेतावर भेट देऊन पिकाची पाहणी केली. आतापर्यंत औषध फवारणीसाठी सुमारे १ लाख ९० हजार रुपयांचा खर्च झाला आहे.राजेंद्र सोनवणे हे शेतीची रोजची देखभाल पत्नी पूनम आणि आई-वडिलांच्या मदतीने करतात. पाणी व्यवस्थापन, खतांचा वापर आणि पिकाचे निरीक्षण हे कुटुंब एकत्रितपणे करत असल्याने काम सुलभ होते. मात्र वांग्याची तोड करताना मजुरांची मदत घेणे आवश्यक ठरते. या यशस्वी प्रयोगामुळे भोर तालुक्यातील इतर शेतकऱ्यांनाही वांग्याच्या लागवडीसाठी प्रोत्साहन मिळत आहे.