नवी दिल्ली,
Mistakes in UPSC notification देशातील सर्वाधिक प्रतिष्ठित सेवा, जसे की भारतीय प्रशासन सेवा (IAS), भारतीय पोलीस सेवा (IPS) आणि भारतीय वन सेवा (IFS) यांमध्ये भरती घेणाऱ्या केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) जारी केलेल्या नोटिफिकेशनमधील अनेक चुका चर्चेचा विषय बनल्या आहेत. आयोगाने ४ फेब्रुवारी रोजी सिव्हील सर्व्हिस परीक्षा (CSE) आणि भारतीय वन सेवा (IFS) परीक्षा यांचे नोटिफिकेशन प्रसिद्ध केले, परंतु या नोटिफिकेशनमध्ये अनेक शब्दांच्या टायपिंग आणि स्पेलिंगच्या गंभीर चुका असल्याचे उमेदवारांनी लक्षात आणले.
कोणते आहे शब्द?
९३३ जागांसाठी २१ ऑगस्ट रोजी होणाऱ्या परीक्षा संदर्भातील नोटिफिकेशन लवकरच सोशल मीडियावर व्हायरल झाले. उमेदवारांनी नोटिफिकेशनमधील चुका उघड केल्या असून, जवळपास ४० शब्द चुकीचे असल्याचा दावा केला आहे. त्यातील काही उदाहरणे अशी आहेत – "Examination" ऐवजी "Examinaiton", "Candidate" ऐवजी "Cadidate", "Statutory" ऐवजी "Statuary", "PRATIBHA Setu" ऐवजी "PRABITHA Setu", "Kolkata" ऐवजी "Kolkatta" आणि "Functional" ऐवजी "Functinal".
संताप व्यक्त
या घडामोडीवर काँग्रेसचे नेते Mistakes in UPSC notification रणदीप सिंग सुरजेवाला यांनी संताप व्यक्त केला. त्यांनी ट्विटरवर पोस्ट करत म्हटले की, सरकारमध्ये देशातील प्रमुख संस्थांची प्रतिष्ठा आणि विश्वासावरील संकट अधिक गडद झाले आहे. UPSCने नोटिफिकेशनमध्ये ४० चुका केल्या आहेत. २०१४ मध्ये सत्तेत आल्यानंतर केवळ पदांची संख्या कमी झाली नाही, तर परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता आणि विश्वसनीयताही कमी झाली आहे."सुरजेवालांनी पुढे नमूद केले की, नोटिफिकेशनमध्ये एवढ्या चुका असल्यास प्रीलिम्सपासून मुख्य परीक्षा आणि नंतर मुलाखत आणि निवडीपर्यंत पोहोचणाऱ्या उमेदवारांना किती अडचणींना सामोरे जावे लागेल. तसेच, उच्च शिक्षण क्षेत्रातील आरएसएस आणि भाजपच्या हस्तक्षेपामुळे देशाच्या शिक्षण व्यवस्थेवर होणाऱ्या परिणामांची चिंता त्यांनी व्यक्त केली.UPSCकडून अद्याप यावर अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही, परंतु उमेदवार आणि राजकीय मंडळी यांच्यात नोटिफिकेशनवरील निष्काळजीपणाबाबत जोरदार चर्चा सुरू आहे.