वेध
प्रफुल्ल क. व्यास
महाराष्ट्राची आन, बान, शान विदर्भ आहे. कोळसा आणि निसर्गातही विदर्भ समृद्ध या सोबतच आमच्या विदर्भाची शान ज्या तीर्थक्षेत्राने वाढवली ते तीर्थक्षेत्र म्हणजे Saint Gajanan Maharaj: Shegaon संत गजानन महाराजांच्या पावस्पर्शाने पुनीत झालेले शेगाव! शेगाव म्हणजे भक्ती, शिस्त, स्वच्छता आणि सेवाभावाचा संगम. महाराष्ट्रात अनेक तीर्थक्षेत्रे आहेत, अनेक देवस्थानांना ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व आहे; परंतु, शेगावच्या व्यवस्थापनाची सर कोणीही करू शकले नाही. कारण येथे केवळ दर्शनाची नाही तर सेवाभावाचा सुगंध पावलोपावली दरवळतो. ‘स्वच्छता हीच सेवा’ हा संदेश येथे केवळ पाट्यांवर नाही तर प्रत्यक्ष कृतीत आहे. दर्शनासाठी येणार्या लाखो भाविकांची सोय करण्यासाठी प्रशस्त रांगा, शिस्तबद्ध प्रवेशमार्ग, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, भोजनालय, निवासस्थान अशा सर्व सुविधा अगदी मोफत किंवा अत्यल्प दरात आहेत. कुठेही ढकलाढकली नाही, गोंधळ नाही संतांचे नाहीत. दर्शन व्यवस्थेतील शिस्त विशेष उल्लेखनीय आहे. अनेक तीर्थक्षेत्रांमध्ये तासन्तास रांगेत उभे राहूनही गोंधळाचा सामना करावा लागतो; पण शेगावात जय गजानन, श्री गजाननच्या जयघोषात रांग हळूहळू पुढे सरकत महाराजांच्या समाधीपुढे उभे राहण्याचा क्षण येतो. त्या क्षणी मन कृतज्ञतेने भरून येते. महत्त्वाचे म्हणजे समाधी आणि मुख दर्शन किती वेळात होईल लागलेला फलक तुमच्या मनातली घालमेल क्षणात संपवून टाकतो. त्यामुळे इतर तीर्थक्षेत्रांपेक्षा शेगाव हे तीर्थक्षेत्र श्रेष्ठ ठरते आहे स्वच्छता आणि व्यवस्थापनात. (संताचा वास सर्व ठिकाणी समान आहे.) शेगावच्या प्रसादाची परंपरा तर विलक्षण आहे.
येथे प्रसाद म्हणजे केवळ काही गोडधोड नव्हे तर तो प्रेमाचा आणि समतेचा प्रतीक आहे. गरीब-श्रीमंत, लहान-मोठा, स्त्री-पुरुष कोणताही भेद न करता प्रत्येकाला समान प्रसाद दिला जातो. भोजनालयात हजारो लोक एकत्र बसून जेवतात. कुणाला उपाशी राहावे लागत नाही. अगदी एकादशीला पोटभर उसळही तेवढ्याच भक्तिभावाने दिली जाते. Saint Gajanan Maharaj: Shegaon शेगावच्या व्यवस्थेचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे नियमबद्धता. येथे प्रत्येक गोष्ट नियमांनुसार चालते. रांगेत शिस्त, परिसरात स्वच्छता, आवाजावर नियंत्रण, सेवेकर्यांचे नम्र यासोबतच निवास व्यवस्थेत ‘सेवेकरांवर लोभ न दाखवता त्यांच्याप्रति लोभ असू द्या,’ या एका वाक्याने संतनगरी शेगावची महती स्पष्ट होते अन् देवदर्शनच नाही तर संस्कारही मिळतात! शेगावात येणारा प्रत्येक भाविक काही ना काही शिकून जातो. येथे सेवा करणारे स्वयंसेवक दिवस-रात्र कार्यरत असतात. कुणी पाणी देत असतो, कुणी रांग सांभाळत असतो, साफसफाई करत असतो. त्यांना मोबदल्याची अपेक्षा नसते. ‘महाराजांची सेवा’ हीच त्यांची कमाई असते. ग्रामीण भागातून आलेल्या भाविकांपासून ते शहरातील सुशिक्षित लोकांपर्यंत सर्वांना येथे समान वागणूक मिळते. कुणालाही विशेष वागणूक नाही. ही समतेची भावना शेगावला इतर तीर्थक्षेत्रांपेक्षा वेगळे स्थान देते. आज अनेक धार्मिक स्थळांवर व्यापारीकरण वाढताना दिसते. दर्शनासाठी पैसे, प्रसादासाठी पार्किंगसाठी पैसे, सर्वत्र व्यवहार दिसतो. पण शेगावात मात्र ‘सेवा’ हा शब्द अजूनही जिवंत आहे. येथे भक्ती आहे, शिस्त आहे, स्वच्छता आहे, सेवा आहे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे माणुसकी आहे. शेगाव हे केवळ तीर्थक्षेत्र नाही, तर संस्कारांचे, सेवाभावाचे आणि आदर्श व्यवस्थापनाचे विद्यापीठच आहे. शेगाववरून आषाढीसाठी पंढरपूरला जाणार्या पालखीची शिस्त एक उदाहरण ठरावे. या मंदिराचे विश्वस्त शंकरदादा पाटील यांनी हयात असेपर्यंत या मंदिरातील घोटभर पाणी सुद्धा पिले नाही. तोच वारसा त्यांचे चिरंजीव सांभाळत आहेत. आनंद सागर प्रकल्पामुळे शेगावचे रूप आणखी खुलले होते. हे केवळ पर्यटनस्थळ नाही तर अध्यात्माला संस्कृतीची जोड होती. बाग, खेळांची साधने, मुलांसाठी मनोरंजन, ध्यानधारणा केंद्र—नियोजनबद्ध होते.
Saint Gajanan Maharaj: Shegaon कुटुंबासोबत घालवताना मन प्रसन्न होत होते. त्यामुळे तो प्रकल्प शेगावच्या व्यवस्थापन कौशल्याचा जिवंत पुरावा होता. दुर्दैवाने त्याला कोणाची तरी दृष्ट लागली आहे. तो प्रकल्प बंद पडला असला तरी भक्त आनंद सागर विसरले नाहीत. आनंद सागर परत सुरू व्हावे ही विदर्भातील प्रत्येक गजानन भक्ताची मनोमन इच्छा आहे. या प्रकल्पासाठी शासन आणि पुढाकार घेणे तेवढे अपेक्षित आहे. राजकारणविरहित हा प्रकल्प यशस्वी करण्याची जबाबदारी कोणीतरी एकाने घेतल्यास विदर्भातील हा प्रकल्प उंची गाठल्याशिवाय राहणार नाही. मंदिरांमध्ये करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करणार्यांनी, व्यवस्थापनात गलथान असणार्यांनी एकदा तरी शेगावच्या व्यवस्थापनाचा आदर्श घ्यावा! प्रकटदिन सप्ताह सुरू झालेला आहे. प्रकट दिनानिमित्त गजानन महाराजांना तरुण भारतचे शतशत नमन.