अग्रलेख
yashwantrao chavan expressway कोणत्याही सुविधांमध्ये काहीही अडथळे आले आणि त्याचे रूपांतर संकटात होण्याची चिन्हे दिसू लागली की सरकारी यंत्रणा सहसा सर्वांसाठी एक सामायिक सूचना जारी करतात. ती म्हणजे, आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडू नका, प्रवास टाळा! असे केले की संकटाची किंवा समस्येच्या गांभीर्याची झळ पोहोचणार नाही आणि संकटाच्या आसपास असण्याची शक्यतादेखील उरणार नसल्याने सर्वांच्या मनातील सुरक्षेची आश्वस्त जाणीव फारसे काही न करतादेखील सुरक्षित राहून सुरक्षा यंत्रणांवरील ताणही कमी होईल हे संबंधितांस माहीत असते. शिवाय, समस्येच्या झळा सोसाव्या लागणार नसल्यामुळे त्याच्या जबाबदारीचे खापर संबंधित यंत्रणांवर फोडण्याची संधीदेखील समाजास मिळणार नाही याचीही खात्री असते. महाराष्ट्राच्या विकासाची मुहूर्तमेढ रोवणारा महामार्ग म्हणून ज्या यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गाचा अभिमानाने उल्लेख केला जातो, त्या मार्गावर तब्बल दीड दिवस पुणे-मुंबई दरम्यानची वाहतूक एका अपघातामुळे जागच्या जागी थांबली. वाटेवरच्या हजारो वाहनांच्या मैलोगणती रांगांनी रस्ता पूर्ण भरून गेला आणि असंख्य समस्यांच्या भयाने थिजलेली माणसे अक्षरश: हवालदिल झाली.
या अपघातस्थळापासून 20 किलोमीटर अंतरावर एकाच जागी थांबून ताटकळलेल्या वाहनांस तर पुढे काय झाले आहे तेदेखील नेमके कळत नव्हते. अशा संकटातही, महामार्गावरील टोल वसुली मात्र, पुढे काहीच घडलेले नाही अशा थंडपणाने सुरूच होती. एका विषारी, ज्वलनशील वायूची वाहतूक करणारा टँकर घाटात उलटल्याने वायुगळती सुरू झाली असून पुढे जाणे धोक्याचे आहे हे कळण्यासाठीही अनेक वाहनधारकांना कित्येक तास लागले आणि सुरक्षा यंत्रणांना अपघाताचा सुगावा लागेपर्यंत वाहनांच्या रांगेचे शेपूट मैलामैलाने वाढतच राहिले. लहान मुले, महिला, वृद्ध माणसे, महत्त्वाच्या वा तातडीच्या कामाकरिता मुंबईकडे निघालेले नागरिक, विमान प्रवासाकरिता मुंबई गाठण्याची घाई करणारी माणसे, हातावरचे पोट असलेले कष्टकरी, अशा सर्वांनाच अशा समस्यांचा सरसकट फटका बसत असतो. महागड्या आलिशान गाडीतील धनवंत किंवा एखाद्या मालवाहू गाडीच्या हैद्यातून प्रवास करणारा सामान्य हमाल हे सारख्याच प्रमाणात हलाखीचा अनुभव घेतात. असा भेदभाव पुसून टाकणारे एक संकट तब्बल 33 तास महामार्गावर दाटून राहिले, आणि ते गंभीर होत असल्याची जाणीव होऊ लागल्यावर संबंधित यंत्रणांनी तोच, नेहमीचा संदेश जारी केला. अत्यंत आवश्यक नसेल तर या मार्गावरील प्रवास टाळा अशा सूचना माध्यमे, समाजमाधमांवरून जारी झाल्या, तेव्हा त्याआधीच प्रवासकोंडीत अडकलेले हतबल प्रवासी संकटातून सुटकेची प्रतीक्षा करत सरकार आणि सुरक्षा यंत्रणांकडे आशेने नजरा लावून ताटकळत होते.
यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग असे या महामार्गाचे नाव असले, तरी अलिकडच्या काही वर्षांपासून या मार्गावरून द्रुतगती तर दूरच, किमान सरासरी वेगाने वाहने चालविणेदेखील दुरापास्त होऊ लागले आहे. या समस्येस सर्वस्वी सरकार जबाबदार आहे असे सरसकटपणे म्हणता येणार नाही, पण समस्येवर तोडगा असूनही सरकारी यंत्रणा त्याकडे कानाडोळा करत असल्याचा आरोप होत असल्याने, सरकारवरील जबाबदारीही दूर करता येणार नाही. कोणत्याही रस्त्यावर वाहनांच्या वाहतुकीची एक शिस्त असते. त्यासाठी काही कायदे, नियमही आखलेले असतात आणि ते पाळणे ही नागरिकशास्त्र म्हणून समाजाचीही जबाबदारी असते. पण आजकाल अनेकदा वेळेबरोबर धावण्याच्या अपरिहार्य स्पर्धेमुळे पायालादेखील भिंगरी लावून पळापळ करणारा समाज नियम पाळून वेळ वाया घालवण्याच्या मन:स्थितीत दिसत नाही. त्यासाठी प्रसंगी तो दंडात्मक कारवाईदेखील ओढवून घेतो आणि नियमाच्या कचाट्यातून सुटका करून घेतो. कदाचित त्यामुळेच, नियम मोडणारी माणसे हा दंडाच्या महसुलाचा मोठा स्रोत ठरू लागला असून वाहतुकीस शिस्त लावण्यासाठी नेमक्या जागी उभे राहण्याऐवजी दडी मारून बसणे व नियम मोडणाऱ्याकडून वसुली करणे हीच ‘ड्युटी’ मानण्याचा गैरसमजही वाढीस लागला असावा. यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावर तर वाहतुकीची शिस्त आणि नियम मोडण्याची शर्यतच सुरू असल्याने वसुलीचे कुरण म्हणूनच या महामार्गाची ओळख निर्माण झाली आहे. वाहतुकीचे नियम मोडल्याबद्दल व शिस्त न पाळल्याबद्दल कॅमेऱ्याद्वारे पकडल्या जाणाऱ्या वाहनांकडून केल्या जाणाऱ्या वार्षिक दंडवसुलीचा आकडा काही शेकडा कोटींच्या घरात गेल्याची माहिती अलिकडेच उघडकीस आली होती. कदाचित, वाहतुकीचे नियम मोडणारी वाहने हा महसुलाचा मोठा स्रोत ठरत असल्यामुळेच त्या बेशिस्तीकडे कानाडोळा होत असला, तरी शिस्तीत जाणाऱ्या वाहनधारकांची परवड तरी लक्षात घ्यायला हवी. तसे होत नाही हाच बहुतांश खाजगी वाहनधारकांचा अनुभव असतो. हीच बाब महामार्गांवर किंवा स्थानिक रस्त्यांवरही दिसत असल्याने, जेव्हा अशाच अपघातातून समस्या उग्र होतात तेव्हा लोकांनाच घराबाहेर न पडण्याच्या सूचना देऊन समस्येची झळ शमविण्याचे प्रयत्न सुरू होतात.
मुळात, हेच टाळण्याची गरज या महामार्गावरील ताज्या समस्येने अधोरेखित केली आहे. मुंबई-पुणे दरम्यानचा हा महामार्ग केवळ महाराष्ट्रातील नव्हे, तर देशातील रस्ते वाहतुकीचा एक अत्यंत महत्त्वाचा आणि संवेदनशील भाग आहे, त्यामुळे अशा घटना वारंवार घडत असतील तर त्यावर तातडीने योग्य उपाययोजना करण्याकरिता कठोर होण्याची गरज आहे. या उपाययोजना फारशा अवघड नाहीत, हे एव्हाना स्पष्ट झालेले आहे. मार्गावरील अवजड वाहने आणि हलकी वाहने यांना रस्ता पार करण्याकरिता आखून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करणे हे जसे वाहनधारकांचे कर्तव्य आहे, त्याचप्रमाणे या नियमांचे काटेकोर पालन होते किंवा नाही हे पाहणे ही संबंधित यंत्रणांची जबाबदारीदेखील आहे. केवळ नियम मोडणाऱ्यांकडून दंड वसूल करण्याने ही समस्या सुटणार नाही, तर नियम मोडले जाणार नाहीत याकरिता संबंधित मार्गावरील वाहनांना त्यांचा नेमका रस्ता दाखविण्यासाठी यंत्रणांनी डोळ्यात तेल घालून जागता पहारा ठेवला पाहिजे. जेव्हा कोणत्याही सुविधा वाढतात, तेव्हा त्या सुविधांचा योग्य वापर व्हावा याची काळजी घेणारी सक्षम यंत्रणादेखील उभी करावी लागते. त्यामुळे या कामासाठी मनुष्यबळ नाही वगैरे कारणे उभी करणे योग्य ठरणार नाही. महामार्गावर या कामाकरिता पुरेसे मनुष्यबळ तैनात केल्यास होणारी वेळेची बचत, इंधनखर्चातील बचत आणि मुख्य म्हणजे, प्रवास करणाऱ्या माणसांना व्यवस्थेविषयी वाटणारा आदर या बाबींचा हिशेब मनुष्यबळाचा खर्च भरून काढण्यासाठी पुरेसा ठरू शकतो, हेही लक्षात घ्यावयास हवे. एका बाजूला विकासाचा ध्यास आहे, सुशासनाची ग्वाही आहे आणि त्याच विकासाच्या वेडापायी मोजावी लागणारी किंमत अशा मानसिक, शारीरिक, आर्थिक मनस्तापाचे रूप घेऊन उग्र होत असेल, तर सुशासनाच्या संकल्पनेवरील विश्वास कमी होत जाईल. केवळ व्यवस्थांच्या अभावामुळे तसे होणे योग्यदेखील नाही. कारण, सर्व यंत्रणा व व्यवस्था अखेरीस समाजहितासाठी बांधील असल्या पाहिजेत अशीच समाजाची धारणा असते.
या वाहतूक कोंडीने अनेक त्रुटींची जाणीव नव्याने करून दिली आहे. महामार्गासारख्या वेगवान सुविधा निर्माण करताना, त्यावरील संभाव्य समस्या लक्षात घेऊन त्यावरील पर्यायांची व्यवस्थाही अगोदर निर्माण करणे गरजेचे असते, हा जुनाच धडा नव्याने दिला गेला आहे. तशी सक्षम आणि पुरेशी व्यवस्था या ठिकाणी नाही, अशा प्रसंगातून तातडीने मार्ग काढण्याकरिता वेगवान हालचाली आणि निर्णय घेण्याची गरज असते. या बाबतीतही काहीशी उदासीनताच असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. अगोदरच गैरसोयींमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना सुविधा देण्याची घाई करण्याऐवजी त्यांच्याकडून टोल वसुली करून टोल कंत्राटदारांनी माणुसकीशून्य मानसिकतेचे दर्शन घडविल्याचा प्रवाशांचा आरोप आहे. या समस्येमुळे प्रवाशांना जेवढा मानसिक त्रास झाला, त्याहूनही अधिक मनस्ताप या वागणुकीमुळे झाल्याचे प्रवाशांनी समाजमाध्यमांवरून व्यक्त केलेल्या भावनांमधून स्पष्ट झाले आहे. यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावरील ही समस्या म्हणजे, संभाव्य समस्यांची पूर्वसूचना ठरू शकते. असेच प्रकार देशाच्या कोणत्याही कानाकोपèयात घडू शकतात, तेव्हा माणुसकीने जिवंत असायला हवे, ही जाणीव या समस्येने करून दिली आहे. अशा जिवंत माणुसकीचे दर्शन या संकटकाळात अनेकांना घडले होते. तासन्तास एका जागी खोळंबल्यामुळे अनेक मुले भुकेने कळवळली, अनेकांना उपाशी राहण्याची वेळ आली, अनेकांना नैसर्गिक विधींची कुचुंबणा सहन करावी लागली आणि अशा वेळी पोलिसांच्या काही पथकांनी या माणुसकीचेही दर्शन घडविले. फळे, पाणी, बिस्किटांसारख्या वस्तूंचे वाटप करण्यासाठी संपूर्ण मार्गांवर पायपीट करणारे पोलिस कर्मचारी हे त्या काळातील माणुसकीचे दूत ठरले, पण माणुसकीशून्य मानसिकतेच्या कटू अनुभवांनी त्यावर मात केली. विकास, सुविधा, सुशासनाच्या ध्यासाने सुरू असलेल्या वाटचालीला माणुसकीचा ओलावा असायला हवा, ही या संकटाने दिलेली महत्त्वाची शिकवण आहे.