६० टक्क्याहून अधिक बाल-युवापिढींना 'गेमिंग डिसऑर्डर’

07 Feb 2026 16:28:10
छत्रपती संभाजीनगर,
Gaming Addiction महाराष्ट्रात ऑनलाईन गेमिंगचे व्यसन चिंताजनक वेगाने वाढत असून १५ ते २४ वयोगटातील सुमारे ६० टक्क्यांहून अधिक बालक-युवक दररोज तीन ते चार तास ऑनलाईन गेम्स खेळण्यात गुंतलेले असल्याचे निरीक्षण मानसोपचार तज्ज्ञांनी नोंदवले आहे. या वाढत्या व्यसनाचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शारीरिक-मानसिक आरोग्यावर होत असून शिक्षण, कौटुंबिक संबंध आणि सामाजिक जीवनावरही त्याचे दुष्परिणाम स्पष्टपणे दिसून येत आहेत.
 

Gaming Addiction 
सायकोलॉजिस्ट वेलफेअर असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, मागील वर्षभरात राज्यभरातून ६० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना ऑनलाईन गेमिंगच्या व्यसनाशी संबंधित मानसिक समस्यांमुळे समुपदेशनासाठी आणण्यात आले. हे आकडे केवळ उपचारासाठी प्रत्यक्ष समोर आलेल्या प्रकरणांचे असून, व्यसनाधीन विद्यार्थ्यांची वास्तविक संख्या यापेक्षा अधिक असण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
 
 
अतिवापरामुळे अनेक तरुणांमध्ये नैराश्य, चिंता, चिडचिडेपणा, सामाजिक संवादाची कमतरता, झोपेचे विकार आणि डोळ्यांवरील ताण अशा समस्या वाढताना दिसत आहेत. काही प्रकरणांत आत्महत्येच्या विचारांपर्यंत स्थिती पोहोचत असल्याचेही निदर्शनास आले आहे. जागतिक पातळीवर ‘गेमिंग डिसऑर्डर’ हा मानसिक आरोग्याचा गंभीर विषय म्हणून मान्य करण्यात आला असून, त्याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.तज्ज्ञांच्या अभ्यासानुसार शहरी भागातील तरुण या व्यसनात तुलनेने अधिक अडकलेले दिसतात. मुलींच्या तुलनेत मुलांमध्ये ऑनलाईन गेमिंगचे प्रमाण जास्त असल्याचेही समोर आले आहे. या व्यसनामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष, आर्थिक नुकसान, कौटुंबिक तणाव आणि मानसिक अस्थिरता वाढत आहे. अलीकडेच पुण्यात एका १४ वर्षांच्या विद्यार्थ्याची ऑनलाईन गेमिंगदरम्यान सुमारे साडेतीन लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली असून, त्यामुळे पालकांमध्ये चिंता वाढली आहे.
 
 
मोठी समस्या
पालकांसमोरही ही समस्या Gaming Addiction मोठे आव्हान बनली आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक कुटुंबांत आई-वडील दोघेही नोकरी-व्यवसायात व्यस्त असल्याने मुलांच्या दैनंदिन सवयींवर पुरेसे लक्ष ठेवणे शक्य होत नाही. परिणामी मुले मोबाईल, टॅबलेट किंवा संगणकावर जास्त वेळ घालवू लागतात आणि व्यसनाची लक्षणे लक्षात येईपर्यंत उशीर होतो, अशी स्थिती अनेक घरांत दिसून येत आहे.मानसोपचार तज्ज्ञ डॉ. मोनाली देशपांडे यांनी पालकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. मुलांच्या दिनचर्येत अभ्यास, मैदानी खेळ, छंद आणि कुटुंबासोबतचा वेळ यांचा समतोल राखणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. स्क्रीन टाइमसाठी स्पष्ट नियम ठरवून त्याची काटेकोर अंमलबजावणी करणे आणि व्यसनाची लक्षणे दिसताच त्वरित तज्ज्ञांची मदत घेणे गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.
 
 
या पार्श्वभूमीवर शैक्षणिक संस्था, Gaming Addiction मानसोपचार तज्ज्ञ आणि सामाजिक संघटना एकत्रितपणे समुपदेशन कार्यशाळा, जनजागृती मोहिमा आणि पालक-विद्यार्थी संवाद वाढविण्याचे उपक्रम राबवत आहेत. वाढत्या ऑनलाईन गेमिंग व्यसनावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारनेही मानसोपचार सेवा अधिक बळकट कराव्यात, अशी मागणी तज्ज्ञांकडून केली जात असून, वेळेत हस्तक्षेप केल्यास अनेक विद्यार्थ्यांचे भवितव्य वाचू शकते, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
Powered By Sangraha 9.0