नागपूर,
st-employees-pending-salary : एसटी कर्मचार्यांना थकीत पगारवाढीची रक्कम ४८ हप्त्यांत देण्याचे मान्य केल्यानंतर आता राज्य शासनाने थकीत वेतनवाढीचा हप्ता बंद केला आहे. यामुळे राज्यातील एसटी कामगारांमध्ये असंतोष झाला आहे. वर्ष २०२० ते २०२४ या कालावधीतील ६,५०० रुपयांच्या पगारवाढीची थकबाकी मिळवण्यासाठी एसटी कामगार संघटनेच्या माध्यमातून शासनाकडे मागणी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर थकीत रक्कम एकमुश्त न देता ४८ हप्त्यात देण्याचे शासनाने ऑक्टोबर २०२५ मध्ये मान्य केले होते.
त्यानुसार नोव्हेंबर २०२५ पासून थकीत रक्कम देणे सुरू झाले. नोव्हेंबर डिसेंबर या दोन महिन्यांत एसटीच्या कामगारांना वेतनात ही रक्कम मिळाली. मात्र, जानेवारी पेड इन फेब्रुवारीचे ६५०० चा हप्ता वगळून देण्याच्या सूचना एसटी प्रशासनाने दिल्यामुळे या महिन्याच्या पगारात थकीत वेतनवाढीचा हप्ता मिळालेला नाही.
मंगळवारी कॅबिनेटमध्ये सूचना करणार
या संबंधाने एसटी कामगार संघटनेच्या पदाधिकार्यांनी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी संपर्क साधून चर्चा असता मंत्री सरनाईक यांनी कामगार संघटनेच्या पदाधिकार्यांना ’शासनाकडे आम्ही ४०० कोटी आणि १२० कोटी रुपये मिळावे म्हणून दोन फायली पाठविल्या. त्यापैकी ४०० कोटी मंजूर होऊन आले आहेत. मी स्वतः मंगळवारी कॅबिनेटमध्ये उर्वरित रक्कम मंजूर करून घेतो व फरकाचे वाटप तातडीने करण्याच्या सूचना देतो’, असे सरनाईक यांनी सांगितल्याचे कामगार संघटनेच्या सांगितले आहे.