टोकियो,
girlfriend-for-rent सध्याच्या काळात नातेसंबंधांची चौकट झपाट्याने बदलत असून, प्रेमसंबंधांकडे पाहण्याची दृष्टीही वेगळी होत चालली आहे. विशेषतः जनरेशन Z च्या युगात नात्यांशी संबंधित नवनव्या संकल्पना पुढे येत आहेत. याच पार्श्वभूमीवर सध्या एक अनोखा आणि अनेकांना धक्का देणारा ट्रेंड चर्चेत आहे. या ट्रेंडमध्ये चक्क ठरावीक कालावधीसाठी ‘गर्लफ्रेंड भाड्याने’ घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे.

काही देशांमध्ये ही संकल्पना प्रत्यक्षात अस्तित्वात असून, त्यासाठी खास ऑनलाइन प्लॅटफॉर्म्स आणि मोबाईल अॅप्स विकसित करण्यात आले आहेत. या सेवांमागील कारणे ऐकून अनेकजण आश्चर्यचकित होतात. ही पद्धत सुरुवातीला जपानमध्ये सुरू झाली आणि हळूहळू चीन, दक्षिण कोरिया तसेच थायलंडसारख्या आशियाई देशांमध्ये ती लोकप्रिय होत गेली. या देशांमध्ये अॅप्सच्या माध्यमातून इच्छुक व्यक्ती आपल्या पसंतीनुसार काही वेळासाठी गर्लफ्रेंड बुक करू शकतात. girlfriend-for-rent या सेवा देणाऱ्या मुली पूर्णपणे प्रोफेशनल असतात. संबंधित कंपन्यांकडून त्यांना विशेष प्रशिक्षण दिले जाते. या संकल्पनेत कोणताही शारीरिक संबंध नसून, केवळ सामाजिक सहवासावर भर दिला जातो. म्हणजेच क्लायंटसोबत डिनर डेटला जाणे, कुटुंबीयांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणे, चित्रपट पाहणे, खरेदी करणे, प्रवास करणे किंवा साध्या गप्पा मारणे एवढ्यापुरतीच ही सेवा मर्यादित असते.
ग्राहक अॅपवर उपलब्ध असलेल्या प्रोफाइलमधून फोटो, आवडी-निवडी, भाषा आणि सवयी पाहून आपल्या पसंतीची तात्पुरती गर्लफ्रेंड निवडतो. त्यानंतर ठरावीक वेळेचा स्लॉट बुक केला जातो आणि त्या वेळेत संबंधित मुलगी क्लायंटला भेटते. या सेवेचे शुल्क मुलीचा अनुभव, बुकिंगचा कालावधी आणि कोणत्या प्रकारचा वेळ एकत्र घालवायचा आहे यावर अवलंबून असते. girlfriend-for-rent जपानमध्ये साधारणतः एका तासासाठी या सेवेची किंमत १२,००० येनपासून सुरू होते, जी भारतीय चलनात सुमारे ६,९०० रुपयांपर्यंत जाते. दिवसभरासाठी हे शुल्क ३०,००० ते ५०,००० येन किंवा त्याहून अधिक असू शकते. प्रवास, चित्रपट तिकीट किंवा जेवणाचा खर्च मात्र क्लायंटलाच करावा लागतो. उपलब्ध माहितीनुसार हे दर वेळोवेळी बदलू शकतात. एकटेपणा, सामाजिक दबाव किंवा कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये जोडीदाराची गरज अशा विविध कारणांमुळे ही सेवा वापरली जात असल्याचे सांगितले जाते. बदलत्या काळात नात्यांच्या संकल्पनांमध्ये होत असलेले हे प्रयोग समाजात नव्या चर्चांना तोंड देत आहेत.