नवाटोला-ओवारा-बंजाराटोला रस्त्याचे बांधकाम करा

08 Feb 2026 21:14:15
मुल्ला, 
nawatola-owara-banjaratola-road : देवरी-आमगाव मुख्य रस्त्याला जोडला जाणारा नवाटोला-ओवारा-बंजाराटोला रस्त्याची दुरावस्था झाली असून रस्त्यावर निघालेली गिट्टी अपघाताला आमंत्रण देत आहे. अनेकदा गावकर्‍यांनी जिल्हा परिषद यंत्रणेकडे बांधकामाची मागणी करूनही बांधकाम विभागाने या रस्त्यांच्या बांधकामाला ठेंगा दाखवला आहे. त्यामुळे याविषयाला घेवून ग्रामसभेत गदारोळ करत रस्त्याचे बांधकाम करा अन्यथा आंदोलन करू असा इशारा ओवारावासियांनी दिला आहे.
 
 
 
road
 
 
 
पंचायत समिती देवरी अंतर्गत येणार्‍या ग्रामपंचायत ओवारा येथे आमगाव-देवरी महामार्गाला जोडणारा नवाटोला-ओवारा-बंजाराटोला रस्ता असून या रस्याची दुरावस्था झाली आहे. रस्त्यावर उखडलेल्या गिट्टीमुळे पादचारी व वाहन चालकांना मोठा त्रास सोसावा लागत आहे. ओवारा ग्रामपंचायतीची लोकसंख्या २ हजाराच्या घरात असून गावकर्‍यांना दैनंदिन, कार्यालयीन कामकाजासह आठवडी बाजार, दवाखाना, धान्य खरेदी केंद्र तसेच विद्यार्थ्यांना शाळेतही याच मार्गाने ये-जा करावी लागते. मात्र, रस्त्यावर निघालेल्या मोठ-मोठ्या गिठ्ठीमुळे या मार्गावरून चालणे कठीण झाले आहे. तेव्हा या रस्त्याचे तात्काळ बांधकाम करण्यात यावे अशी मागणी ओवारा येथील नागरिकांनी केली. प्रशासनाने रस्ता बांधकामाला त्वरित सुरुवात करावी, अन्यथा आंदोलन करू असा इशारा गावकर्‍यांनी दिला आहे.
 
 
रस्ता बांधकाम करण्याच्या मागणीचे निवेदन संबंधित बांधकाम विभागाला सादर केले आहे. परंतू याकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष केले. त्यामुळे ग्रामसभेत या रस्ता बांधकामाविषयी आक्रोश निर्माण झाले होते. याकडे संबंधित विभागाने लक्ष देत रस्त्याचे बांधकाम करावे.
- उमेश येरणे, सरपंच, ओवारा
Powered By Sangraha 9.0