गोंदिया,
gondia-news : गेल्या आठवड्यात सडक अर्जुनी तालुक्यातील सितेपार परिसरात नरभक्षी वाघिणीला वन्यजीव विभागाने जेरबंद केल्यानंतर सितेपारपासून ५ ते ७ किमी अंतरावर असलेल्या डुंडा/पांढरी परिसरात पुन्हा दोन छाव्यांसह एका वाघिणीला पाहण्यात आले असल्याचे तेथील नागरिकांचे म्हणने आहे. त्यामुळे या परिसरात पुन्हा एका वाघिणीचे अधिवास तर नाही ? असा प्रश्न निर्माण होत आहे. मात्र, दुसरीकडे वन विभागाकडून या घटनेला नकारत सदर वन्यप्राणी वाघ नसून लांडगा असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे परिसरात संभ्रमासह भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची वाघासाठी राज्यात वेगळी ओळख आहे. या वैभवात भर पडावी, येथे वाघांची संख्या वाढावी यासाठी वन्यजीव व वनविभाग प्रयत्नरत आहे. त्यातच जिल्ह्यातील प्रादेशिक व संरक्षित जंगलात वाघांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या चौफेर वाघांचे अधिवास असून संरक्षित क्षेत्राबाहेरही वाघांचे अस्तित्व असल्याचे काही घटनांवरून पुढे आले आहे. गेल्या महिन्यात सडक अर्जुनी तालुक्यातील माहूली गावात एका वाघिणीने शेतशिवारात महिलेला ठार केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर वन विभागाने शर्तीचे प्रयत्न करून त्या नरभक्षी वाघिणीला सितेपार शेतशिवारातून जेरबंद केले होते.
वन विभागाच्या या कारवाईला आठ दिवस लोटत असतानाच आता पुन्हा सितेपार पासून ७ किमी अंतरावर असलेल्या डुंडा/पांढरी परिसरात शुक्रवारी ६ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास व दुसर्या दिवशी शनिवारी ७ फेब्रुवारी सकाळच्या सुमारास एका वाघिणीला तिच्या दोन छाव्यांसह पाहण्यात आल्याचे तेथील गावकर्यांचे म्हणने आहे. त्यामुळे या परिसरात पुन्हा एकदा वाघाची दहशत निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, डुंडा/पांढरी हे गाव एनएनटीआरच्या जंगल परिसराला लागून असून या परिसरात नेहमी वन्यप्राण्यांचा वावर असते. अशात सलग दोन दिवस काही गावकर्यांनी वाघ पाहिल्याचे सांगितले. यावर पांढरी येथील काही सुज्ञ गावकर्यांनी वन विभागाला याची सुचना दिली. मात्र, तेथील कर्मचार्यांनी सदर वन्यप्राणी वाघ नसून लांडगा असल्याचे सांगितले. सलग दोन दिवस वाघाला पाहिल्यानंतरही वन विभागाकडून याला नकार देण्यात आल्याने गावकर्यांमध्ये सदर वन्यप्राणी वाघ की, लांडगा असा संभ्रम असून भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गस्त वाढवून वन्यप्राण्याचा बंदोबस्त करा ...
या घटनेमुळे परिसरात पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभाग व वन्यजीव विभागाने परिसरात गस्त वाढवून सदर वन्यप्राणी वाघिण असो किंवा लांडगा त्याचा शोध घेऊन बंदोबस्त करावा, अशी मागणी गावकर्यांनी केली आहे.
वाघ नसून लांडगाच
डुंडा/पांढरी परिसरात वाघिण दिसून आल्याची माहिती प्राप्त होताच संबंधित कर्मचार्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. पाहणीत सदर वन्यप्राणी वाघिण नसून लांडगा असल्याचे आढळून आले आहे.
- मिथून तरोणे, वनपरिक्षेत्राधिकारी, सडक अर्जुनी