नागपूर,
jan-jagran-hindu-sammelan : हिंदू संस्कृती आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देण्यासाठी पारडी वस्ती येथे 'सकल हिंदू समाज' तर्फे भव्य 'जन जागरण हिंदू संमेलन आणि पंच-परिवर्तन' सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने परिसरातून काढण्यात आलेल्या भव्य रॅलीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.
रॅलीत संस्कृतीचे दर्शन कार्यक्रमाची सुरुवात दुपारी ४ वाजता पारडी आखाडा येथून रॅलीने झाली. या रॅलीमध्ये पारंपारिक भजनांचा गजर, साहसी खेळांचे प्रात्यक्षिक म्हणून दांडपट्टा आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. 'जय श्रीराम'च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. ठवकरवाडी येथील हनुमान मंदिर येथे रॅलीचा समारोप झाला.
प्रबोधन आणि महाप्रसाद रॅलींनंतर सायंकाळी ६ वाजता मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली, ज्यामध्ये समाजातील मान्यवरांनी 'पंच-परिवर्तन' आणि हिंदू जागरणाच्या विषयावर मार्गदर्शन केले. "समाजात नवीन ऊर्जा आणि चेतना निर्माण करणे हा या आयोजनाचा मुख्य उद्देश आहे," असे आयोजकांनी यावेळी नमूद केले. रात्री ७:३० वाजता महाप्रसादाचे वाटप करण्यात आले, ज्याचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सकल हिंदू समाज, पारडी वस्ती येथील कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.