राष्ट्र रंगी रंगले मी

    दिनांक :08-Feb-2026
Total Views |
Rajamma बंगलोर निवासी असलेलं राजम्मा नावाचं 106 वर्षांचं हे पक्व फळ उर्वारुकमिव बंधनात मृत्योमुक्षियमामृतात हे वचन सार्थ करतं झालं. 13 जानेवारीला स्वतःच्या विशाखा या जन्म नक्षत्रावर आणि जन्म तिथिलाच ही कृतार्थ काया अलगद या जगतातून स्थूल शरीर रूपाने काळाच्या पडद्याआड गेली पण स्मृति रूपान अनेकांच्या मनात घर करून आहेत. चिरस्मरणात विराजमान आहेत. 1919 पौष एकादशीला म्हैसूर येथे लक्ष्मणराव आणि सावित्रीबाई या दाम्पत्याच्या पोटी त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील अंमलदार होते. अग्रहार प्राप्त असलेला हा परिवार. राजघराण्यात या परिवाराला सन्मानपूर्वक आमंत्रित केलं जायचं. राजम्मानाही अनेक पूजांच्या वेळी कन्या पूजनाला आवर्जून बोलावलं जायचं, नटवलं जायचं. त्यामुळे बालपणापासून पूजेची, व्रतवैकल्यांची आवड निर्माण झाली. त्या काळात आठवी ही बोर्डाची परीक्षा होती, त्यात त्या जिल्ह्यातून पहिल्या आल्या.
 

देश सेवा  
 
गणित हा त्यांचा प्रिय विषय होता. त्यामुळे हिशोबही त्या तोंडी पटापट करीत.बालवयातच लग्न होऊन त्या सासरी आल्या, तिथेही सर्वांना प्रिय झाल्या. शांताक्कांचे वडील श्री व्यंकटरामय्या हे परम गांधी भक्त.लग्नाचे वेळीच त्यांनी सांगितल की लग्न करायचं तर खादीच वापरायची. खरंतर दक्षिणेत सिल्क प्रचूर प्रमाणत वापरलं जात, अन् संपन्न परिवारातील त्या वेळपर्यंत रोजच रेशमी वस्त्र घालणाऱ्या राजम्मानी पति विचारांशी समरस होत,प्रथम अनेक वर्ष खादी व त्यानंतर आजीवन सुतीच कपडे घातले. एकदा गांधीजींच्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांनी आपलं स्त्रीधन समर्पित केलं आणि अनुकूल परिस्थिती असतानाही कधी पुन्हा सोनं घातलं नाही. असं निरासक्त होणं कठीण असतं. घरातील कुल परंपरा सांभाळत व्रतवैकल्य करीत जीवन पुढे सरकत होतं. या घराचं वैशिष्ट्य असं की ते परमेशा इतकच राष्ट्र रंगातही रंगलं होतं.
 
गंगा यमुना जशा एकमेकात मिसळून एक वेगळा प्रवाह तयार होतो व तो अधिष्ठान लाभलेला प्रवाह जनतेचा जीवन सुजल सुफल करत जातो तसंच इथे झालं. राष्ट्र सर्वो परी ही भावना मनात खोलवर रुजली. एकदा माननीय भैयाजी जोशी यांच्या घरी गेले असताना आई काही वाचत होत्या त्यावेळी त्यांनी वयाची नव्वदी ही ओलांडली होती. अशा वयात वाचता येणच अवघड आणि या तर चष्म्याशिवाय वाचू शकत होत्या. भैय्याजींना वाटलं की त्या पोथी वाचत आहेत, पण त्या क्रांतिकारक भगतसिंगाचं चरित्र वाचत होत्या. क्षणकाल भैय्याजींनाही आश्चर्य वाटलं. परंतु त्या ज्या काळात वावरल्या त्यावेळी गांधीभक्त पतीच वागणं, घरातलं वातावरण, होणाऱ्या चर्चा, क्रांतिकारकांची जीवन, त्यांना होणाऱ्या शिक्षा -, वेळोवेळी होणारी आंदोलन हे सारं सजगतेन अनुभवणं त्यामुळे त्यांचं मनही राष्ट्ररंगी रंगलं ते कायमचं देश हा देव असे माझा हा भाव दृढ होत गेला आणि त्यामुळे वाचनात असू दे वा गोष्टी सांगताना, त्या देशभक्त कथाच सांगत. भगिनी निवेदितांचं म्हणणं की देश आणि देव यांत देश आहे हे विसरू नका, हे त्यांनी स्वीकारलं, अंगीभुत केलं. परिणामतः
 
सामर्थ्य आहे चळवळीचे । जो जो करील तयाचे ।।
परंतु तेथे भगवंताचे । अधिष्ठान पाहिजे ।।
घरात चळवळीचं सामर्थ्य आणि साम्राज्य नांदू लागलं. राजमांची तीन मुलं श्री नागराज (पूर्व दक्षिण क्षेत्र संघ चालक) मंजुनाथन (प्रांत शारीरिक शिक्षण प्रमुख) आणि शांताक्का प्रांत कार्यवाहीका नंतर प्रमुख संचालिका असे या देशाला गौरवमय पद प्राप्त करून देण्याचं व्रत घेतलेल्या तिघांच्या रूपाने घरात देशभक्तीच्या लहरी लहरू लागल्यात.
राष्ट्र हीच प्राथमिकता
मंजुनाथन यांची मुलगी कर्नल तेजस्मिता आणि नातं जावई कर्नल तरुण यांच्या रूपान देशभक्तीची एक वेगळी धारा घरात प्रवेश करती झाली. तिसरी पिढीही त्याच रंगात रंगली. हे एक समाधान आणि आनंद होत. तेजस्मिता सांगते आम्ही जेवायला बसलो की आजी आम्हाला रोज गोष्टी सांगायची; कधी महाभारत, कधी सावरकर तर कधी मदनलाल. त्यामुळेच की काय उसळत्या रक्तात मा ज्वालामुखाचा दाह दे अशी तेजूची स्थिती झाली. तेजस्मिता प्रवीण वर्ग राष्ट्रसेविका समितीची तृतीय वर्ष प्रशिक्षित आहे. ती नृत्यही उत्तम करायची. तिचं अरंगेत्रम ही झालं, पण सैन्यात जायचं ही स्वप्न होतच. ते पूर्ण झालं ही घरातल्या सगळ्यांकरताच आनंदाची बाब होती. तेजूचं प्रशिक्षण पूर्ण झालं, खरंतर ती नृत्य विशारद,त्यामुळे नृत्य कार्यक्रमाचे वेळी लांब केस त्याला गोंडा ही अनिवार्यच. पण अशीही तेजू एकावेळी घरी आली तर बॉयकट केलेला.
 
तिला पाहिल्यावर आजीला काय वाटलं असेल... त्या शंभरीच्या जवळ आलेल्या आजींच्या दृष्टीने केस कापणं हे अक्षम्यचं.. पण शांतपणे त्या म्हणाल्या तिनं जे व्रत जो पेशा अंगीकारला आहे त्याच्या दृष्टीने जे काही करणं आवश्यक असेल ते तिला करायलाच हवं. तिथली जी शिस्त असेल तसंच वागाव लागेल. तिथे भावनांना महत्त्व देऊन कसं चालेल? तिनं फॅशन म्हणून ते केलं नाही हे समजून घेणे हे नव्वदी उलटल्यानंतर विशेष नाही का ...आमच्या वेळचं असं काही न उगाळता हे देशाच्या हिताकरता आहे हे त्यांनी समजून घेतलं ते वैचारिक अधिष्ठानाच्या आधारावर आणि त्यामुळेच की काय 1975 ते 1977 च्या आणीबाणी काळातही त्या पोलिसांच्या ससेमिऱ्याला समर्थपणे तोंड देऊ शकल्या. दोन्ही मुलं नागराज आणि मंजुनाथन संघ स्वयंसेवक त्यामुळे अधिकाऱ्यांचं घरी नित्य जाण-येणं असे. अनेकांची त्या आईच बनल्या, हक्काने मन की बात सांगायचं ते एक स्थान होतं.
 
क्वचित ती खाण्यापिण्याची आवड असेल तर कधी पारिवारिक ही असायचं. आणीबाणीत तर भूमिगत असलेले अनेक जण निवासाला, बैठकी घ्यायला येत. घरी माननीय शेषाद्री जी, यादवराव जोशी सुरक्षित स्थान म्हणून इथेच बैठकीत घेत.त्यावेळी श्री वेंकटरमय्याजी अर्धांग वायूमुळे निजून असत, मुलगी शांताकुमारी जयदेवजींची बहीण म्हणून कारागृहात दर पंधरा दिवसांनी भेटायला जात. आतले निरोप बाहेर व बाहेरचे आत पोहोचवणे हे महत्त्वाचं काम असे. अशा काळात जवळजवळ 18 वेळा तरी घरी पोलीस चौकशीला आले. एकदा आले की तास दोन तास चौकशी चालायची. एकदा राजम्मानी त्यांना सांगितलं, अहो तुम्ही कितीही प्रकारांनी विचारलं तरी मी कोणीही आलं नाही हेच सांगणार. असं बघा माझे यजमान आजारी आहेत मला त्यांना काय हवं नको ते सतत बघायला लागतं, मी त्यांच्याकडे लक्ष द्यायचं की इथे पुन्हा पुन्हा तेच सांगत राहायचं. एकदा तर एक महत्त्वाची व्यक्ती घरात आली होती. थोड्याच वेळात पोलिस ही हजर.
राजमांनी त्यांना वारंवार सांगितलं की कोणी नाही घरात. पण ते पुन्हा पुन्हा विचारत राहिले. शेवटी राजम्मानी त्यांना सांगितलं मी माझ्या मुलांची शपथ घेऊन सांगते की आमच्या घरात कोणी नाही.Rajamma हे अधिकारी जरा वेगळ्याच स्वभावाचे होते, त्यांनी वर्तमानपत्राचं एक कात्रण काढलं, ते राजमांना दाखवलं अपघातात क्षतविक्षत झालेल्या माणसाचं छायाचित्र होतं, ते म्हणाले तुम्ही खोटी शपथ घेतली असेल तर तुमच्या मुलांची अशी स्थिती होईल. राजमांचा चेहरा निर्विकार होता. कोणतेही भीतीच चिन्ह त्यांच्या चेहऱ्यावर उमटलं नाही, तेव्हा या बोलतात ते खरं असावं हे समजून ते निघून गेले. मी खोटं बोलले असले तरी ते देशाकरता, सज्जनशक्ती रक्षणार्थ बोलले आहे, आजच्या घटकेला हे देवकार्यच आहे, माझ्या मुलांवर काहीही परिणाम होणार नाही हा ठाम विश्वास त्यांच्या मनात होता लाख मरो लाखांचा पोशिंदा जगो या उक्तीप्रमाणे भूमिगतला वाचवणं याला त्यांनी दिलेली प्राथमिकता हे त्यांच्या सुदृढ मानसिकतेचे प्रतिक आहे.
 
तसंच पोलीस निघून गेल्यावर, त्या पोलिसांनी विचारलेले प्रश्न व त्याला त्यांनी दिलेली उत्तर लिहून काढून संबंधितांना देत त्यामुळे संघ अधिकार्यांनाही पोलीस खातं काय विचार करताय त्यांचे आराखडे काय आहेत याचा अचूक अंदाज येऊन कार्य दिशा ठरवायला मोलाची मदत होत असे. त्या काळात पोलिसांनी काही बंदींचा विलक्षण छळ केला, या सर्व गोष्टींची कल्पना असूनही त्यांनी दाखवलेलं धैर्य हे निश्चितच आश्चर्यकारक आहे. अधिष्ठान पक्क असलं की व्यक्ती कशी खंबीर बनते याच हे जिवंत उदाहरण आहे. राम जन्मभूमी आंदोलनाचे वेळी ही तिघांनीही कारसेवेला जायचं ठरवल्यावर एक जण थांबा असं त्या म्हणाल्या नाहीत.
 
सर्वांनी मतदानाचा हक्क बजवावा
यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी 2023 ला त्या मतदानाला बूथवर जाऊन आल्या. मी मतदान केंद्रावर जाऊ शकते, घरी करणार नाही असं म्हणत त्या केंद्रावर गेल्या. 103 वर्षांच्या, सेंचुरी पार करणाèया व्यक्ती बुधवर येणं हे उत्साहाची लहर निर्माण करणारे ठरलं. जीवेत शरदः शतम हा आशीर्वाद सार्थ करणाèया, चालत येणाèया आजी सर्वांकरताच एक अप्रूप होतं. कोणीतरी गमतींन विचारलं, आजी कशावर ठप्पा मारला ? मतदान गुप्त असतं, आजी उत्तरल्या. त्यांचं वय, त्यांचं ठामपणे बोलणं यामुळे वार्ताहर, फोटोग्राफर, बाईट घेणारे सारेच पुढे सरसावले. आजी तुमचा काय संदेश आहे ? एकान विचारलं. सर्वांनी आणि तरुणांनी घरा बाहेर पडून मतदान करावं, आपला हक्क बजवावा, आपले नागरिक कर्तव्य पूर्ण करावे, उस्फूर्तपणे अविलंब आलेलं त्यांचं उत्तर सर्वांनाच आश्चर्यचकित करून गेलं. कुणी त्यांच्या कानात सांगितलं किंवा प्रॉम्प्टिंग केलं असं नाही. त्यांची प्रज्ञा त्या क्षणी ही जागृत होती.
कर्मयोग हीच शक्ती
त्यांचं घर बंगलोरला गार्डन परिसरात आहे आजच्या भाषेत हार्ट ऑफ द सिटी अस आहे. तिथून निमहान्स हे मनोरुगण करता असलेलं तसेच एक कॅन्सर हॉस्पिटल जवळच आहे. त्यामुळे नेहमीच कुणा ना कुणा करता डबे या घरातून नित्य जात. कधी रुग्णाचे नातेवाईक निवासाला असत. कधीकधी महिना अन् महिना राहत,पण त्या सर्वांचं आनंदान करत.हे सातत्याने चालू असे पण विशाल परिवाराच्या आईला ते अवघड गेलं नाही. त्या अतिशय सुगरण होत्या. पोपटीचे दाणे घालून डोसे अतिशय उत्तम बनवत. कुणी कितीही सकाळी बाहेर पडलं तरी त्यांनी खाऊनच निघालं पाहिजे हा घराचा दंडक होता त्यामुळे आलेली व्यक्ती तृप्त होऊनच बाहेर पडायची पण त्याकरता त्या माऊलीने केलेला कर्मयोग विलक्षण आहे. कर्मयोगच त्यांची शक्ती होती व त्यातच त्यांची तृप्ती ही होती. घरात केलेलं सांबार भात भाजी असं एकत्र कालवून त्यांनी दिलेल्या मातृहस्तेन घासाची भोजनाची आठवण त्यांच्या घरी येणाèयांच्या मनात आजही ताजी आहे. त्याचा उल्लेख अंत्यदर्शनाला आलेल्या अनेकांनी केला. त्या सकाळी शांत झाल्या, अल्पावधीतच त्यांच्या निधनाची बातमी कर्णोपकर्णी होऊन अनेक गणमान्य लोक अंत्यदर्शनाला आले मग ते श्री यदुयरप्पा पासून तर नीमहान्स इस्पितळाच्या डॉक्टरांपासून ते सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत.सर्वांची एकच वेदना होती आई गेल्याची. नीमहान्सचे डॉक्टर गंगाधर तर पूर्णवेळ तिथेच उपस्थित होते.
प्रेमस्वरूप आई वात्सल्य सिंधू आई
त्या खरोखरच अनेकांची आई होत्या. लहानपणीस मातृवियोग झालेल्या छोट्या वसंता स्वामीला हे घर आपलंच वाटायचं. राजम्मा तिच्या घरी तिची आई असताना हळदी कुंकवाला वगैरे जात असत. त्या तिला समजावीत अगं तुझी आई देवीच नेहमी सगळं खूप व्यवस्थित श्रद्धेने करायची त्यामुळे तृतीयेला गौरीच्या दिवशी ती सवाष्ण गेली. पुढेही वसंता अक्काचे लग्न झाल्यावर आईसारखंच तू सगळं नीटनेटकं कर असं आग्रहानं तिला सांगितलं. वसंत आक्कांची आता सत्तरी झाली आहे, तिला आता नातं नातू झाले असले तरी मला तू तेवढीच लहान वाटते असं म्हणून जवळ घेत तिच्या डोक्यावरून हात फिरवीतर.
तिला शिकू द्या
समितीच्या बंगलोरच्या एक अधिकारी बाल विधवा झाल्या. माहेरीमाघारी आल्या. संपन्न घर होतं. आर्थिक चिंता त्या मुलीला कधी करावी लागणार होती असं नाही. त्यामुळे तिला पुढे शिकवावं असं फारसं घरच्यांच्या मनात आले नाही, एकुलत्या एका मुलीवर आकस्मिक अकाली आलेलं हे संकट, सर्वच दिग्मुढ झालेले. अशावेळी श्री. व्यंकटरामय्याजी आणि राजम्मा त्यांच्या घरी गेले आणि तिला घरात बसवू नका तिला शिकू द्या. तिला त्याची आवड आहे असे सांगितले आणि तिचं शाळेत जाणं सुरू झालं. एका कॉलेजच्या प्राचार्य म्हणून त्या निवृत्त झाल्या. त्यांच्या मार्गदर्शनाने अनेक मुलींची जीवन उजळली पण त्या बालकलिकेचं जीवन उजळल ते व्यंकटरमय्या आणि राजमा यांच्यामुळे. कदाचित स्वतःचं अपूर्ण राहिलेलं शिक्षण त्या वेदनेने ही राजम्माना एवढं आग्रही बनवलं असेल.
घरातही राजम्मा आणि मंजुनाथन यांच्या पत्नी सुमा वहिनी यांचे संबंध सुमधुर होते. सुमा वहिनी आजारी झाल्या. आईला सहन होणार नाही म्हणून कुणी त्यांना तिच्या आजाराची कल्पना दिली नाही. सुनेला वाटायचे त्यांना दुःख नको आणि आईला वाटायचं ही खात पित नाही, आपली तिला मदत नाही. नात सुनेवर अंबिकेवर भार येतो आणि त्यामुळे सोवळ ही थोडं शिथिल झालं. दोघी ही एकदुसरीची चिंता करत.
 
2019 मध्ये नातीनं तेजस्मितानं विवाह निश्चित केला. तेजस्मिता आता एम तेजस्मिता तरुण झाली. तेही आर्मीतच आहे. तो गुणी आहे हे प्रथम भेटीतच त्यांना त्याच्या व्यवहारातून जाणवलं आणि जावई सुंदर तसा गुणी आहे याच समाधान त्यांनी व्यक्त केलं. तो याच विचारांचा, याच शिस्तीतला. दोघेही एकाच विचारांचे त्यामुळे तिला तिचं काम निर्वेधपणाने करता येईल. करिअर वीथ कॅरेक्टर ती करू शकेल असा विश्वास त्यांना आला तो त्यांनी व्यक्त करून दाखवला. सत्येनचा मुलगा चार वर्षांचा अगस्त्य याला ही सारखी येता जाता पणजीच हवी असायची. रोज तिच्याशी खेळायचं, गोष्ट ऐकायची तिला चालवायचं, तिच्या मांडीवर बसून दूध प्यायचं, तासनतास ते दोघे एकमेकांशी खेळत.
 
दिनांक 12 जानेवारीला एक कार्यक्रम ठरला होता. अनेकांनी 106 वर्षांची व्यक्ती बघितलीच नव्हती आणि ती ही स्वतःचं सर्वकाही करू शकणारी. त्या दिवशी कोणी धावत तर कोणी चालत कुणी सायकलवर असं त्यांच्या घरी यायचं, आईशी संवाद साधायचा आणि मग जायच. पण आईला दिनांक दहालाच दवाखान्यात न्यावं लागलं. सर्वजण आले होते, कॉफी अल्पाहार झाला पण आईला भेटता आलं नाही. इन्फेक्शनचं छोटसं निमित्त झालं. 11 ला शांताक्का पोहोचल्या. बाराला तेजू, तरुण. सर्वांना त्यांनी ओळखलं. सर्व चौकशी केली. त्यांच्या अंतिम रात्री दिनांक बाराला तेजस्मिता तरुणच त्यांच्या जवळ होते. एकेक अवयव शिथिल होत होता. अंतिम क्षण जवळ आला असल्याचं लक्षात घेताच जवळच घरी असलेल्या सर्वांना त्यांनी बोलावून घेतलं.गंगा मुखी घेत ,रामनाम ऐकत त्यांनी एकादशीच्या दिवशी वैकुंठ गमन केलं. दर्शनाला येणारा प्रत्येक जण फुलं तुळशी चंदनमाला घेऊन येत होता. त्यांच्या भावना त्यातून व्यक्त होत होत्या. फुलं सांगत होती प्रेमाचा, वात्सल्याचा, राष्ट्रभक्तीचा सुगंध तर चंदनमाला त्यांच्या त्यागाच्या गाथेचं प्रतीक होतं अन् तुलसीमाला समर्पण, पवित्रतेच प्रतीक. मातीचा सुगंध माती मिसळला तिच्याशी एकरूप झाला. आता उरल्या आहेत त्या केवळ आठवणी.
चित्रा जोशी
अखिल भारतीय सह कार्यवाहिका
राष्ट्र सेविका समिति