वादाच्या पार्श्वभूमीवर शशांक केतकरची व्हायरल पोस्ट

    दिनांक :08-Feb-2026
Total Views |
मुंबई,
Shashank Ketkar, मराठी मनोरंजनसृष्टीतील अभिनेता शशांक केतकर हा केवळ त्याच्या दमदार अभिनयासाठीच नव्हे, तर त्याच्या स्पष्टवक्तेपणा आणि निर्भीड भूमिकांसाठीही ओळखला जातो. कोणतीही गोष्ट अन्यायकारक वाटली, तर ती थेट मांडण्यास तो कधीच मागेपुढे पाहत नाही. याच स्वभावामुळे काही काळापूर्वी त्याचा आणि प्रसिद्ध दिग्दर्शक मंदार देवस्थळी यांचा मानधनावरून झालेला वाद चांगलाच गाजला होता. मात्र आता याच वादाच्या पार्श्वभूमीवर शशांकने केलेल्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे.
 

Shashank Ketkar, 
काही महिन्यांपूर्वी शशांक केतकरने एका मालिकेच्या मानधनाचे पैसे वेळेवर न मिळाल्याचा आरोप करत दिग्दर्शक मंदार देवस्थळी यांच्याविरोधात सोशल मीडियावर थेट चॅटचे स्क्रीनशॉट शेअर केले होते. त्या चॅटमध्ये ‘लवकरच पैसे परत देईन’ असे आश्वासन दिले असतानाही वारंवार मुदत देऊनही पैसे मिळाले नसल्याचा दावा शशांकने केला होता. या प्रकरणात कायदेशीर कारवाईचा इशाराही देण्यात आला होता. या घटनेनंतर मराठी इंडस्ट्रीत मानधन आणि व्यावसायिक व्यवहारांबाबत खुलेपणाने बोलण्याची लाट आली होती.
 
 
हा वाद अद्याप पूर्णपणे मिटलेला नसतानाच, नुकताच मंदार देवस्थळी यांचा वाढदिवस साजरा झाला. याच निमित्ताने शशांक केतकरने सोशल मीडियावर एक अनपेक्षित आणि अनेकांच्या भुवया उंचावणारी पोस्ट शेअर केली. काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेला मंदार देवस्थळी यांच्यावरील एक जुना वृत्तपत्रीय लेख शेअर करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. त्या लेखात मंदार देवस्थळी यांचा उल्लेख ‘डार्लिंग दिग्दर्शक’ असा करण्यात आला होता.
 
 
हा लेख शेअर Shashank Ketkar,  करताना शशांकने लिहिले, “तुझ्याबद्दलचा एक जुना आर्टिकल! जगाला काहीही वाटू दे… माझ्यासाठी तेव्हाही तू एक उत्तम दिग्दर्शक होतास आणि आजही आहेस.” शशांकची ही पोस्ट काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाली. अनेकांनी त्याच्या मोठ्या मनाचे आणि व्यावसायिक दृष्टिकोनाचे कौतुक केले, तर काही चाहत्यांनी मात्र या पोस्टवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ‘मानधनाचे पैसे अडकले असताना अशा शुभेच्छांची गरज होती का?’ असा सवाल काही नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे.शशांक केतकर आणि मंदार देवस्थळी यांची व्यावसायिक जोडी पूर्वी मराठी टेलिव्हिजन विश्वात विशेष गाजली होती. झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘होणार सुन मी या घरची’ या मालिकेमुळे शशांकला घराघरात ओळख मिळाली होती. या मालिकेचे दिग्दर्शन मंदार देवस्थळी यांनी केले होते. त्यानंतर दोघांनी कलर्स मराठीवरील ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ या मालिकेतही एकत्र काम केले. मात्र याच मालिकेच्या मानधनावरून दोघांमध्ये वाद निर्माण झाल्याचे शशांकने स्पष्टपणे सांगितले होते.
 
 
या संपूर्ण प्रकरणावर अद्याप मंदार देवस्थळी यांची कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. मात्र शशांक केतकरची ही वाढदिवसाची पोस्ट सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेचा विषय ठरत असून, वैयक्तिक मतभेद आणि व्यावसायिक नातेसंबंध यातील सीमारेषेवर पुन्हा एकदा प्रकाशझोत टाकत आहे.