...अखेर सुरबन/-बोंडगाव परिसरातील २१ शेतकर्‍यांचे नुकसान निष्पन्न

- कृषी विभागाकडून सर्वेक्षण करून पंचनामा

    दिनांक :08-Feb-2026
Total Views |
अर्जुनी मोरगाव, 
farmers-losses : तालुक्यातील सुरबन-/बोंडगाव व परिसरातील शेतकर्‍यांच्या मका पिकावर तणनाशक फवारणीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची तक्रार अन्नदाता धान उत्पादक शेतकरी संघटनाच्या वतीने करण्यात आली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत रविवारी ८ फेब्रुवारी रोजी संबंधित विभाग व कंपनी प्रतिनिधींनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन पंचनामा केला. ज्यामध्ये २१ शेतकर्‍यांच्या शेतामध्ये मका पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
 
 
 
jl
 
 
तणनाशक फवारणी केल्यामुळे शेतकर्‍यांच्या शेतातील मका पिकाचे नुकसान झाल्याचे उघडकीस आले असता अन्नदाता धान उत्पादक शेतकरी संघटनातर्फे याविषयीची तक्रार संबंधित कंपनी व कृषीविभागाकडे करण्यात आली होती. यावर उपविभागीय कृषी अधिकारी महेंद्र ढोकळे, तालुका कृषी अधिकारी सुलक्षणा पाटोळे, सिजेंटा कंपनीकडून वल्लभ महाजन, कुसवंत मनकवडे तसेच त्यांच्या चमूने अन्नदाता धान उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ललित बाळबुद्धे, हेमराज बेलखोडे, देवानंद डोंगरवार, नितेश कुंबरे, श्रावण मेंढे यांच्या उपस्थितीत बांधावर जावून प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी सर्व २१ नुकसानग्रस्त शेतकरी आपल्या-आपल्या शेतामध्ये उपस्थित होते. पाहणीत पिकाची पाने जळालेली, वाढ खुंटलेली व उत्पादनावर विपरीत परिणाम झाल्याचे चित्र दिसून आले.
 
 
यावेळी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी शेतकर्‍यांच्या नुकसानीबाबत प्रशासन व कंपनीकडे भरपाई देण्याची मागणी केली. तर शेतकर्‍यांनी शिफारस केलेल्या तणनाशकांचा वापर करूनही पिकांचे नुकसान झाले असल्याने ते आर्थिक अडचणीत सापडले असल्याचे सांगून उत्पादन घटल्यास कर्जफेड व कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण होणार असल्याची भावना व्यक्त केली. यावर कृषी विभागाच्या अधिकार्‍यांनी पंचनामा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करून पुढील कार्यवाही करण्याचे आशवासन दिले. तर कंपनी प्रतिनिधींनीही अहवालाच्या आधारे योग्य तो निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले. दरम्यान, शेतकर्‍यांना लवकरात लवकर न्याय व नुकसानभरपाई मिळावी, यासाठी अन्नदाता धान उत्पादक शेतकरी संघटना सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे अध्यक्ष ललित बाळबुद्धे म्हणाले. या घटनेमुळे परिसरातील शेतकर्‍यांमध्ये चिंता व नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाच्या पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.