अहवाल अप्राप्त, सहाय्यक वनसंरक्षक बिनधास्त
वरूड,
Tiger's death suspicious वरूड तालुक्यातील जंगलात २ फेब्रुवारी रोजी कुजलेल्या अवस्थेत वाघ आढळून आला. मात्र, अहवालाबाबत कमालीची गुप्तता बाळगली जात आहे. जबाबदारी असलेले मोर्शीचे सहायक वनसंरक्षक हे बिनधास्त आहेत. किंबहुना वरिष्ठांनीही वाघाचा मृत्यू गांभीर्याने घेतलेला नाही. अमरावती वनविभागांतर्गत येणार्या वरूड वनपरिक्षेत्रात २ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे रूबाबदार वाघ मृत अवस्थेत आढळला. ही घटना वरुडमधील वाई वर्तुळ, पंढरी बीट येथील खंड क्रमांक १०१० मध्ये घडली. मृत वाघ हा अंदाजे ४ ते ५ वर्ष वयाचा असल्याचे पशुधन विकास अधिकार्याचे म्हणणे आहे. प्राथमिक तपासणीनुसार या वाघाचा मृत्यू साधारणत: १५ दिवसांपूर्वी झाला असावा, असे मत वनाधिकार्यांनी नोंदविले आहे.
Tiger's death suspicious वाघाचा मृत्यू संशयास्पद असल्यामुळे नमुने डीएनए तपासणीसाठी नागपूर येथील शासकीय न्यायवैद्यक प्रयोगशाळेत ३ फेब्रुवारी रोजी पाठविल्याची विश्वसनीय माहिती आहे. हा वाघ मारला की मेला हे येथील अहवालानंतरच स्पष्ट होईल. मात्र, १५ ते २० दिवसांपासून जंगलात वाघ मरून कुजला. घटनास्थळी कातडे, मुख्य अवयव, केसांचा पत्ता नव्हता. काहीच अवशेष कुजलेल्या स्थिती होते, असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. मोर्शी प्रादेशिकचे सहायक वनसंरक्षक डॉ. मयूर भैलुमे अमरावती येथून कारभार पाहतात. डॉ. भैलुमे यांचे मुख्यालय हे मोर्शी आहे. परंतु त्यांनी वरिष्ठांवर जादू करून मेळघाटच्या वन्यजीव विभागीय वनाधिकारी पदाचा प्रभार पदरात पाडून घेतला आहे. वाघाच्या मृत्यूप्रकरणी ते देखील तितकेच जबाबदार आहेत. मृत वाघाचे शवविच्छेदन राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार करण्यात आले. त्यानंतर घटनास्थळीच अंत्यसंस्कार झाले. या कार्यवाही दरम्यान पशुवैद्यकीय अधिकारी, डॉग स्कॉड, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आणि मानद वन्यजीव रक्षक उपस्थित होते.
Tiger's death suspicious या प्रकरणाचा तपास वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ नुसार केला जात आहे, अशी माहिती अमरावती वनविभागाचे उपवनसंरक्षक अर्जुना के. आर. यांनी दिली आहे. तसेच कुजलेल्या वाघाबाबत घटनास्थळाचा पंचनामा करून वस्तुनिष्ठ अहवाल वनविभागाकडे देण्यात आला. मृत्यूचे कारण डीएनए तपासणीनंतरच पुढे येईल, अशी माहिती वरूडचे पशुधन विकास अधिकारी पुरुषोत्तम बोबडे यांनी दिली.