भाेसले काळात नागपुरी चित्रकथी शैलीची भरभराट

01 Mar 2026 17:41:46
नागपूर, 
chandrashekhar-gupta : विदर्भातील मध्ययुगीन काळात विकसित झालेली ‘नागपुरी चित्रकथी शैली’ ही महाराष्ट्राच्या समृद्ध कलापरंपरेतील एक वैशिष्ट्यपूर्ण पण दुर्लक्षित ठेवा असल्याचे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्व विभागाचे माजी प्रा. डाॅ. चंद्रशेखर गुप्त यांनी केले. नागपूरकर भाेसल्यांच्या काळात या कलेची भरभराट झाल्याचेही ते म्हणाले.
 
 
 
chandrashekhar-gupta
 
 
 
विदर्भ संशाेधन मंडळाच्या वतीने आयाेजित ‘मध्ययुगीन नागपुरी चित्रकथी शैली’ या व्याख्यानात ते बाेलत हाेते. या कलेविषयी माहिती देताना ते म्हणाले, चित्रांच्या माध्यमातून कथा सांगण्याची परंपरा म्हणजे ‘चित्रकथी’. विदर्भातील नागपूर व परिसरात ही शैली विशेषतः विकसित झाली. तत्कालीन सामाजिक जीवन, धार्मिक श्रद्धा आणि स्थानिक कलात्मक काैशल्य यांचा सुंदर संगम या चित्रांमध्ये दिसून येताे. नागपुरी चित्रकथी प्रामुख्याने पाेथी चित्रे (पांडुलिपी चित्रे) आणि कागदी चित्रांच्या स्वरूपात आढळते. मराठा चित्रकला आणि दक्षिण भारतीय कलेचा काही प्रमाणात प्रभाव असूनही या शैलीची स्वतंत्र स्थानिक ओळख टिकून आहे. रामायण, महाभारत आणि पुराणातील कथा हे या चित्रांचे मुख्य विषय हाेते. याशिवाय विदर्भातील लाेककथांनाही चित्रांमध्ये स्थान देण्यात आले आहे.
 
 
रंगयाेजनेबाबत बाेलताना प्रा. गुप्त म्हणाले, यात नैसर्गिक रंगांचा माेठ्या प्रमाणावर वापर केला जात असे. चित्रांच्या कडांना दिलेली ठळक काळी बाह्यरेखा ही या शैलीची खास ओळख आहे. मानवी आकृत्यांमध्ये माेठे डाेळे, विशिष्ट चेहरेपट्टी तसेच त्या काळातील धाेतर, नऊवारी साडी आणि पागाेटा यांचे बारकाईने केलेले चित्रण विशेष लक्षवेधी ठरते.
 
 
लाेकशिक्षणाचे प्रभावी माध्यम
 
 
ही कला केवळ मनाेरंजनापुरती मर्यादित नसून लाेकशिक्षणाचे प्रभावी माध्यम हाेती, असे डाॅ. गुप्त त्यांनी नमूद केले. चित्रकथी कलाकार गावाेगावी फिरून चित्रांच्या साहाय्याने पाैराणिक कथा सांगत असत, ज्यामुळे सामान्य जनतेपर्यंत नैतिक मूल्ये व धार्मिक ज्ञान पाेहाेचत हाेते. मात्र आधुनिक मनाेरंजन साधनांच्या वाढत्या प्रभावामुळे ही शैली हळूहळू लुप्त हाेत चालल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. सध्या ही चित्रे प्रामुख्याने संग्रहालये किंवा जुन्या वाड्यांतील पाेथ्यांपुरती मर्यादित राहिली आहेत. या कलेच्या पुनरुज्जीवनासाठी स्थानिक कलाकारांना प्राेत्साहन देणे आणि उपलब्ध चित्रांचे संवर्धन करणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
Powered By Sangraha 9.0