मौज-मस्तीसाठी गोव्याला जाताना खंडणी मागणार्‍यांना ठोकल्या बेड्या

01 Mar 2026 21:08:35
वर्धा, 
demanding-ransom-arrested : देवळी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी फिल्मी स्टाईल पाठलाग करून ताब्यात घेत अटक केली. हे आरोपी मौज-मस्ती करण्यासाठी गोवा येथे जात होते. त्यांनी आपल्या वाहनाची कुणालाही माहिती मिळू नये म्हणून वाहनाची नंबर प्लेट काढून ठेवली होती, हे विशेष.
 
 
k
 
 
पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पांडुरंग डफरे (५२) रा. भिडी यांना त्यांच्या गावातीलच राकेश वागन्ना व त्याच्या साथीदारांनी भिडी येथील हायवे लगत सर्व्हिस रोड वरील अतिक्रमण का उठवलं या कारणावरून मारहाण करून खंडणीची मागणी केली. या प्रकरणी पांडुरंग डफरे यांनी देवळी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यावर पोलिसांनीही संबंधित प्रकरणी गुन्ह्याची नोंद घेतली. याच प्रकरणातील आरोपींचा शोध स्थानिक गुन्हे शाखेच्या चमूकडून घेतला जात होता. दरम्यान यवतमाळ जिल्ह्याच्या कळंब येथील हिरा कोहचाडे, अमोल आखाडे, वैभव निखाडे, शुभम सावरकर हे कळंब येथून पसार असल्याची माहिती मिळाली. ते ओळख लपवण्याकरिता पांढर्‍या रंगाच्या कारची नंबर प्लेट काढून समृद्धी मार्गाने गोवा येथे जात असल्याची माहिती मिळाल्यावर स्थानिक गुन्हे अन्वेशन पथकाने अमरावती जिल्ह्याच्या शिवनी टोल प्लाजा वरून नंबर नसलेले कार समृद्धी महामार्गावर चढल्याची माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखा वर्धाचे पथक तातडीने रवाना झाले.
 
 
खंडणी बहाद्दर गोवा येथे पळून जात असतानाच त्यांना कारंजा (लाड) ते मूर्तिजापूर रोडवर सापळा रचून ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाला. पण, पोलिस आल्याची चाहूल लागताच पळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पाठलाग करून पोलिसांनी हिरा कोहचाडे (२८) रा. कळंब, अमोल आखाडे (३२) रा. कळंब, वैभव निखाडे (२९) रा. हलबिपुर ता. कळंब, शुभम सावरकर (२८), रा. कळंब यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी कार, रोख ५३ हजार ९८० रुपये व ८ मोबाईल असा १२ लाख ८९ हजार ९८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे, पोलिस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक विजयसिंग गोमलाडू, मनोज धात्रक, हमीद शेख, महादेव सानप, दिनेश बोथकर, गोविंद मुंडे, विनोद कापसे यांनी केली.
Powered By Sangraha 9.0