पुणे
Maharashtra Heatwave Alert फेब्रुवारी संपताच महाराष्ट्रात उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे आणि मार्च महिन्याच्या पहिल्या दिवशी हवामान विभागाने राज्यभर मोठा अलर्ट जारी केला आहे. येत्या काही दिवसांत राज्यातील बहुतांश भागात तापमानात लक्षणीय वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, कोरडे आणि निरभ्र हवामान राहण्याची शक्यता आहे. नागरिकांना उन्हाचा अधिक त्रास होऊ शकतो, असा इशारा दिला गेला आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील काही दिवस राज्यातील कमाल तापमान सरासरी २ ते ४ अंश सेल्सिअसने वाढू शकते. १ मार्च रोजी प्रामुख्याने कोरडे आणि उष्ण हवामान राहणार असून ढगाळ हवामान किंवा पावसाची शक्यता अत्यंत कमी आहे. त्यामुळे सकाळपासूनच उन्हाचा तडाखा जाणवेल, तर दुपारी उष्णतेची तीव्रता अधिक वाढण्याची शक्यता आहे.
कोकण विभागात उष्णतेसोबत Maharashtra Heatwave Alert दमट हवामान कायम राहण्याची शक्यता असून मुंबई, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये आर्द्रतेमुळे उकाडा अधिक जाणवेल. मुंबई शहरात कमाल तापमान २९ ते ३२ अंश सेल्सिअसपर्यंत आणि किमान तापमान २३ ते २५ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे.पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूरमध्ये हवामान कोरडे आणि उष्ण राहील. पुण्यात दुपारी तापमान झपाट्याने वाढेल, तर रात्री थोडासा गारवा जाणवेल. मराठवाडा विभागात बीड, लातूर, नांदेड, परभणी आणि धाराशिवमध्येही उष्णतेची लाट जाणवण्याची शक्यता आहे. विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि बुलढाणा जिल्ह्यांमध्येही तापमान वाढण्याची शक्यता आहे.हवामान विभागाने नागरिकांना दुपारच्या कडक उन्हात बाहेर जाणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे, हलके आणि सूती कपडे वापरावेत तसेच ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे. मार्चच्या सुरुवातीसच राज्यात उष्णतेची तीव्रता वाढण्याचे संकेत मिळत असून, पुढील काही दिवसांत ही परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.