गोंदिया,
Shirpur check post protest, मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग ५३ वरील देवरी तालुक्यातील शिरपूर येथील परिवहन सीमा तपासणी नाक्यावर ट्रक चालकांची लूट केली जात असल्याचा आरोप करत भंडारा-गोंदियाचे काँग्रेसचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी शनिवारी २८ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास तपासणी नाक्यावर ठिय्या मांडून आंदोलनाला सुरुवात केली. मात्र, स्थानिक शिरपूर येथील काही नागरिकांनी खासदारांच्या या आंदोलनाचा विरोध करून आमचा रोजगार हिरावणार असे बोलून त्यांच्याशी वाद घातला. त्यामुळे गावकरी व खासदारांमध्ये चांगलीच शाब्दिक चकमक झाली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मुबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग-५३ हा गोंदिया जिल्ह्यातून जात असून महाराष्ट्र-छत्तीसगड-ओडीसा-पश्चिम बंगाल-झारखंड तसेच देशातील विविध राज्य व महानगरांना जोडला जाणारा हा एकमेव राष्ट्रीय महामार्ग आहे. या राष्ट्रीय महामार्गावर दिवसातून हजारो वाहनांची वरदळ राहत असून जिल्ह्याच्या व राज्याच्या टोकावर देवरी तालुक्यातील शिरपूर येथे परिवहन विभागाचे सीमा तपासणी नाका आहे. दरम्यान, येथील अधिकारी व कर्मचार्यांकडून या मार्गावरून ये-जा करणार्या वाहनचालक-मालकांकडून तपासणीच्या नावावर अधिकचे पैसे घेऊन त्यांची लूट केली जात असल्याची माहिती खा. पडाळे यांना मिळाली होती. यावर त्यांनी जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तपासणी नाक्याला भेट देवून तेथील अधिकार्यांची कानउघडणी केली व सदर प्रकार बंद करण्याचे निर्देश देत आंदोलनाचा इशाराही दिला होता. मात्र, तपासणी नाक्यावर सदर प्रकार सुरूच असल्याचे खा. पडोळेच्या यांच्या लक्षात येताच त्यांनी पुन्हा शनिवारी २८ फेब्रुवारी रोजी सीमा तपासणी नाका गाठून तेथील अधिकार्यांना धारेवर धरले व चेक पोस्टवरच ठिय्या मांडून आंदोलनाला सुरुवात केली. यावेळी या आंदोलनाची माहिती शिरपूर येथील नागरिकांना मिळताच गावातील पन्नास ते शंभर लोकांनी चेक पोस्ट गाठून खासदारांच्या या आंदोलनाला विरोध दर्शवला. यावेळी त्यांनी या तपासणी नाक्यामध्ये आम्ही आमच्या जमिनी दिल्या असून, आम्हाला इथून रोजगार मिळतो, सीमा तपासणी नाका बंद झाला तर आमचा रोजगार हिरावला जाईल. असे म्हणत खा. पडोळे यांनाच उलट जाब विचारला. यावेळी खा. पडोळे व गावकर्यांमध्ये चांगलीच शाब्दिक चकमक झाली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, देवरी पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मध्यस्थी केली व प्रकरण शांत केले.
तीव्र आंदोलन करणार .
आरटीओ अधिकार्यांकडून वाहन चालकांची लूट केली जात असून आपल्या आंदोलनामुळे तेथील अधिकार्यांचे पितळ उघडे पडणार आहे. त्यामुळे त्यांनीच काही गावकर्यांना हाताशी धरून हा प्रकार घडवून आणला. याप्रकरणी आपण देशाचे पंतप्रधान यांच्यासह परिवहन मंत्री, राज्याचे मुख्यमंत्री व वरिष्ठाकडे तक्रार करणार असून जोपर्यंत योग्य ती कारवाई होणार नाही तोपर्यंत आंदोलन करणार असून तीव्र जनआंदोलन करणार आहे.
- डॉ. प्रशांत पडोळे, खासदार, भंडारा-गोंदिया