शालार्थ आयडी घोटाळा

अचूक असलेल्या केवळ एकाच शिक्षकाचा पगार सुरू

    दिनांक :10-Mar-2026
Total Views |
नागपूर,
school id scam राज्यभरात गाजत असलेल्या नागपूर जिल्ह्यातील शालार्थ आयडी घोटाळ्यात शिक्षण उपसंचालक कार्यालयात नियमित सुनावणी सुरू आहे. आतापर्यंत पूर्ण झालेल्या 431 पैकी 430 नियुक्त्या अवैध ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली. कागदपत्रे आणि इतर पुरावे बरोबर असल्याने सुनील सदाशिव गोवरदीपे नामक शिक्षकाचा पगार सुरू करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. इतर 102 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सुनावणी पूर्ण होऊन निर्णय देणे बाकी आहे.
 

शालार्थ आयडी घोटाळा 
 
 
तर उर्वरित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कार्यवाही अंतिम टप्प्यात असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. या प्रकरणांत आतापर्यंत एकूण 20 आरोपींना अटक करण्यात आली आहे. 430 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यतेचे आदेश जि. प. प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून निर्गमित झालेले नसल्याने ते अवैध ठरवण्यात आले. त्यांना देण्यात आलेले वेतन व भत्त्यांची वसुली शासकीय कोषागारात जमा करण्याची जबाबदारी संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांवर सोपवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. नियुक्ती अवैध असतानाही सेवा ठेवल्यास त्याच्या वेतनाची जबाबदारीही संबंधित शाळा व्यवस्थापनावर सोपवण्यात आली आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी केली असता अनेक गोष्टी समोर आल्या. वैयक्तिक मान्यतेची मूळ नस्ती जि. प. प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात उपलब्ध नाही.school id scam वर्तमानपत्रातील जाहिरातीची मूळ प्रत सादर केली नाही. जि. प. प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात सादर केलेल्या वैयक्तिक मान्यतेच्या प्रस्तावाची पोचपावती सादर केली नाही. संस्था व शाळा समितीच्या ठरावाची मूळ प्रत नाही. मूळ शाळेत नियुक्ती आदेश तसेच मुख्याध्यापकाने रुजू करून घेतलेले प्रतिवेदन नाही. या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती 2010, 2011, 2012, 2013, 2014, 2015 दरम्यान झालेली आहे. मात्र, सर्व शिक्षकांचा पहिला पगार 2019 नंतर सुरू झालेला आहे, असे शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या अहवालात नमूद केले आहे.