महिलांचे विकसित भारतासाठी योगदान

    दिनांक :10-Mar-2026
Total Views |
womens contribution आईच्या नावावरून तिच्या पराक्रमी पुत्रांची ओळख प्राचीन काळापासून केली जात होती. कौशल्या नंदन राम, देवकीनंदन वासुदेव कृष्ण, कौंतेय अर्जुन, राधेय कर्ण आणि शालिवाहन राजघराण्यातील राजा सातकर्णी हा स्वतःची ओळख गौतमीपुत्र सातकर्णी अशी करून द्यायचा. आमची संस्कृती ही मातृपूजकच आहे. माहूरला आईचे श्राद्ध जिथे करतात. त्या तीर्थाचे नाव सुद्धा मातृतीर्थ आहे. संतांची, महापुरुषांची, देवतांची, पराक्रमी पुरुषांची अशी अनेक उदाहरणे आपल्या ग्रंथांमध्ये ठिकठिकाणी आपल्याला आढळून येतील. नुकताच जागतिक महिला दिन साजरा झालेला आहे. जगाला समानतेचे पाठ देणारे अमेरिका आणि युरोप या देशांमध्ये महिलांना समानतेचे अधिकार नव्हते. कामाचे तास, कामाच्या ठिकाणी आवश्यक त्या सुविधा या सुद्धा एकेकाळी नव्हत्या. त्या विरोधात महिला रस्त्यावर उतरल्या आणि त्यातून त्यांनी बदल घडवून आणले. याची स्मृती म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी महिला दिन साजरे केले जाऊ लागले आणि मग याला एके दिवशी जागतिक स्वरूप प्राप्त झाले.
 

महिलांचे विकसित भारतासाठी योगदान 
 
जगामध्ये महिला हक्कांच्या या गोष्टी ज्या वेळेला घडत होत्या, त्याच्या अनेक वर्ष आधी भारतामध्ये ‘‘मेरी झांसी नहीं दूंगी’’ असे म्हणत एक तरुण मुलगी इंग्रजांच्या विरोधामध्ये आपल्या प्रजेच्या आणि राज्याच्या रक्षणार्थ उभी ठाकली होती. ती झाशीची राणी लक्ष्मीबाई होती. तिच्या महिला तुकडीचे नेतृत्व करणारी झलकारी बाई ही महिला सेनानी होती. आमच्या देशाला राणी लक्ष्मीबाई, राणी दुर्गावती, राणी चन्नम्मा, आझाद हिंद सेनेची महिला सेनापती कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन माहीत आहेत. ज्यावेळेस महिला अमेरिकेमध्ये हक्कांसाठी लढत होत्या, त्यावेळेला प्रीतिलता वड्डेदार, शांती घोष, दुर्गा भाभी यासारख्या महिला भारतीय स्वातंत्र्यासाठी लढत होत्या. त्यामुळे जागतिक महिला दिवस हाच केवळ भारतीय महिलांसाठी दिशादर्शक नाही.
तरीसुद्धा जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांची समाजातील सद्य:स्थिती, त्यांच्यासमोरील आव्हाने, विकासासाठी खुणावणारी क्षेत्रे व आगामी काळात विकसित भारतासाठी त्यांचे योगदान या सर्वच बाबींवर विचार करण्याची आवश्यकता आहे. महिला म्हटलं की आपल्यासमोर सगळ्यात पहिले जर कोणती गोष्ट उभी राहत असेल, तर ती म्हणजे कुटुंब. मुलांचे संगोपन, मुलांना संस्कार देणारी आई, घरातील तिची पत्नी, आई, बहीण आणि सून अशा विविध रूपांतील भूमिका. या भूमिकांचा शेकडो वर्षांपासून कुटुंब व्यवस्थेला खूप मोठा आधार मिळत राहिलेला आहे. या सर्व भूमिकांनी कुटुंबाला नेहमीच सावरून धरलेलं होतं.
काळ बदलत गेला. शिक्षण, नोकरी, करीअर, समाजात चालणारे विविध स्त्रीमुक्तीचे प्रवाह, या सर्वच गोष्टींचा परिणाम या भूमिकांवर होत गेलेला आहे. मागच्या तीस वर्षांत खूप मोठे सामाजिक बदल कुटुंब व्यवस्थेमध्ये बघायला मिळालेले आहेत. तीस वर्षांपूर्वी या सर्व भूमिका कायम ठेवत स्त्रियांनी शिक्षण, नोकरी, व्यावसायिक कारकीर्द, सामाजिक कार्य या सर्वच क्षेत्रांमध्ये प्रवेश केला. त्यांनाही या सर्वच क्षेत्रांमध्ये प्रवेश करण्यासाठी, कायम राहण्यासाठी, प्रगती करण्यासाठी संघर्ष करावा लागला.
 
या संघर्षातून वेळेचे व्यवस्थापन हा एक मोठा प्रश्न निर्माण झाला. घरात आणि घराबाहेर वठविलेल्या भूमिकांमुळे साहजिकच परिश्रम वाढले व थकवा सुद्धा येऊ लागला. हळूहळू यातील काही भूमिकांना दिला जाणारा न्याय कमी होत गेला. आपण आपल्या भूमिकांना न्याय देऊ शकत नाही, यामुळे मानसिक संघर्ष सुद्धा निर्माण झाले. कौटुंबिक वाद सुद्धा निर्माण झाले. काही प्रकरणे न्यायालयात दाखल झाली. मुलांचा ताबा कोणाकडे, यासाठी सुद्धा न्यायालयाचे उंबरठे शिजवावे लागू लागले. 2047 हे स्वातंत्र्याचे शंभरावे वर्ष आहे. या वर्षापर्यंत भारत खèया अर्थाने कसा विकसित राहील, याचा विचार करणे आवश्यक आहे. महिलांची यामध्ये मोठी भूमिका राहणार आहे. 1947 मध्ये समाजामध्ये एकत्र कुटुंब पद्धती होती. 75 वर्षांमध्ये ती अति संकुचित झाली. मी, माझी बायको व माझा एखादा मुलगा किंवा मुलगी, इथपर्यंत कुटुंबाची व्याख्या आलेली आहे. आता ती त्याच्याही पुढे जाऊन मुलं नसलेली जोडपी इतकी समोर जाऊ पाहत आहे. त्यामध्ये आई-वडिलांचे स्थान कमी दिसत नाही. येणाèया काळात यातून वृद्धाश्रम आणि ज्येष्ठ नागरिकांच्या मोठ्या समस्या निर्माण होतील. ज्यांनी आपले संपूर्ण जीवन आपल्या मुलाबाळांना सुख-सुविधा, उत्तम शिक्षण देण्याकरिता घालविले आहे, त्याच वृद्धांवर उद्या त्यांनीच उभ्या केलेल्या इमारतींमधून बाहेर निघून वृद्धाश्रमात राहण्याची वेळ येणे हे काही चांगल्या समाजाचे लक्षण नाही.
 
मुला-मुलींचे वाढलेले लग्नाचे वय, लिव्ह इन रिलेशनशिपचे पर्याय, एकल पालक असलेली मुलं, व्यावसायिक कारकीर्दीच्या अवास्तव व्याख्या, या सर्वांना समाजातील मातृशक्ती कसे उत्तर देऊ शकणार याचाही विचार महिला दिनाच्या निमित्ताने होणे आवश्यक आहे. अर्थात, याचे उत्तर फक्त महिलांना शोधायचे नाही, तर महिला आणि पुरुष या दोघांनाही मिळून येणाèया काळामध्ये आमचा समाज आम्हाला कोणत्या दिशेने न्यायचा आहे, याचा विचार करणे गरजेचे आहे.
 
भारतापेक्षा मोठी लोकसंख्या चीनची आहे, परंतु त्यांनी लोकसंख्येला आपली कमतरता बनू दिलेले नाही, तर त्यांनी शक्ती बनविलेले आहे. चीनमध्ये लोकसंख्येच्या 49 टक्के महिला आहेत. त्यांचा सहभाग हा राष्ट्र उभारणीत मोठा आहे. चीनच्या कुटीर उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणावर महिलांचे स्थान आहे. उद्योगांमध्ये सुद्धा ज्या ठिकाणी महिलांच्या अंगभूत गुणांचा उपयोग आहे, अशा सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणावर महिला कामगार, महिला अधिकारी, महिला उद्योजक आहेत. भारतातही अनेक यशस्वी महिला आहेत, ज्यामध्ये बायो कॉन या औषधे क्षेत्रातील कंपनीच्या संस्थापक किरण मजुमदार, वयाच्या पन्नासाव्या वर्षी नायका ही ऑनलाईन सौंदर्यप्रसाधने आणि स्वास्थ्य उत्पादने विकणारी कंपनी स्थापन करणाऱ्या फाल्गुनी नायर, वंदना लुथरा यांची आरोग्य व सौंदर्यप्रसाधने निर्माण करणारी व्हीएलसीसी ही कंपनी आहे. उद्योगाबरोबरच विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा महिला चांगली कामगिरी नोंदवीत आहे. ज्यामध्ये ऋतू श्रीवास्तव या चांद्रयान दोन या मोहिमेच्या मिशन संचालक होत्या, तर मुथया वनिता या प्रोजेक्ट डायरेक्टर होत्या, तर कविता या चंद्रावर विक्रम लँडर उतरविण्याच्या योजनेच्या तांत्रिक प्रमुख होत्या.
 
आज देशामध्ये आणि विदेशांमध्ये सुद्धा लाखोच्या संख्येमध्ये महिला सॉफ्टवेअर क्षेत्रातही कार्यरत आहे. आता सर्वत्र कृत्रिम बुद्धिमत्तेची घोडदौड सुरू आहे. ती समाजाला हितकारक कशी ठरेल, यामध्ये सुद्धा महिलांना आपला सहभाग वाढविण्याची आवश्यकता आहे. संसदेमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण झालेले आहे. ग्रामपंचायतपासून तर संसदेपर्यंत नीती निर्धारणांमध्ये सुद्धा महिलांना आपला सहभाग नोंदवायचा आहे.womens contribution पूर्वीपासूनच महिलांनी या देशांमध्ये सनातन हिंदू धर्म टिकवून ठेवलेला आहे. तो भविष्यातही कसा टिकेल, आमच्या येणाऱ्या पिढीला सुद्धा आम्ही त्यातील जीवनमूल्ये कशी संक्रमित करू शकू, याचाही विचार होणे गरजेचे आहे. एकंदरीत गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत आणि कुटुंबापासून तर चंद्रापर्यंत सर्व क्षितिजे मोकळी आहेत. पूर्वी शाळांच्या भिंतीवर अनेक सुविचार लिहिलेले असायचे. यामध्ये ‘‘विद्या विनयेन शोभते’’ असे लिहिलेले असायचे. हा सुविचार मुला-मुलींना सर्वांनाच लागू आहे. सर्वांनीच त्याचे भान ठेवावे असे वाटते.
अमोल पुसदकर