बनावट टिप्पणीवर चालतो जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचा कारभार

11 Mar 2026 20:15:23
वर्धा, 
district-sports-officers-office : येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच प्रकाशझोतात येत असते. असाच काहीसा गंभीर प्रकार पुन्हा एकदा उजेडात आला असून किरकोळ कामांना मान्यता प्रदान करणे, क्रीडा संकुलातील रिपेअरिंग ऑफ सॅनेटरी, ड्रेन, पाईप लाईन अ‍ॅण्ड चेम्बर्सच्या कामांच्या धनादेशावर स्वाक्षरी करण्यासाठी चक बनावट टिप्पणी तयार करून कामांना मूर्तरुप दिल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे या कामांमध्ये आर्थिक गैरव्यवहाराला खतपाणी देण्याचे काम या कार्यालयातून होत असल्याचे दिसून येत आहे.
 
 
jkj
 
जिल्हा क्रीडा संकुलचे तत्कालीन कार्यासन अनिल निमगडे यांनी झालेल्या खर्चाची आस्थापना शाखेची विचारणा न करता परस्पर खर्च केलेला आहे. त्यामुळे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे आहरण व संवितरण या खात्याची रोखवही तसेच जिल्हा क्रीडा संकुल प्रकल्प खात्याची रोखवही वरिष्ठ लिपीक विश्वास बोकडे यांना अद्ययावत करता आली नाही. जिल्हा क्रीडा संकुल व्यवस्थापन खात्याची रोखवही अद्ययावत करण्याकरिता अनिल निमगडे यांची मदत मागितली असता त्यांनी सहकार्य करण्यास टाळाटाळ केली. क्रीडा संकुल व्यवस्थापन खात्यातून झालेल्या खर्चाची चौकशी सुद्धा सुरू असल्याचे समजते. वारंवार निमगडे यांना सदर खर्चाची सविस्तर माहिती देण्याबाबतची विनंती करण्यात आली. मात्र, त्यांचे सहकार्य न मिळाल्यामुळे व्यवस्थापन खात्याचे रोखवही अद्ययावत झालेले नाही. सदर बाब १ डिसेंबर २०२५ रोजी क्रीडा व युवक सेवा, नागपूर विभाग नागपूरचे उपसंचालक यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर तत्कालीन कार्यासन अनिल निमगडे यांनी झालेल्या खर्चाच्या नस्त्या विश्वास बोकडे यांना रोख नोंदवही लिहिण्याकरिता सोपविल्या.
 
 
झालेल्या खर्चाच्या नस्तीचे अवलोकन केले असता जिल्हा वार्षिक योजना सन २०२३-२४ अंतर्गत जिल्हा क्रीडा संकुलाकरिता व्यायामशाळा विकास अनुदान योजनेतून व्यायामशाळा बांधकामाकरिता ७ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. सदर व्यायामशाळा बांधकाम योजनेचे अंदाजपत्रक सदर नस्तीमध्ये आढळून न आल्याने व्यायामशाळा बांधकामाचे अंदाजपत्रक आयपासमधून काढण्यात आले. सदर आयपासमध्ये लोड करण्यात आलेले अंदाजपत्रक हे नवीन व्यायामशाळा बांधकामाचे असून ७ लाखांचे आहे. जिल्हा वार्षिक योजना सन २०२३-२४ अंतर्गत जिल्हा क्रीडा संकुलात नवीन व्यायामशाळा तयार करण्याकरिता ७ लाख रुपये या कार्यालयास प्राप्त झाले. परंतु, सदर खर्च हा जिल्हा क्रीडा संकुलातील व्यायामशाळा दुरुस्ती करणे या बाबीकरिता १० लाख रुपये खर्च केलेला आहे. जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्हा क्रीडा संकुलात व्यायामशाळा बांधकाम करण्याकरिता प्रशासकीय मान्यता व निधी वितरित झालेला आहे. परंतु, जिल्हा क्रीडा अधिकारी व कार्यासन अधिकारी अनिल निमगडे यांच्या सहमतीने सदर बाब जिल्हा नियोजन समितीतून सुधारणा न करता तसेच कामांची बाब बदलून न घेता व्यायामशाळा दुरुस्तीवर केलेला आहे. या कामाची चौकशी जिल्हा क्रीडा अधिकारी व कार्यासन अनिल निमगडे यांच्यावर लागली असता सदर चौकशीच्या बचावाकरिता ११ मार्च २०२४ ची बनावट टिप्पणी तयार केल्याचे आढळून येत आहे. ११ मार्च २०२४ च्या टिप्पणीमध्ये वरिष्ठ लिपीक विश्वास बोकडे आणि जिल्हाधिकारी यांची रंगीत स्वाक्षरी स्कॅन केलेली आढळून येते. मात्र, सदर टिप्पणीवर बोकडे यांनी स्वाक्षरी केली नसल्याने सदर बनावट टिप्पणीची चौकशी व्हावी, अशी मागणीही कार्यालय वर्तुळातून होत आहे.
 
 
जिल्हा क्रीडा संकुलातील रिपेरिंग ऑफ सॅनेटरी, ड्रेन, पाईप लाईन अ‍ॅण्ड चेम्बर्सच्या कामाचे कंत्राट सुशिक्षित बेरोजगार अभियंता कुंदन ईखार यांना देण्यात आले असून त्यांना कामाचे १० लाख रुपयेही अदा करण्यात आले आहे. मात्र, खर्चाचे अवलोकन केले असता सदर खर्चाचे देयक अदा करण्याकरिता सुद्धा बनावट टिप्पणी तयार करण्यात आली आहे. या टिप्पणीमध्ये सुद्धा वरिष्ठ लिपीक बोकडे आणि जिल्हाधिकारी यांची रंगीत स्वाक्षरी स्कॅन केलेली आढळून येते. सदर खर्चाचे धनादेश संबंधित कंत्राटदारास अदा करतेवेळी जी मूळ टिप्पणी तयार करण्यात आली होती त्या मूळ टिप्पणीमध्ये क्रीडांगण विकास अनुदान २०२३-२४ धनादेशावर स्वाक्षरी करण्याबाबत, असा उल्लेख होता. जिल्हा क्रीडा संकुलाची टिप्पणी कार्यासन अनिल निमगडे हे तयार करीत होते व बोकडे यांची स्वाक्षरी घेत होते. मात्र, सदर बनावट टिप्पणीवर आपण स्वाक्षरी केलेली नसल्याचे लिपीक बोकडे यांचे म्हणणे असून या बनावट टिप्पणीची चौकशी व्हावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
या संदर्भात जिल्हा क्रीडा अधिकारी आशा मेश्राम यांच्यासोबत वारंवार संपर्क केला असता त्यांनी हा विषय मोबाईलवर बोलण्यासारखा नाही कार्यालयात या, असे सांगितले.
Powered By Sangraha 9.0