पंचधारा जलाशयात १७ वर्षीय मुलीची आत्महत्या

11 Mar 2026 21:12:30
सेलू, 
girl-commits-suicide : तालुक्यातील रिधोरा येथील पंचधारा जलाशयात उडी घेऊन १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची घटना बुधवार ११ रोजी दुपारी २.४५ वाजता उघडकीस आली. या प्रकरणी सेलू पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. काजल गजानन रोकडे, रा. गजानननगर आर्वी नाका वर्धा असे मृत मुलीचे नाव आहे.
 
 
h j
 
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, काजल मंगळवारी घराबाहेर पडली होती. ती घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी शोध सुरू केला. मोबाईलचे लोकेशन तपासल्यावर ते सेलू तालुयातील रिधोरा येथील पंचधारा जलाशय परिसर दाखवत होते. कुटुंबीयांनी रिधोरा येथे येऊन पाहणी केली असता जलाशयाजवळ तिची पांढर्‍या रंगाची मोपेड, चपला, पर्स आणि मोबाईल आढळून आले. परिसरात शोध घेऊनही ती सापडली नाही. याबाबत कुटुंबीयांनी सेलू पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच सेलूचे ठाणेदार देवेंद्र ठाकूर यांनी सहकार्‍यांसह घटनास्थळी धाव घेतली. बोटीच्या सहाय्याने जलाशयात शोधमोहीम राबविण्यात आली. दरम्यान, बुधवारी दुपारी २.४५ वाजताच्या सुमारास मुलीचा मृतदेह पाण्यात आढळून आला.
 
 
पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला असून उत्तरीय तपासणीसाठी सेलू ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. मुलीने आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
Powered By Sangraha 9.0