सयाजी शिंदें गोदावरी गौरव पुरस्काराने सन्मानित

11 Mar 2026 11:39:31
नाशिक
Godavari Gaurav Award Nashik कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा ‘गोदावरी गौरव’ पुरस्कार यंदा अभिनेते सयाजी शिंदे, ज्येष्ठ रंगभूमी कलाकार प्रशांत दामले यांच्यासह सहा मान्यवरांना प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात पर्यावरण संवर्धन, नदीप्रदूषण आणि नाट्यसंस्कृती यांसारख्या विषयांवर मान्यवरांनी आपली भूमिका मांडली.
 

Godavari Gaurav Award Nashik 
यावेळी बोलताना अभिनेते सयाजी शिंदे यांनी गोदावरी नदीच्या वाढत्या प्रदूषणाबाबत तीव्र चिंता व्यक्त केली. नद्या या आपल्या शरीरातील रक्तवाहिन्यांसारख्या असल्याचे सांगत त्यांनी नदीप्रदूषण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. मंदिरांमधील निर्माल्य आणि कचरा विशेषतः प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये भरून नदीत टाकण्याच्या प्रकारांचा त्यांनी निषेध केला. अशा प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर कायदा करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
 
 
याच वेळी सयाजी शिंदे यांनी महाकवी कुसुमाग्रज यांच्या शिरवाडे गावात दहा हजार वृक्ष लागवडीचा संकल्प जाहीर केला. दरवर्षी दोन हजार झाडे लावण्याचे नियोजन करण्यात आले असून पहिल्या टप्प्यात दोन हजार वृक्षांची लागवड केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. झाडे लावणे, त्यांचे संगोपन, पाण्याची व्यवस्था तसेच आवश्यक परवानग्या मिळवण्याचे काम सध्या सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.तपोवन परिसरातील वृक्षतोडीविरोधात १२ तारखेला नाशिकमध्ये होणाऱ्या आंदोलनासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. राज्यभरातील पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांनी या मोर्चात सहभागी होऊन पर्यावरण संवर्धनासाठी आवाज उठवावा, असेही त्यांनी नमूद केले. येणाऱ्या काळात झाडे आणि ऑक्सिजन यांचे महत्त्व अधिक वाढणार असल्याचे सांगत त्यांनी पर्यावरण जपण्याची जबाबदारी सर्वांनी घ्यावी, असे आवाहन केले.
 
 
दरम्यान, पुरस्कार स्वीकारताना Godavari Gaurav Award Nashik ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनी नाशिकमधील नाट्यमंदिरांच्या स्थितीचा मुद्दा उपस्थित केला. शहरात अनेक नाट्यमंदिरे असली तरी त्यांची दुरवस्था झाल्याचे त्यांनी सांगितले. नाट्यमंदिरांचे नूतनीकरण आणि दुरुस्ती व्हावी यासाठी महापौरांकडे विनंती केली असून नाशिकमध्ये नवीन नाट्यमंदिर उभारण्याची मागणीही त्यांनी केली आहे.नाट्यमंदिरे ही कलाकार आणि रसिकांच्या गरजा लक्षात घेऊन उभारली जावीत, असे सांगताना त्यांनी अनेक ठिकाणी नाट्यमंदिरे राजकीय कार्यक्रमांसाठी वापरली जात असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. नाट्यमंदिरांमध्ये योग्य सुविधा आणि पुरेशी जागा असणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. नाट्यमंदिरांच्या दुरुस्तीसाठी सरकारकडून प्रयत्न सुरू असले तरी संबंधित समस्या प्रशासनापर्यंत पोहोचल्यास त्यावर तातडीने निर्णय होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.नाशिकमधील भोर नाट्यगृह अद्याप बंद असल्याकडे लक्ष वेधत महापालिकेने यावर तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली. शहराचा विस्तार झपाट्याने होत असताना नाशिकमध्ये आणखी एक नाट्यमंदिर उभे राहण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच महाकवी कालिदास कला मंदिराची स्थितीही समाधानकारक नसल्याची तक्रार त्यांनी यावेळी मांडली.
Powered By Sangraha 9.0