दिग्रसचे शासकीय आयटीआय राज्यस्तर ‘डिपेक्स’ स्पर्धेत द्वितीय

11 Mar 2026 21:25:48
तभा वृत्तसेवा
दिग्रस, 
state-level-deepex-competition : छत्रपती संभाजीनगर येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व सृजन यांच्या संयुक्त विद्यमाने डिपेक्स 2026 राज्यस्तर प्रकल्प व कार्यरत मॉडेल्स प्रदर्शन-स्पर्धा 5 ते 8 मार्च दरम्यान मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आली. या मध्ये सहभागी झलेल्या यवतमाल जिल्ह्यातील दिग्रस शासकीय आयटीआयला द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. या स्पर्धेत राज्यातील विविध पॉलिटेक्निक इंजिनीअरिंग आयटीआय तसेच इतर महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. यामध्ये येथील शासकीय आयटीआय कॉलेजनेही आपला उल्लेखनीय सहभाग नोंदवला.
 
 
y11March-I-T-I
 
या स्पर्धेमध्ये संस्थेच्या वतीने ड्रेस मेकिंग ट्रेडच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या प्रकल्पाला द्वितीय क्रमांक मिळाला असून त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचे नाव उज्ज्वल झाले आहे. विद्यार्थिनींनी सादर केलेला प्रकल्प परीक्षकांना विशेष आवडला व त्याचे सर्वत्र कौतुक करण्यात आले. या प्रकल्पात रोहिणी डांगरे, मोहिनी राठोड आणि नंदिनी चव्हाण या विद्यार्थिनींचा सहभाग होता. तर या प्रकल्पासाठी निदेशक प्रा. चेतना ढोके यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थिनींनी उत्कृष्ट सादरीकरण करून हे यश संपादन केले. या खास यशाबद्दल संबंधित विद्यार्थिनी व मार्गदर्शक शिक्षकांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत असून त्यांच्या या कामगिरीमुळे दिग्रस तालुक्यासह यवतमाळ जिल्ह्याचा गौरव वाढला आहे.
‘डिपेक्स’ 1986 पासून सुरू
 
 
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही संघटना 9 जुलै 1949 पासून विद्यार्थ्यांच्या हितासाठी सातत्याने कार्य करत असून विद्यार्थ्यांमध्ये नावीन्यपूर्ण विचार, संशोधन वृत्ती आणि तांत्रिक कौशल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम राबवत असते. याच उद्देशातून विद्यार्थ्यांमधील नवकल्पना आणि तांत्रिक कौशल्यांना वाव मिळावा यासाठी 1986 साली ‘डिपेक्स’ या राज्यस्तर प्रकल्प प्रदर्शन व स्पर्धेची सुरुवात करण्यात आली आहे.
Powered By Sangraha 9.0