हिंगणघाट,
sameer-kunawar : तालुक्यातील मौजा शेकापूर (बाई) तसेच समुद्रपूर तालुयातील कांढळी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्याच्या प्रस्तावाला गती आणि सिंदी (रेल्वे) येथे ग्रामीण रुग्णालयाच्या स्थापनेबाबत निर्णय प्रक्रियेला चालना देण्यासाठी आ. समीर कुणावार यांच्या विशेष प्रयत्नातून शासनस्तरावर महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार, सुलभ आणि वेळेवर आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने आ. कुणावार यांनी या विषयाचा सातत्याने पाठपुरावा केला आहे.
या संदर्भात आज ११ रोजी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबिटकर यांच्या दालनात चर्चा झाली. बैठकीला आरोग्य सेवा — रुग्णालये विभागाचे संचालक, सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपसचिव, सहसंचालक (रुग्णालये) आरोग्य सेवा, सहसंचालक (प्राथमिक आरोग्य केंद्र) आरोग्य सेवा, उपसंचालक आरोग्य सेवा नागपूर परिमंडळ, जिल्हा शल्य चिकित्सक वर्धा, जिल्हा आरोग्य अधिकारी वर्धा आदी सहभागी झाले होते.
बैठकीदरम्यान शेकापूर (बाई) व कांढळी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून हा प्रस्ताव शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा केला होता. या प्रस्तावातील आवश्यक बाबींचा आढावा घेत अंतिम मंजुरीच्या दिशेने सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे बैठकीत स्पष्ट झाले. तसेच सिंदी (रेल्वे) येथे ग्रामीण रुग्णालय उभारण्याच्या प्रस्तावावरही सकारात्मक चर्चा झाली असून या संदर्भात पुढील कार्यवाही करण्याबाबत संबंधित अधिकार्यांना सूचना देण्यात आल्या.
सध्या शेकापूर (बाई), कांढळी व आसपासच्या ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवांसाठी दूरवर जावे लागत असल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे या भागात तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू होणे आवश्यक असल्याचे आ. कुणावार म्हणाले. त्याचप्रमाणे सिंदी (रेल्वे) येथे प्रस्तावित ग्रामीण रुग्णालय उभारण्यात आल्यास परिसरातील गावांत तातडीची व आरोग्य सेवा उपलब्ध होईल, असेही त्यांनी नमूद केले.
ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांना बळकटी देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे आ. कुणावार यांनी सांगितले.