केडीएमसीत 'या' पदासाठी मोठी रस्सीखेच

    दिनांक :11-Mar-2026
Total Views |
मुंबई
KDMC कल्याण-डोंबिवली महापालिकेत महापौर आणि उपमहापौर पदांची निवड पूर्ण झाल्यानंतर आता स्थायी समिती सभापती आणि सभागृह नेते या दोन महत्त्वाच्या पदांवर राजकीय ताप वाढला आहे. १६ फेब्रुवारी रोजी होणार्‍या महासभेपूर्वीच शिवसेना आणि भाजपमध्ये या पदांसाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे.
 

Kalyan Dombivli Municipal Corporation politics, KDMC Mayor Deputy Mayor election 
भाजपच्या कोर कमिटीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत स्थायी समिती सभापती आणि सभागृह नेते पद भाजपालाच मिळावे, अशी ठाम मागणी करण्यात आली. भाजपचे गटनेते शशिकांत कांबळे यांनी स्पष्ट केले की, भाजपच्या नगरसेवकाला या दोन्ही पदांची मुभा मिळावी, असे पक्ष कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार ठरवले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, महायुती असल्यामुळे वाटाघाटीनंतर स्थायी समिती सभापती पद भाजपकडे जाणार आहे, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 
 
दरम्यान, शिवसेनेचे KDMC कल्याण शहरप्रमुख रवी पाटील यांनी सावध भूमिका घेतली आहे. त्यांच्या मते, महापौर पद शिवसेनेकडे असल्याने स्थायी समिती सभापती आणि सभागृह नेतेपद भाजपकडे जाण्याच्या चर्चेला त्यांनी विरोध दर्शवला. महायुतीतील वरिष्ठ नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी बैठकीत अंतिम निर्णय घेणार आहेत. रवी पाटील यांनी सांगितले की, स्थायी समिती सभापती पद शिवसेनेला मिळणे गरजेचे आहे आणि शहर प्रमुख म्हणून ते स्वतःही या मागणीसाठी आग्रही आहेत.याशिवाय, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात महिलाराजाला प्रोत्साहन देत असल्यामुळे भविष्यातील काही महत्त्वाच्या पदांवर महिला नेत्यांना संधी देण्यात येईल, असा इशारा दिला आहे.महापौर निवडीनंतर आता केडीएमसीतील स्थायी समिती सभापती व सभागृह नेते या दोन महत्त्वाच्या पदांवर महायुतीत तणाव वाढला आहे. १६ फेब्रुवारी रोजी होणार्‍या महासभेनंतर या पदांवर कोणाची वर्णी लागते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.