गोंदिया,
bhajepar-gram-panchayat : सालेकसा तालुक्यातील स्मार्ट ग्रामपंचायत भजेपारने शैक्षणिक क्रांतीचा अत्यंत प्रेरणादायी नवा अध्याय सुरू केला असून जीर्ण इमारतीतून सुरू झालेला येथील वाचनालयाचा प्रवास आता अत्याधुनिक डिजिटल वातानुकूलित वाचनालयापर्यंत पोहचलेला आहे. अवघ्या २११६ लोकसंख्येच्या गावात तब्बल तीन वाचनालये विद्यार्थ्यांच्या सेवेत निःशुल्क सुरू असून शाश्वत विकासाची ही सोनेरी पहाट जिल्ह्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
भजेपारवासियांनी २०१३ मध्ये मोडकळीस आलेल्या जीर्ण अंगणवाडीच्या इमारतीत लोकसहभागातून वाचनालयाची मुहूर्तमेढ रोवली होती. बघता बघता या वाचनालयातून निघणार्या यशवंत विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढल्याने इतर विद्यार्थ्यांचे पाय आपोआप वाचनालयाच्या दिशेने वळू लागले. दरम्यान, वाचनालयात अनेकांना जागा मिळेनाशी झाल्याने ग्राम पंचायतीने नदीटोला आणि माताटोला या दोन पाड्यातील युवकांसाठी नदीटोला येथील जि.प. शाळेत २०२४ यावर्षी स्वतंत्र वाचनालय सुरु केले. यानंतर खनिज निधीतून नवीन वाचनालयाचा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर शहरातील खासगी वाचनालयालाही लाजवेल असे अत्याधुनिक डिजिटल वातानुकूलित नवीन तिसरे वाचनालय १२ जानेवारी २०२६ पासून सुरु करण्यात आले.
यात विद्यार्थ्यांना बसण्यासाठी स्वतंत्र कंपार्टमेंट, प्रत्येक कंपार्टमेंटमध्ये चार्जिंग पॉईंट, सीसीटीव्ही सुरक्षा, वायफाय, पिण्यासाठी आरोचे पाणी, मुले आणि मुलींसाठी स्वतंत्र आधुनिक स्वच्छतागृह, संगणक संच अशा सर्वच अत्याधुनिक सुविधा निःशुल्क उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. विशेष म्हणजे अवघ्या २११६ लोकसंख्येच्या गावात तब्बल तीन वाचनालये सुरू असणारे आणि विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळणारे भजेपार हे एकमेव गाव असल्याचे बोलले जात आहे. गावातील कोणताही विद्यार्थी शिक्षणात मागे राहू नये यासाठी वेळोवेळी निःशुल्क शिकवणी वर्ग, तज्ञांचे मार्गदर्शन आणि ईतर सर्वतोपरी मदत केली जात असून आतापर्यंत येथील शासकीय सेवेत दाखल होणार्या यशवंत विद्यार्थ्यांची संख्या ४६ वर पोहचल्याची अधिकृत नोंद आहे.
महाराष्ट्रातील पहिले ‘एसी’ वाचनालय!
मोठ्या शहरांमध्ये व्यावसायिक वातानुकूलित वाचनालय आहेत. परंतु कुठल्याही खेडेगावात अत्याधुनिक, डिजिटल वातानुकूलित वाचनालय नसून सर्वसाधारण वाचनालये ही गावागावात उपलब्ध आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत संचालित महाराष्ट्रातील पहिले ‘एसी’ वाचनालय हे भजेपार मध्येच उपलब्ध असून गोंदिया जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब आहे.
ग्रामस्थांचे मोठे योगदान
एकवेळ गावात भौतिक सुविधा कमी पडल्या तरी हरकत नाही, त्याची भरपाई कधीही करता येईल. परंतु शिक्षणात मागासलेले गाव प्रगती करू शकत नाही. त्यामुळे शिक्षणावर केलेली गुंतवणूक ही सर्वात महत्त्वाची आहे. नेमकी हीच गोष्ट ध्यानी घेऊन ग्रामस्थांनी गावातील वाचनालय चळवळीला मोठे करण्यासाठी जे योगदान दिले ते प्रेरणादायी आहे.
- चंद्रकुमार बहेकार, सरपंच ग्रामपंचायत भजेपार