अर्जुनी मोरगाव (गोंदिया),
rajkumar-badole : महाराष्ट्र राज्याचा ७,६९,४६७ कोटींचा अर्थसंकल्प सादर झाला असून, यामध्ये अनुसूचित जाती आणि जमातींच्या कल्याणासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात निधीचे वाटप करण्यात यावे, अशी आग्रही मागणी माजी मंत्री तथा विद्यमान आमदार राजकुमार बडोले यांनी केली आहे. अर्थसंकल्पीय चर्चेदरम्यान त्यांनी सामाजिक न्याय, आरोग्य आणि स्थानिक प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधले.
बडोले यांनी आपल्या भाषणात अनुसूचित जाती उपयोजनेसाठी एकूण अर्थसंकल्पाच्या ११.८० टक्के प्रमाणे साधारण ९०,९९७ कोटी रुपयांचा निधी मिळणे अपेक्षित आहे. राज्याचा ५६ टक्के महसुली खर्च हा पगार, पेन्शन आणि व्याजाच्या हप्त्यांवर होत असताना, विकास योजनांसाठी निधीची कमतरता भासू नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी महात्मा जोतिबा फुले यांच्या २०० व्या जन्मोत्सवानिमित्त आणि संत गाडगे बाबा यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त राबवल्या जाणार्या सामाजिक उपक्रमांचे त्यांनी स्वागत केले. दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना आणि छत्रपती शाहू महाराज परदेशी शिष्यवृत्तीचा निधी विद्यार्थ्यांना वेळेवर उपलब्ध करून देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. यादरम्यान, गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांध येथे ‘झाडीपट्टी अकॅडमी’ स्थापन करण्याची मागणी लावून धरत धान उत्पादक शेतकर्यांच्या समस्या सोडवून त्यांना १२ तास वीज पुरवठा देण्याची विनंती केली. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनच्या अभावामुळे होणार्या मृत्यूंच्या घटनांवर त्यांनी चिंता व्यक्त करून आरोग्य सुविधा तातडीने सुधारण्याची मागणी केली. दरम्यान, अर्थसंकल्पाला पाठिंबा दर्शवतानाच, सामाजिक न्यायाच्या दृष्टीने या सुधारणा अंमलात आणल्यास सर्वसामान्यांना त्याचा मोठा दिलासा मिळेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.