पुणे
Medha Kulkarni देशात रस्ते अपघातांचे प्रमाण चिंताजनक पातळीवर पोहोचले असून, त्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज आहे, अशी आग्रही मागणी राज्यसभेच्या खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी संसदेत केली. बेफिकीर वाहनचालक, मद्यपान करून वाहन चालवणे, तसेच सोशल मीडियासाठी रस्ते आणि महामार्गांवर रील किंवा फोटोशूट करण्याची वाढती प्रवृत्ती ही अपघातांची नवी आणि गंभीर कारणे ठरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
२०२४ मध्ये देशात सुमारे १.७८ लाख लोकांचा रस्ते अपघातांमध्ये मृत्यू झाला असून, याचा परिणाम दररोज शेकडो कुटुंबांवर होतो. विशेषतः १८ ते ३४ वयोगटातील तरुणांचा सहभाग सुमारे ६० टक्के असल्यामुळे ही बाब अधिक चिंताजनक आहे. महाराष्ट्रात आर्थिक सर्वेक्षणानुसार, २०२४ मध्ये ३६,०८४ रस्ते अपघात नोंदवण्यात आले असून, त्यात १५,३३५ जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्यातही परिस्थिती गंभीर असून, पुणे पोलिसांच्या आकडेवारीनुसार २०२४ मध्ये १,४०४ अपघातांमध्ये ३२० जणांचा मृत्यू झाला आणि १,३२० जण जखमी झाले. तुलनेत २०२३ मध्ये अपघातांची संख्या १,२३० होती.डॉ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या की, सोशल मीडियासाठी रस्त्यांवर फोटोशूट किंवा रील बनवण्यामुळे वाहतुकीत अडथळे निर्माण होत आहेत आणि अपघातांचा धोका वाढला आहे. मोटार वाहन कायदा १९८८ अंतर्गत मद्यपान करून वाहन चालवणे व बेफिकीर वाहनचालकांवर कठोर शिक्षेची तरतूद असली तरी अनेक ठिकाणी त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नाही.त्यांनी सरकारकडे मागणी केली की मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर व धोकादायक वाहनचालकांवर किमान कठोर शिक्षा निश्चित करावी, रस्ते अपघातांशी संबंधित मृत्यू प्रकरणांसाठी फास्ट Medha Kulkarni ट्रॅक न्यायालये स्थापन करावीत, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित वेग शोध प्रणाली, ब्रेथ ॲनालायझर व सीसीटीव्ही यांचा व्यापक वापर करावा. तसेच मुंबई-पुणे द्रुतगती मार्गासारख्या उच्च वेगाच्या मार्गांवर अपघातप्रवण ठिकाणांचे नियमित सुरक्षा लेखापरीक्षण केले जावे, अशीही मागणी त्यांनी केली.शाळा आणि महाविद्यालयांमध्ये रस्ते सुरक्षा व जबाबदारीने वाहन चालवण्याची जनजागृती मोहीम राबवावी, तसेच अपघातग्रस्त व त्यांच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत मिळावी, अशीही प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी संसदेत यावेळी सुचवली.
रस्ते अपघातांविरोधातील या उपाययोजनांचा अवलंब होणं अत्यंत गरजेचे आहे, कारण प्रत्येक अपघात ही केवळ एक आकडा नसून अनेक कुटुंबांची आयुष्यभराची कहाणी बदलणारी घटना आहे.