...अखेर सौंदड ग्रामीण रुग्णालयातील घटनेची चौकशी होणार

11 Mar 2026 20:12:01
अर्जुनी मोरगाव,
saund-rural-hospital : अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघातील सौंदड येथील ग्रामीण रुग्णालयात ३ मार्च रोजी घडलेल्या अत्यंत दुर्दैवी घटनेच्या अनुषंगाने आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी आ. राजकुमार बडोले यांनी राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांना पत्राद्वारे विनंती केली होती. या अनुषंगाने आरोग्यमंत्र्यांच्या मुंबई येथील शासकीय निवासस्थानी आढावा बैठक घेत सौंदड ग्रामीण रुग्णालयात घडलेल्या घटनेबाबत सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी, रुग्णालयातील सुविधा, मनुष्यबळ व सेवा व्यवस्था यांचा आढावा घेत घटनेची सखोल चौकशी करण्याचे निर्देश आरोग्यमंत्री आबिटकर यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिले.
 
 
 
saund-rural-hospital
 
 
 
या बैठकीला सहसंचालक (रुग्णालय) डॉ. सुनिता गोलाईत, सहसंचालक (प्राथमिक आरोग्य केंद्र) डॉ. सरिता हजारे, आरोग्य उपसंचालक डॉ. शशिकांत शंभरकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पुरुषोत्तम पटले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार उपस्थित होते. तसेच माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष यशवंत गणवीर व माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर तरोणे यांनीही बैठकीला हजेरी लावली. प्रसंगी सडक अर्जुनी येथे वरिष्ठ अधिकार्‍यांची बैठक घेण्याचे आदेश देत सौंदड येथील घटनेच्या संदर्भात विशेष समिती स्थापन करून सखोल चौकशी करण्यात यावी, त्यातून सुधारणा सूचना व कार्यवाही अहवाल शासनास सादर करण्यात यावा, असे निर्देशही आरोग्यमंत्र्यांनी दिले. दरम्यान, मतदारसंघातील नागरिकांना दर्जेदार व सक्षम आरोग्य सेवा मिळावी यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करीत असून भविष्यात अशा दुर्दैवी घटना घडू नयेत, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येणार असल्याचे आ. राजकुमार बडोले यांनी यावेळी सांगितले.
Powered By Sangraha 9.0