टी-२० विजयानंतरही शिवम दुबे चक्क रेल्वेने परतला घरी!

    दिनांक :11-Mar-2026
Total Views |
मुंबई,
Shivam Dubey returned home by train भारतीय क्रिकेट संघाने अलीकडेच टी-२० विश्वचषक जिंकत देशभरात आनंदाची लाट निर्माण केली. अहमदाबाद येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडवर एकतर्फी विजय मिळवत सलग दुसऱ्यांदा आणि एकूण तिसऱ्यांदा हा किताब आपल्या नावावर केला. या विजयानंतर संघातील खेळाडू आपापल्या घरी परतले. मात्र संघाच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या एका खेळाडूने घरी जाण्यासाठी वेगळाच मार्ग निवडला. अष्टपैलू खेळाडू शिवम दुबेने विमानाऐवजी रेल्वेने प्रवास करत शांतपणे मुंबईकडे प्रस्थान केले. अंतिम सामन्यात त्याने केवळ आठ चेंडूत पंचवीस धावांची झंझावाती खेळी करत संघाच्या विजयात हातभार लावला होता. सामना संपल्यानंतर काही तासांतच तो पत्नी आणि एका मित्रासह मुंबईकडे निघाला. मात्र अहमदाबादहून मुंबईला जाणाऱ्या विमानांची सर्व तिकिटे भरलेली असल्यामुळे त्याला रेल्वेने जाण्याचा निर्णय घ्यावा लागला.
 
Shivam Dubey
 
रेल्वेची तिकिटे मिळाली तरीही पहिल्या दर्जाऐवजी तिसऱ्या वातानुकूलित डब्यातील जागा उपलब्ध होती. त्यामुळे त्याने त्याच डब्यात तीन तिकिटे घेतली आणि शांतपणे रेल्वे स्थानक गाठले. ओळख पटू नये म्हणून दुबेने टोपी आणि मुखपट्टी लावली होती. स्थानकावर चाहत्यांची मोठी गर्दी असल्याने त्याने पत्नी आणि मित्राला आधी पाठवले आणि गाडी सुटण्याच्या काही मिनिटे आधीच तो डब्यात चढला.गाडीत चढल्यानंतर तो थेट वरच्या जागेवर जाऊन झोपून गेला. तिकीट तपासणी करताना तपासनीसाने त्याचे नाव पाहून आश्चर्य व्यक्त केले आणि तो क्रिकेटपटू आहे का अशी चौकशी केली. मात्र त्याच्या पत्नीने ते नाकारल्याने पुढील चर्चा थांबली. अखेर दुबे शांतपणे मुंबईपर्यंत पोहोचला. मुंबईत पोहोचल्यानंतर स्थानकावर ओळख पटण्याची शक्यता लक्षात घेऊन त्याने स्थानिक पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी त्याला सुरक्षितपणे घरापर्यंत पोहोचवले. दुबेने नंतर सांगितले की, आपल्या दोन मुलांना लवकरात लवकर भेटण्याची त्याची घाई होती, म्हणूनच त्याने कोणताही गाजावाजा न करता रेल्वेने प्रवास करण्याचा निर्णय घेतला.