स्कंदपुराण

    दिनांक :11-Mar-2026
Total Views |
स्कंदपुराण
skandapurana 18 पुराणातील मोठे पुराण म्हणून या पुराणाचा उल्लेख आहे. स्कंद हे नाव भगवान शिव आणि पार्वती यांचे पुत्र कार्तिकेय यांचे नाव आहे. खरं तर हे पुराण भगवान शिवांनी पार्वतीला सांगितले. पार्वतींनी हे पुराण आपला पुत्र कार्तिकेय म्हणजे स्कंदाला सांगितले. स्कंदाने ते नंदींना सांगितले. नंदी भगवंताने दत्तांना सांगितले. दत्तांनी व्यास महर्षी यांना तर व्यासांनी ते सुतांना सांगितले. या पुराणाचे विशेष विश्लेषण स्कंद यांनी सांगितले म्हणून या पुराणाला स्कंद पुराण म्हणतात.
 

स्कंदपुराण 
 
सुप्रसिद्ध सत्यनारायण कथा याच पुराणातील कथा आहे. प्रसिद्ध असे सोमवार व्रत, शिवरात्री व्रत, प्रदोष व्रत, एकादशी व्रत याच पुराणात असून सर्वत्र साजरा होणारा व्यंकटेश-पद्मावती विवाह सोहळा सर्वप्रथम याच पुराणात आहे. भगवान जगन्नाथाची काष्ठमयी प्रतिमा कथा, नर्मदा परिक्रमा महिमा इथेच आहे. अल्पभेद असलेले सुप्रसिद्ध विष्णुसहस्रनामही इथेच आहे. तुळशी विवाह सोहळा या पुराणात आहे. दिवाळी सण म्हणजे वसु-बारस ते भाऊबीज या दिवसाचे महिमान आणि त्याचा विधी, परंपरा या पुराणात सांगितल्या आहेत. विशेषत: लक्ष्मीपूजन आणि भाऊबीज याचा विशेष उल्लेख आहे. आवळीचे पूजन अावळ्याखाली दीपपूजन इथे आहे. याशिवाय महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा होणारा भाद्रपदातील ज्येष्ठा गौरीपूजन विधी आणि महात्म्य याच पुराणात आहे. अक्षयतृतीया साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्ताचे महत्त्व इथेच आहे.
 
या पुराणाचे सात खंड म्हणजे भाग आहेत. माहेश्वर खंड, वैष्णव खंड, ब्राह्म खंड, काशी खंड, अवंती खंड, नागर खंड आणि प्रभास खंड असे सात खंड असून काशी खंड आणि रेवा खंड प्रसिद्ध आहेत. सत्यनारायण कथा रेवाखंडात आहे. सातही खंडांचे उपखंड किंवा उपविभाग आहेत. स्कंदपुराण संहितात्मक विभागले आहे. सनत्कुमार संहिता, शंकर संहिता, ब्राह्मसंहिता, सौर संहिता, वैष्णव संहिता, सूत संहिता असे विभाजन आहे. या पुराणात बदरीकाश्रम, अयोध्या, प्रभास क्षेत्र अशा विविध तीर्थांचे वर्णन आहे. गंगा, यमुना, सरस्वती, नर्मदा या नद्यांच्या उद्गम कथा याच पुराणात आहेत. रामायण, भागवत इत्यादी ग्रंथांचे महात्म्य इथे सांगितले आहे.
 
सती चरित्र, दक्षयज्ञ, पार्वती जन्म, शिव-पार्वती विवाह, कार्तिकेय म्हणजे स्कंद जन्म, तारकासुर वध कथा या पुराणात आहे. विश्वकर्म्याच्या तपासून वृत्रासुर उत्पत्ती, दधीची ऋषी द्वारा अस्थिदान ही कथा, वराह अवतार, वामनादी दश अवतार कथा यात आहेत. रामेश्वर धनुष्कोटी येथील राम सेतू, गोकर्ण क्षेत्र सोबतच रुद्राक्ष, रुद्राध्यायी, शालिग्राम विग्रह, नर्मदेश्वर शिवलिंग महिमा या पुराणात आहे.skandapurana विंध्य-नारद संवाद, स्कंद-अगस्ती संवाद, जय-विजय चरित्र, घटोत्कच विवाह, बर्बरिक जन्म इत्यादी कथा या पुराणात आहे. बर्बरिक ज्यांना आपण खाटू श्याम म्हणतो, त्यांची यथार्थ कथा, त्यांचे सामर्थ्य, भगवान कृष्णाने त्यांचे मस्तक का उडविले, मस्तकाला पूजनीय स्थान देऊन त्यांना मिळालेले वरदान पूर्ण केल्याची कथा स्कंद पुराणात आहे.
काशीचे महात्म्य, शिवांचे काशीत आगमन, मणिकर्णिका उत्पत्ती कथा, विश्वनाथ वैभव, काशीतील विविध लिंग, काशियात्रा फळ असे काशीचे महत्त्व याच पुराणात आहे. कार्तिक महिन्याचे महत्त्व, कार्तिक स्नान, मार्गशीर्ष महात्म्य, वैशाख महात्म्य इथे दिले आहे. रघू राजा आणि कौत्साची दसèयाची कथा, दत्तावतार कथा, उज्जैन महाकाल, क्षिप्रा महिमा, ओंकार मांधाता, अमरकंटकचे महत्त्व या पुराणात आहे. स्त्रीभ्रूण हत्या त्या काळात होत नसत; कारण स्कंद पुराणात कन्येचे महत्त्व खूपच सुंदर विशद केले आहे.
 
‘दशपुत्रसमा कन्या दशपुत्रान्प्रवर्द्धयन् ।
यत्फलं लभते मर्त्यस्तल्लभ्यं कन्ययैकया ।।’
एका मुलीचे पालनपोषण दहा पुत्रांच्या पालनासमान असा स्पष्ट संकेत या पुराणात आहे. वृक्षारोपणाचे महत्त्व आणि त्यातल्या त्यात प्राणवायू देणारे, फळफळावळ देणारे तथा औषधीय वनस्पती यांचे संवर्धन केल्यास पुण्य लाभते, हे स्कंद पुराण वृक्षांच्या नावासह सांगते.
‘अश्वत्थमेकं पिचुमन्दमेकं न्यग्रोधमेकं दश चिञ्चिणीकान् ।
कपित्थबिल्वाऽऽमलकत्रयञ्च पञ्चाऽऽम्रमुप्त्वा नरकन्न पश्येत् ।।’
जो कोणी एक पिंपळ, एक कडूलिंब, एक वटवृक्ष, दहा चिंचेची झाडे, तीन कविट, तीन बेल, तीन आवळा आणि पाच आंब्याची झाडे लावतो त्याला नरकाचे तोंडही दिसत नाही तर तो स्वर्गात स्थान मिळवितो. स्कंद पुराण हे यथार्थ पुराण असून व्यष्टी, समष्टी, सृष्टी आणि परमेष्ठी विचार मांडणारे सुंदर पुराण आहे. सर्वांनी ते अवश्य वाचले पाहिजे.
प्रा. दिलीप जोशी
वाशिम/9822262735
---