नवी दिल्ली,
West Indies team begins returning home २०२६ च्या टी-२० विश्वचषकाचा समारोप झाल्यानंतर भारतीय संघाने विजेतेपद पटकावत देशभरात आनंदाची लाट निर्माण केली. ८ मार्च रोजी अहमदाबाद येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारताने विजय मिळवल्यानंतर खेळाडू आपल्या घरी परतले. मात्र त्याच स्पर्धेत सहभागी झालेल्या वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना अजूनही मायदेशी पोहोचण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. जवळपास दहा दिवस उलटूनही ते भारतातच अडकून पडले होते. अखेर वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळानेच नियमित उड्डाणांची तिकिटे काढून खेळाडूंना टप्प्याटप्प्याने मायदेशी पाठवण्याचा निर्णय घेतला. मंडळाने दिलेल्या माहितीनुसार काही खेळाडू १० मार्च रोजी परतले, तर उर्वरित खेळाडू आणि सहाय्यक कर्मचारी ११ मार्च रोजी कोलकाता मार्गे प्रवासाला निघणार आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने खेळाडूंना परत पाठवण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र विविध कारणांमुळे त्यात वारंवार विलंब होत राहिला. दरम्यान, केवळ वेस्ट इंडिजच नव्हे तर दक्षिण आफ्रिकेचा संघही अद्याप भारतात असल्याची माहिती आहे. या संघाने ४ मार्च रोजी उपांत्य सामना खेळल्यानंतरही त्यांच्या मायदेशी परतण्याची व्यवस्था झालेली नाही. याउलट इंग्लंडचा संघ ५ मार्च रोजी उपांत्य फेरीत पराभूत झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत विशेष विमानाने मायदेशी रवाना झाला. त्यामुळे काही संघांना तातडीने व्यवस्था मिळाली, तर इतर संघांना प्रतीक्षा का करावी लागली, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
१ मार्च रोजी भारताविरुद्ध झालेल्या सामन्यानंतर वेस्ट इंडिजचा प्रवास संपुष्टात आला होता. त्या सामन्यात पराभव झाल्याने त्यांची स्पर्धेतील वाटचाल थांबली. त्यानंतर खेळाडूंनी मायदेशी परतण्याची तयारी केली होती. मात्र त्याच काळात पश्चिम आशियात तणाव वाढला. २८ फेब्रुवारी रोजी इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर हल्ला केल्यानंतर परिस्थिती अधिक चिघळली. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने इस्रायल तसेच आखाती देशांतील अमेरिकन तळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केल्याची माहिती समोर आली. या तणावामुळे त्या भागातील हवाई क्षेत्रावर निर्बंध घालण्यात आले आणि अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली. भारतातून पश्चिमेकडे जाणारी अनेक उड्डाणे दुबईमार्गे जात असल्याने या मार्गावर मोठा परिणाम झाला. परिणामी वेस्ट इंडिजचे खेळाडू भारतातून बाहेर पडू शकले नाहीत.