पत्नीने केल्या मारहाणीत पतीचा मृत्यू

11 Mar 2026 21:15:37
अमरावती, 
wife-beaten-husband-dies : वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खारतळेगाव येथे एका ३३ वर्षीय पत्नीने ४२ वर्ष पतीला मारहाण केली. या मारहाणीत पतीचा मृत्यू झाला. या प्रकरणी वलगाव पोलिसांनी मृतकाच्या पत्नीविरुद्ध बुधवारी (दि. ११) दुपारच्या सुमारास खुनाचा गुन्हा दाखल केला.
 
 
l;
 
मंगेश देविदास गोटे (४२, रा. खारतळेगाव) असे मृतकाचे तर छाया असे त्याच्या पत्नीचे नाव आहे. मंगेश हा दारू पिण्याच्या सवयीचा होता. तो अनेकदा दारू पिऊन पत्नीला त्रास देत होता. यातूनच त्यांच्यात नेहमी खटके उडायचे. दरम्यान मंगळवारी (दि. १०) मंगेश आणि छाया यांचे कडाक्याचे भांडण झाले. यावेळी रागाच्या भरात पत्नी छायाने पतीला मारहाण केली. त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. उपचारादरम्यान मंगळवारी सायंकाळी मंगेशचा मृत्यू झाला. त्यावेळी बाह्यजखमा मंगेशच्या शरीरावर दिसत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान बुधवारी सकाळी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल पोलिसांना प्राप्त झाला. त्यावेळी अंतर्गत जखमांमुळे मृत्यू झाल्याचे समोर आले. त्यामुळे वलगाव पोलिसांनी या प्रकरणात मंगेशच्या पत्नीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. अशी माहिती पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी दिली आहे.
Powered By Sangraha 9.0