दारव्हा,
तालुक्यातील लाखखिंड येथे शेतातील विहिरीत पडलेल्या Leopard बिबट्याला वनविभागाच्या पथकाने अत्यंत दक्षतेने सुखरूप काढत यशस्वी बचावकार्य केले. मंगळवार १० मार्च रोजी सकाळी सुमारे ९.३० वाजता लाखखिंड येथील शेतकरी रमेश महादेव जाधव यांनी त्यांच्या शेतातील विहिरीत बिबट पडल्याची माहिती दूरध्वनीद्वारे वनविभागाला दिली. माहिती मिळताच वनविभागाचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान बिबट पाहण्यासाठी मोठ्या सं‘येने ग‘ामस्थांची गर्दी झाली होती. संभाव्य धोका लक्षात घेता मदतीने नागरिकांना सुरक्षित अंतरावर हलविण्यात आले व परिसरात आवश्यक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली. यानंतर यवतमाळ वन्यजीव बचाव पथक व दारव्हा वनपरिक्षेत्र कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने बचावकार्य हाती घेतले. विशेष खबरदारी घेत बचाव साधनांच्या सहाय्याने बिबट्याला कोणतीही इजा न होता सुरक्षितपणे विहिरीतून बाहेर काढण्यात आले.
Leopard बिबट नर जातीचा त्याचे अंदाजे वय १२ ते १४ महिने असल्याचे वनअधिकार्यांनी सांगितले. बिबट्याची प्राथमिक वैद्यकीय तपासणी दारव्हा येथील पशुधन विकास अधिकारी व पशुवैद्यकीय चिकित्सालयातील डॉक्टरांनी केली. तपासणीत बिबट्याची शारीरिक स्थिती समाधानकारक असल्याचे आढळून आले. तो पुनर्वसनासाठी योग्य असल्याचे प्रमाणित करण्यात आले आहे. पुढील निरीक्षणासाठी त्याला काही दिवस वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात येणार हे संपूर्ण वन्यजीव बचावकार्य उपवनसंरक्षक यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपविभागीय वनाधिकारी दारव्हा यांच्या उपस्थितीत यशस्वीरीत्या पार पडले. यावेळी दारव्हा पोलिस ठाण्याचे ठाणेदार मुळे व त्यांची चमू, दारव्हा वनपरिक्षेत्र, नेर वनपरिक्षेत्र अधिकारी तसेच यवतमाळ वन्यजीव बचाव पथक उपस्थित होते. परिसरात वन्यप्राणी आढळल्यास तत्काळ वनविभागाला माहिती द्यावी व कोणतीही धोकादायक कृती गर्दी टाळावी, असे आवाहन वनविभागाने नागरिकांना केले आहे.