मालेगाव,
ACB trap Maharashtra, आईच्या निधनानंतर जमिनीच्या हिश्यासाठी आवश्यक असलेला मृत्यूचा दाखला देण्यासाठी २५०० रुपयांच्या लाचेची मागणी करणार्या डोंगरकिन्ही ता. मालेगाव येथील ग्रामपंचायत शिपायाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी रंगेहात पकडले. राजेश बळीराम बाविस्कर (वय ५४) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
तक्रारदार यांच्या आईचे निधन झाले होते. कौटुंबिक शेतजमिनीची हिस्सेवाटणी करण्यासाठी त्यांना आईच्या मृत्यू दाखल्याची अत्यंत गरज होती. हा दाखला मिळवण्यासाठी त्यांनी डोंगरकिन्ही ग्रामपंचायतीचे शिपाई राजेश बाविस्कर यांच्याकडे विचारणा केली. मात्र, दाखला मीच तयार करून देतो, पण त्यासाठी अडीच हजार रुपये द्यावे लागतील. पैसे दिले नाही तर दाखला मिळणार नाही, अशी भूमिका बाविस्कर यांनी घेतली. शासकीय कामासाठी लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेऊन तक्रार नोंदवली.
एसीबीने ११ मार्च रोजी दुपारी या तक्रारीची पडताळणी केली. यावेळी पंचासमक्ष बाविस्कर यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. तडजोडीअंती २ हजार रुपये स्वीकारण्याचे बाविस्कर यांनी मान्य केले. त्यानंतर रचलेल्या सापळ्यात, लाचेची रक्कम स्वीकारून ती शर्टाच्या खिशात ठेवताच दबा धरून बसलेल्या पथकाने बाविस्कर यांना जागीच ताब्यात घेतले. आरोपीच्या अंगझडतीमध्ये लाचेची २ हजार रुपयांची रक्कम आणि मोबाईल जप्त करण्यात आला आहे. मालेगाव पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७ व ७ -अ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपीच्या घराची झडतीही घेतली जात आहे. ही कारवाई अमरावती एसीबीचे पोलिस अधीक्षक बापू बांगर, अप्पर पोलिस अधीक्षक सचिन शिंदे, पोलिस उपअधीक्षक जगदीश परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अल्का गायकवाड, पोलिस निरीक्षक बालाजी तिप्पलवाड आणि त्यांच्या पथकाने यशस्वी केली