इराण युद्धात अमेरिका विजयी!डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

12 Mar 2026 09:54:50
वॉशिंग्टन,
America wins in Iran war मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षाने आणखी तीव्र रूप धारण केले आहे. गेल्या काही दिवसांपासून इराणवर अमेरिका आणि इस्रायलकडून सातत्याने हल्ले केले जात असल्याची माहिती समोर येत आहे, तर त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणकडूनही जोरदार प्रतिहल्ले होत आहेत. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा दावा करत अमेरिका या युद्धात विजयी झाल्याचे म्हटले आहे.ट्रम्प यांनी सांगितले की इराणमध्ये लक्ष्य करण्यासारखी महत्त्वाची ठिकाणे उरलेली नाहीत आणि देशाची मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. त्यांनी पुढे असा दावाही केला की इराणमधील अनेक महत्त्वाचे नेते मारले गेले असून समुद्रातील इराणशी संबंधित ५८ जहाजे बुडवण्यात आली आहेत.
 
 
 Iran war trump
 
दरम्यान, इराणनेही अमेरिकेला कठोर इशारा दिला आहे. तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढू शकतात आणि प्रति बॅरल दर २०० डॉलरपर्यंत जाऊ शकतो, असे इराणने म्हटले आहे. तसेच अमेरिका, इस्रायल आणि त्यांच्या सहयोगी देशांकडे एक थेंबही तेल जाऊ देणार नाही, असा इशाराही देण्यात आला आहे. या देशांकडे जाणारे जहाज किंवा टँकर इराणचे लक्ष्य ठरू शकतात, असेही स्पष्ट करण्यात आले.या संघर्षामागे अण्वस्त्र कार्यक्रम आणि क्षेपणास्त्र क्षमतांबाबतचा वाद असल्याचे सांगितले जात आहे. इस्रायलने यापूर्वी अनेकदा इराणला अण्वस्त्र कार्यक्रम थांबवण्याचा इशारा दिला होता. मात्र इराणने हा कार्यक्रम सुरूच ठेवल्याचा आरोप करत इस्रायल आणि अमेरिकेने इराणची राजधानी तेहरान येथे हल्ले केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे संपूर्ण मध्यपूर्वेत पुन्हा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या युद्धाचे पडसाद भारतातही उमटू लागले आहेत. इंधनाबरोबरच बाटलीबंद पाण्याच्या दरांवरही त्याचा परिणाम दिसू लागला आहे. पाण्याच्या बाटल्या तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल मोठ्या प्रमाणात परदेशातून येतो. युद्धामुळे या मालाच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण झाल्याने पाण्याच्या बाटल्यांच्या किमती वाढू लागल्या आहेत. सध्या वीस रुपयांची बाटली तीस ते चाळीस रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Powered By Sangraha 9.0