तिकीट काळाबाजार प्रकरणी गोंदियातील एक आरोपी ताब्यात

12 Mar 2026 12:00:15
गोंदिया,
ticket black marketing case रेल्वे आरक्षित तिकीटांच्या अवैध व्यापाराविरोधात रेल्वे सुरक्षा बलाने (आरपीएफ) ६ ते ९ मार्च या कालावधीत मोठी कारवाई करत नागपूर विभागात चार दिवसांत ७ तिकीट दलालांना अटक केली आहे. याप्रकरणी आरपीएफच्या पथकाने गोंदिया येथील एका तिकीट दलालाला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून ७५ हजार २९९ रुपये किमतीचे १५ तत्काळ व प्रीमियम तत्काळ आरक्षित ई-तिकीट जप्त केले आहे. अजय कावळे, रा. गोंदिया असे त्या तिकीट दलालाचे नाव आहे. पथकाने त्याच्याजवळील मोबाईल फोनही जप्त केला आहे.
 

तिकीट  
 
 
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे बिलासपूरचे महानिरीक्षक तथा प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्त मुन्नवर खुर्शीद यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नागपूर मंडळाचे मंडल सुरक्षा आयुक्त दीप चंद्र आर्य यांच्या नेतृत्वात ‘ऑपरेशन उपलब्ध’ अंतर्गत विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने ६ ते ९ मार्च २०२६ दरम्यान नागपूर मंडळातील विविध ठिकाणी तपास करण्यात आला. या तपासादरम्यान काही व्यक्ती वैयक्तिक आयडीचा वापर करून आरक्षित ई-तिकीट तयार करून जादा दराने विक्री करत असल्याचे आढळून आले. तपासादरम्यान भोमा, निवारी, महाराजपूर, नवेगाव रेल्वे, राजनांदगाव, लामटा (बालाघाट) आणि गोंदिया येथे वेगवेगळ्या कारवाया करण्यात आल्या. या कारवाईत अनेक जुनी, लाईव्ह तसेच तत्काळ आरक्षित ई-तिकीट जप्त करण्यात आली असून त्यांची किंमत लाखो रुपयांच्या घरात आहे. मागील चार दिवसात रेल्वे सुरक्षा बलने तिकीट काळाबाजार प्रकरणी सात दलालांना अटक केली आहे.ticket black marketing case यामध्ये गोंदिया येथील अजय कावळे याचा समावेश असून त्याच्या मोबाईल फोन जप्त करून तपासणी केली असता त्यामध्ये १५ तत्काळ व प्रीमियम तत्काळ आरक्षित ई-तिकीट आढळून आली. या तिकीटांची एकूण किमत ७५, २९९ इतकी आहे. दरम्यान, सर्व सातही ठिकाणी करण्यात आलेल्या वेगवेगळ्या कारवाईत दलालांकडून तयार केलेले मोठ्या प्रमाणात ई-तिकीट, मोबाईल फोन, संगणक व लॅपटॉप जप्त करण्यात आले असून संबंधितांविरुद्ध रेल्वे कायद्याच्या कलम १४३ अंतर्गत गुन्हे नोंदवून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
मोहीम यापुढेही सुरू राहणार...
नागपूर मंडळाकडून रेल्वे तिकीटांच्या काळाबाजारावर आळा घालण्यासाठी अशी मोहीम पुढेही सातत्याने सुरू ठेवण्यात येणार असून रेल्वे तिकीटांचा काळाबाजार किंवा अवैध विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यास त्वरित जवळच्या आरपीएफ स्टेशन किंवा रेल्वे हेल्पलाईन क्रमांकांवर तक्रार करावी, असे आवाहन रेल्वे सुरक्षा बल तर्फे प्रवाशांना करण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0