वार्षिक परीक्षांचा निर्णय शिक्षण संचालनालयाकडे

    दिनांक :12-Mar-2026
Total Views |
शाळांना अधिकार मिळण्याची शक्यता
अमरावती, 
Annual Examinations मार्चच्या पहिल्या दहा दिवसांत विदर्भात आलेली उष्णतेची लाट आत्ताच विद्यार्थ्यांना घाम फोडत असून त्यातच एससीईआरटीने जाहीर केलेल्या पॅट परीक्षांच्या तारखांमुळे विद्यार्थ्यांची होरपळ होण्याची शक्यता आहे. राज्यातील इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठीची संकलित मूल्यमापन चाचणी-२ (पॅट) यंदा ११, १५ आणि २२ एप्रिलला होणार आहे. मात्र यंदा केवळ पॅट चाचणीसाठीच राज्यस्तरीय वेळापत्रक देण्यात आले असून इतर विषयांच्या वार्षिक परीक्षांचा निर्णय प्राथमिक व माध्यमिक संचालनालयांवर सोपवण्यात आला आहे. त्यामुळे या परीक्षा घेण्याचे स्वातंत्र्य यंदा शाळांना पुन्हा मिळण्याची शक्यता आहे.
 

exsdksa;dk
 
एससीईआरटीच्या सूचनेनुसार पॅट चाचणी ११, १५ आणि २२ एप्रिल रोजी तीन टप्प्यांत होणार आहे. राज्यातील सर्व शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच अनुदानित शाळांमधील इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रथम भाषा, गणित आणि तृतीय भाषा (इंग्रजी) या तीन विषयांची ही चाचणी घेतली जाणार आहे. या वेळापत्रकात केवळ या तीन विषयांचा समावेश करण्यात आला असून इतर विषयांच्या चाचण्या व परीक्षा शाळास्तरावर घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच इयत्ता पाचवी व आठवीच्या वार्षिक परीक्षांबाबतचा निर्णय प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संचालनालयाच्या स्तरावरून स्वतंत्रपणे जाहीर केला जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे राज्यभर एकच केंद्रीकृत वेळापत्रक लागू न ठेवता शाळांना स्थानिक परिस्थितीनुसार परीक्षेचे नियोजन करता येणार आहे.
 
 
Annual Examinations  मुख्याध्यापकांनी यापूर्वी केलेल्या मागणीचा काही प्रमाणात सकारात्मक विचार झाल्याचे शिक्षण क्षेत्रातील प्रतिनिधींचे मत आहे. गेल्या वर्षी परीक्षा २५ एप्रिलपर्यंत चालल्या होत्या. यंदा त्या २२ एप्रिलपर्यंत मर्यादित राहणार आहेत. तसेच संपूर्ण राज्याला एकच वेळापत्रक देण्याऐवजी फक्त भाषा, इंग्रजी आणि गणित या तीन विषयांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार इतर विषयांच्या परीक्षा शाळा स्तरावर घेणे अधिक सोयीचे ठरेल, असे म. रा. प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य प्रसिद्धी प्रमुख राजेश सावरकर यांनी सांगितले.
 
 
Annual Examinations दरम्यान, पॅट चाचणीचे वेळापत्रक जाहीर करताना तिसर्‍या पेपरची तारीख २२ एप्रिल ठेवण्यात आल्याबाबत शिक्षक संघटनांनी आक्षेप नोंदवला आहे. पॅटचा शेवटचा पेपर २२ एप्रिल ऐवजी १५ एप्रिललाच घ्यावा, २२ एप्रिलनंतर निकाल तयार करण्यासाठी शिक्षकांना अत्यंत कमी वेळ मिळतो, अनेक शाळांना २ मेपासून उन्हाळी सुट्टी लागते. त्यामुळे केवळ काही दिवसांत उत्तरपत्रिका तपासणे, गुणनोंद करणे आणि निकालपत्रके तयार करणे ही मोठी कसरत ठरणार आहे’, असे शिक्षक समितीचे सरचिटणीस शैलेंद्र दहातोंडे यांनी मत नोंदविले.