पुणे,
Baramati assembly बारामती विधानसभा मतदारसंघातील आगामी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. १ जानेवारी २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित विशेष संक्षिप्त पुनरीक्षणानंतर १० मार्च २०२६ रोजी ही यादी जाहीर करण्यात आली आहे. अंतिम यादीनुसार मतदारसंघातील एकूण मतदारांची संख्या ३,८३,७६७ इतकी झाली आहे, ज्यामध्ये पुरुष मतदार १,९३,४९६, महिला मतदार १,९०,२७१ तर इतर मतदार २४ आहेत.
भारत निवडणूक आयोगाने ६ फेब्रुवारी २०२६ रोजी बारामती मतदारसंघासाठी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार ९ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. या यादीवर नागरिकांनी ९ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत दावे व हरकती नोंदवू शकले. प्राप्त अर्जांची छाननी करून आवश्यक सुधारणा केल्यानंतर अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली.
तुलनेत पाहता, २० ऑक्टोबर २०२४ Baramati assembly रोजी प्रकाशित झालेल्या मतदार यादीत एकूण मतदारसंख्या ३,६०,६०८ होती. त्यानंतर ९ फेब्रुवारी २०२६ रोजी जाहीर झालेल्या प्रारूप यादीत मतदारसंख्या ३,८८,३७१ इतकी नोंदवली गेली होती, तर अंतिम यादीत थोडीशी बदल झाल्याचे दिसून येते.उपजिल्हाधिकारी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर यांनी सांगितले की अंतिम मतदार यादी सर्व नागरिक व राजकीय पक्षांसाठी उपलब्ध करून दिली आहे. यासंदर्भात लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५० मधील तरतुदीनुसार, कोणत्याही अपीलसाठी जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी, पुणे यांच्याकडे १५ दिवसांच्या आत अर्ज करता येईल.बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये आगामी पोटनिवडणूक राजकीय दृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे, त्यामुळे अंतिम मतदार यादीत नोंदणी केलेल्या प्रत्येक मतदाराची संख्या व घटक पक्षांच्या रणनीतींवर याचा मोठा परिणाम होणार आहे.