बिहारची समीकरणे बदलणार

    दिनांक :12-Mar-2026
Total Views |
दिल्ली वार्तापत्र
bihars equations राज्यसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करीत बिहारचे मुख्यमंत्री आणि जदयुचे सर्वेसर्वा नितीशकुमार यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवली. कोणाच्या ध्यानीमनी नसताना बिहारचे मुख्यमंत्रिपद सोडण्याचा आणि पुन्हा एकदा राष्ट्रीय राजकारणात जाण्याच्या नितीशकुमार यांच्या अनपेक्षित निर्णयामुळे सर्वांना धक्का बसणे स्वाभाविक होते. या निर्णयाचे बिहारच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होणार असून बिहारचे राजकीय चित्र येत्या काळात बदलणार आहे.
 
 

नितीश कुमार 
 
 
बिहारचे मुख्यमंत्रिपद सोेडण्याचा आणि राज्यसभेत जाण्याचा निर्णय नितीशकुमार यांनी घाईगर्दीत नाही तर अतिशय विचारपूर्वक घेतला आहे. या निर्णयाचा आपल्या घरावर आणि पक्षावर कोणता परिणाम होईल, याचा पूर्ण विचार करून नितीशकुमार यांनी अतिशय शांतपणे हा निर्णय घेतला आहे. एकदा मिळालेले मुख्यमंत्रिपद सोडायची कोणाची तयारी नसते. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी तर तुरुंगात सहा महिने जावे लागल्यानंतरही मुख्यमंत्रिपद सोडले नव्हते. मुख्यमंत्रिपदाचा बाडबिस्तर घेऊन तुरुंगात गेलेले केजरीवाल हे बहुधा देशातील पहिले मुख्यमंत्री असावे.
नितीशकुमार जवळपास 20 वर्षांपासून बिहारचे मुख्यमंत्रिपद सांभाळत आहेत. मुख्यमंत्रिपदाची सर्वाधिक म्हणजे 10 वेळा शपथ घेण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. 2005 पासून बिहारचे राजकारण नितीशकुमार यांच्याभोवती फिरते आहे. राज्यात कोणत्याही आघाडीचे सरकार आले तरी मुख्यमंत्री नितीशकुमारच असतात. गेल्या 20 वर्षांपासून नितीशकुमारांना वगळून बिहारच्या राजकारणाचा विचार करता येत नव्हता. राज्यात भाजपा आणि जदयु आघाडीचे सरकार असले तरी मुख्यमंत्री नितीशकुमार असतात तसेच राजद, काँग्रेस आणि जदयु आघाडीचे सरकार आले तरी मुख्यमंत्रिपद नितीशकुमार यांच्याकडेच असते. अनेक वेळा नितीशकुमार यांनी भाजपाची साथ सोडत राजदचा कंदील हातात पकडला तर अनेक वेळा कंदिलाची वात विझवत कमळ हातात घेतले. पण नितीशकुमार यांच्या व्यक्तिगत प्रतिमेवर त्यांच्या या कोलांटउडीच्या राजकारणाचा फारसा परिणाम झाला नाही, त्यांची प्रतिमा डागाळली नाही, आयाराम गयाराम म्हणून त्यांची टिंगलटवाळी झाली नाही. अनेक वेळा तर समोरच्या पक्षापेक्षा नितीशकुमार यांच्या पक्षाचे कमी आमदार असतानाही मुख्यमंत्रिपद नितीशकुमार यांना मिळाले. दुसèया शब्दात सांगायचे तर त्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद ठेवणे ही बिहारमधील राजकीय पक्षांची अपरिहार्यता होती.
सामान्यपणे कोणताही नेता विधानसभेची निवडणूक जिंकत मुख्यमंत्री होत असतो. पण विधानसभेत निवडून येत नितीशकुमार कधीच बिहारचे मुख्यमंत्री झाले नाहीत. एक अपवाद वगळता नितीशकुमार यांनी कधीच विधानसभेची निवडणूक लढवली नाही. विधान परिषदेचे सदस्य म्हणूनच त्यांनी जवळपास 20 वर्षे मुख्यमंत्रिपद सांभाळले, हाही एकप्रकारचा विक्रम म्हटला पाहिजे. आपण विधानसभेची निवडणूक का लढत नाही, याचे कारण त्यांनी कधीच सांगितले नाही. बिहारच्या राजकारणात नितीशकुमार यांची लोकप्रियता चांगली होती, तरीही त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवण्याची हिंमत केली नाही.
 
नितीशकुमार यांना बाजूला ठेवून वा वगळून बिहारच्या राजकारणाचा विचारही कोणाला करता येत नव्हता. बिहारच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आतापर्यंत तरी नितीशकुमारच होते. प्रदीर्घ काळ बिहारच्या राजकारणात असतानाही नितीशकुमार यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही तसेच घराणेशाहीच्या राजकारणाचा डाग त्यांनी आपल्या अंगाला लागू दिला नाही. ही त्यांची जमेची बाजू म्हणावी लागेल. त्यांचे प्रतिस्पर्धी नेते लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबांतील अर्धा डझन सदस्य राजकारणात असताना नितीशकुमार यांनी आपल्या एकुलत्या एक मुलाला आतापर्यंत राजकारणात येऊ दिले नाही.
 
बिहारच्या राजकारणात येण्यापूर्वी नितीशकुमार राष्ट्रीय राजकारणात होते.bihars equations अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी रेल्वेमंत्रिपद भूषविले होते. त्यामुळे त्यांच्यासाठी राष्ट्रीय राजकारणही काही नव्हाळ्याची गोष्ट नाही. नितीशकुमार यांना पंतप्रधानपदाची स्वप्ने पडलीच नाहीत असे नाही. 2014 च्या आधी विरोधी पक्षांची मोट बांधण्याचा अयशस्वी प्रयत्न त्यांनी करून पाहिला. विरोधी आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आपण होऊ शकत नाही, हे लक्षात आल्यानंतर त्यांनी हा नाद सोडून दिला आणि भाजपा तसेच नरेंद्र मोदींशी जुळवून घेतले. त्याचा त्यांना नंतरच्या राजकारणात फायदाही झाला.
राजकारणात योग्यवेळी योग्य निर्णय घेण्याची कला बिहारमधील नेत्यांना साधली आहे, असे म्हणावे लागेल. रामविलास पासवान यांच्यानंतर नितीशकुमार यात वाकबगार झाले होते, असे म्हणायला हरकत नाही. केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचे नेते रामदास आठवलेही यात बसतात.
 
विधिमंडळाच्या विधानसभा तसेच विधानपरिषद या दोन्ही सभागृहाचे सदस्यपद आपण भूषविले, अनेक कार्यकाळ लोकसभेचे सदस्यही होतो; मात्र आतापर्यंत कधीच राज्यसभेचे सदस्य नव्हतो. ती आपली अपूर्ण इच्छा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्रिपद सोडत राज्यसभेत आपण जात असल्याचे नितीशकुमार सांगत असले, तरी त्यावर विश्वास बसत नाही. बिहारच्या राजकारणातून बाहेर पडण्याची घोषणा नितीशकुमार यांनी केल्यानंतर त्यांचा मुलगा निशांतकुमार याने औपचारिकपणे जदयुत प्रवेश केला. याचा अर्थ निशांतकुमार अधिकृतपणे नितीशकुमार यांचे राजकीय उत्तराधिकारी झाले आहेत. दुसèया शब्दात सांगायचे तर जदयुची धुरा निशांतकुमारकडे सोपवत नितीशकुमार यांनी राज्यसभेचा वानप्रस्थाश्रम स्वीकारला, असे म्हणायला हरकत नाही. बिहारमध्ये विशेषत: जदयुत नितीशकुमार यांचे युग संपत निशांतकुमार यांचे पर्व सुरू होत आहे.
 
नितीशकुमार राज्यसभेत जाण्याच्या निर्णयाचा सर्वांत मोठा फायदा भाजपाला होणार आहे. उत्तर भारतातील बिहार हे एकमेव असे राज्य होते, ज्याठिकाणी भाजपाचा मुख्यमंत्री कधी झाला नाही. भाजपाला बिहारमध्ये उपमुख्यमंत्रिपदावरच समाधान मानावे लागत होते. नितीशकुमार यांनी बिहार सोडल्यामुळे राज्यात भाजपाचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे. एप्रिल महिन्यात नितीशकुमार यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यात भाजपाचा मुख्यमंत्री शपथ घेणार आहे. भाजपाने मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार अद्याप जाहीर केला नसला, तरी जो कोणी बिहारचा मुख्यमंत्री होईल, त्याच्या मंत्रिमंडळात निशांतकुमार यांचा उपमुख्यमंत्री म्हणून समावेश होऊ शकतो.
 
आतापर्यंत जदयु नेत्याच्या म्हणजे नितीशकुमार यांच्या मंत्रिमंडळात भाजपाचा उपमुख्यमंत्री राहात होता; आता भाजपा नेत्याच्या मंत्रिमंडळात जदयुचा नेता म्हणजे नितीशकुमार यांचा मुलगा निशांतकुमार उपमुख्यमंत्री होणार आहे. आपल्या मुलाला म्हणजे निशांतकुमारला राजकारणात आणण्यासाठी आणि प्रस्थापित करण्यासाठी नितीशकुमार यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत बिहार सोडण्याचा आणि राज्यसभेत जाण्याचा निर्णय घेतला, असे म्हणायला हरकत नाही. नितीशकुमार यांच्या या दूरदर्शी राजकीय निर्णयाचा राज्यातील भाजपा, जदयु आणि राजदवर दूरगामी परिणाम होणार आहे. राज्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत, यात शंका नाही.
 
श्यामकांत जहागीरदार
9881717817