मुंबई,
Cylinder booking period extended इराण–इस्रायलमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर त्याचे परिणाम आता महाराष्ट्रातील सर्वसामान्यांच्या दैनंदिन आयुष्यावर दिसू लागले आहेत. घरगुती गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होताच अनेक ठिकाणी नागरिकांनी गॅस मिळवण्यासाठी एजन्सीसमोर गर्दी करायला सुरुवात केली आहे. त्यातच घरगुती गॅस सिलिंडरच्या नोंदणीसंबंधी शासनाने महत्त्वाचा बदल केला आहे. नव्या नियमानुसार आता दोन सिलिंडर घेण्यामधील कालावधी वाढवण्यात आला असून ग्रामीण भागात ४५ दिवसांनंतर तर शहरांमध्ये ४० दिवसांनंतरच नवीन सिलिंडरची नोंदणी करता येणार आहे. यापूर्वी हा कालावधी २५ दिवसांचा होता. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

रत्नागिरीसह राज्यातील अनेक भागांत गॅस मिळवण्यासाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा दिसत आहेत. सध्या सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधनाचा तुटवडा निर्माण होऊ शकतो, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. त्यामुळे अनेक जण आगाऊ तयारी म्हणून सिलिंडर घेण्यासाठी गॅस एजन्सीकडे धाव घेत आहेत. काही ठिकाणी दूरध्वनी किंवा संदेशाद्वारे नोंदणी होत नसल्यामुळे नागरिकांना थेट एजन्सीवर जावे लागत आहे. त्यामुळे एजन्सीसमोर मोठी गर्दी होत असून नागरिक तासन्तास रांगेत उभे राहत असल्याचे चित्र दिसत आहे.
दरम्यान, घरगुती गॅसचा गैरवापर रोखण्यासाठी प्रशासनानेही कारवाई सुरू केली आहे. नंदुरबार जिल्ह्यात वाहनांमध्ये घरगुती गॅसचा बेकायदेशीर वापर करणाऱ्यांविरोधात प्रादेशिक परिवहन विभागाने विशेष तपासणी मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान तब्बल ८० वाहने जप्त करण्यात आली. तपासणीदरम्यान अनेक वाहनांमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा वापर होत असल्याचे आढळून आले. संबंधित वाहनधारकांकडून सिलिंडर काढून घेण्याचे आदेश देण्यात आले असून भविष्यात असा गैरवापर आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. एकूणच युद्धजन्य परिस्थिती आणि नव्या नियमांमुळे घरगुती गॅसच्या वितरणावर परिणाम होत असून सामान्य नागरिकांना त्याचा मोठा फटका बसत असल्याचे चित्र सध्या राज्यभर दिसून येत आहे.