घरगुती गॅसचा वापर करणाऱ्या व्यवसायिकांवर दक्षता पथकाची धाड

    दिनांक :12-Mar-2026
Total Views |
- एकाला अटक ; १५ घरगुती गॅस सिलिंडर जप्त
 
गोंदिया, 
Domestic gas cylinder seized व्यावसायिक ठिकाणी घरगुती गॅसचा वापर करणाऱ्या व्यवसायिकांवर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दक्षता व फिरते पथकाने धाडसत्र राबवून एका जणावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे तर विविध ठिकाणी करण्यात आलेल्या कारवाईत १५ घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले आहे.
 
 
Domestic gas
 
Domestic gas cylinder seized  सद्यस्थितीत युध्द परिस्थिती लक्षात घेता, घरगुती गॅसचा गैरवापर वाढण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने अवैध वापर रोखण्याकरीता जिल्हा स्तरावर दक्षता/फिरते पथक स्थापन करून जिल्ह्यातील आठही तालुक्यात व्यावसायीक ठिकाणी म्हणजे कॅटरींग, हॉटेल्स, मंगल कार्यालय, बेकरी, दवाखाने इत्यादी ठिकाणी धाडसत्र सुरु करण्यात आले आहे. या अनुषंगाने जिल्ह्यातील आठही तालुक्यातील २१ गॅस एजन्सी अंतर्गत ६ ठिकाणी छापामार कारवाई करण्यात आली. यात गोंदिया तालुक्यातील १ व तिरोडा तालुक्यातील ५ अशा एकूण ६ व्यावसायीक ठिकाणी फिरते पथकाने धाडी टाकल्या असता गोंदिया तालुक्यातील ७ व तिरोडा तालुक्यातील ८ असे एकूण १५ घरगुती गॅस जप्त करण्यात आले. यामध्ये तिरोडा तालुक्यात एका ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला असून एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

सद्यस्थितीत युध्द परिस्थिती लक्षात घेता इंधनाबाबत तुटवडा निर्माण होण्याची तसेच गॅस इंधनाचे दरवाढीची, घरगुती गॅसचा गैरवापर वाढण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने घरगुती गॅसचे गैरवापर होत असल्याचे आढळल्यास कारवाई करण्यात येईल.
- प्रजित नायर, जिल्हाधिकारी, गोंदिया