अर्थविशेष. .
हितेश पारसे
fd senior citizen निवृत्त नागरिक आणि त्यांच्या कुटुंबांनी समजून घ्याव्या, अशा महत्त्वाच्या कर बाबींबद्दल भारतातील अनेक कुटुंबांत सर्वसामान्य पद्धत दिसून येते. मुदत ठेव (एफडी) आई-वडिलांच्या म्हणजे ज्येष्ठ नागरिकांच्या नावावर केली जाते, परंतु प्रत्यक्षात त्या रकमेचा स्रोत मुलगा किंवा मुलगी असते. काही वेळा एफडी संयुक्त नावाने केली जाते. बाहेरून पाहता ही केवळ कौटुंबिक सोय वाटते, परंतु करदृष्ट्या हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रश्न असा निर्माण होतो की, एफडीवरील व्याजावर आयकर नेमका कोण भरतो?
कराचा मूलभूत सिद्धांत - ‘पैसा कोणाचा?’
आयकर कायद्यानुसार कराची जबाबदारी एफडी कोणाच्या नावावर आहे, यावर ठरत नाही; तर पैसा प्रत्यक्षात कोणाचा आहे, यावर ठरते. जर मुलाने स्वतःचा पैसा पालकांच्या नावावर एफडीमध्ये गुंतविला असेल, तर त्या एफडीवरील व्याज हे मुलाच्या उत्पन्नात धरले जाईल. यालाच उत्पन्नाचे एकत्रीकरण म्हणतात. म्हणजे, एखाद्या व्यक्तीने आपला पैसा दुसèयाच्या नावावर गुंतवला, तरी त्यातून मिळणारे उत्पन्न पैशाच्या मूळ मालकाकडेच करासाठी जोडले जाते. उदाहरणार्थ, मुलाने 10 लाख रुपये आईच्या नावाने एफडीमध्ये ठेवले आणि वार्षिक 80 हजार रुपये व्याज मिळाले, तर त्या व्याजावर कर मुलालाच भरावा लागेल, आईला नाही.
प्रथम धारक आणि दुसरा धारक करासाठी कोण महत्त्वाचा?
बँकिंग प्रणालीत प्रथम धारक हा मुख्य धारक मानला जातो आणि टीडीएस (स्रोतावर कर कापला) साधारणपणे त्याच्याच पॅनवर कापला जातो. पण आयकरच्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा वेगळा आहे रक्कम कोणी गुंतवली?
संयुक्त एफडी असल्यास
- पैसा वडिलांचा असेल, तर व्याजावर कर वडिलांच्या उत्पन्नात जाईल.
- पैसा मुलाचा असेल, तर क्लबिंग तरतूद लागू होऊन कर मुलाच्या उत्पन्नात जाईल. म्हणूनच टीडीएस कोणाच्या पॅनवर कापला गेला, यावर अंतिम कर जबाबदारी ठरत नाही.
नामनिर्देशित म्हणजे मालक नाही
अनेक ज्येष्ठ नागरिक असा समज करून घेतात की, मुलगा किंवा मुलगी नामनिर्देशित असल्यास त्यांनाच त्या एफडीची मालकी मिळते. प्रत्यक्षात नामनिर्देशित हा केवळ रक्कम स्वीकारणारा प्रतिनिधी असतो. कायदेशीर मालकी वारसदारांकडे जाते. त्यामुळे नामनिर्देशित असल्यामुळे कर जबाबदारीत कोणताही बदल होत नाही.
ज्येष्ठ नागरिकासाठी विशेष बाब - 80 टीटीबी : आयकर कायद्यानुसार ज्येष्ठ नागरिकाला बँक व्याजावर 50,000 पर्यंत सूट (कलम 80 टीटीबी) मिळते; परंतु जर एफडीचा पैसा प्रत्यक्षात मुलाचा असेल आणि क्लबिंग लागू होत असेल, तर 80 टीटीबीचा लाभ ज्येष्ठ नागरिकाला मिळणार नाही. त्या परिस्थितीत व्याज मुलाच्या उत्पन्नात धरले जाईल.
छाननी आणि एआयएस युगातील वास्तव : आज आयकर विभागाकडे एआयएस (वार्षिक माहिती विधान) बँकिंग डेटा आणि टीडीएस माहिती उपलब्ध असते. त्यामुळे एफडीवरील व्याज लपवणे किंवा चुकीच्या नावाने दाखवणे सहज लक्षात येऊ शकते. जर ज्येष्ठ नागरिकाकडे फारसे उत्पन्न नसताना मोठ्या एफडीवर व्याज दिसत असेल, तर विभागाकडून चौकशी होऊ शकते.
कुटुंबांनी काय काळजी घ्यावी?
1. पैसा कोणाचा आहे, हे स्पष्ट ठेवा. कागदोपत्री पुरावा आणि बँक ट्रेल ठेवणे महत्त्वाचे आहे.
2. गिफ्ट देत असल्यास गिफ्ट डीड तयार करा. मुलाने पालकांना भेट म्हणून रक्कम दिली असल्यास, योग्य गिफ्ट डीड केल्याने पुढील व्याजावर कर ज्येष्ठ नागरिकाच्या नावावर लागू होईल.
3. संयुक्त खाते केवळ सोयीसाठी असल्यास कर नियोजन करा. केवळ व्यवहार सोपा व्हावा म्हणून नाव जोडले असल्यास, कर परिणाम समजून घ्या.
व्यवहारातील केस स्टडीज
केस स्टडी 1 - कर बचतीसाठी एफडी आईच्या नावावर
- नागपूरमधील एका कुटुंबात मुलगा आयटी क्षेत्रात नोकरी करतो आणि त्याचे वार्षिक उत्पन्न 15 लाख रुपये आहे. त्याने 20 लाखांची एफडी आपल्या आईच्या नावावर ठेवली, कारण आई ज्येष्ठ नागरिक आहे आणि तिचे उत्पन्न फारसे नाही.
- एफडीवर वर्षाला 1.6 लाख व्याज मिळते. कुटुंबाचा विचार असा होता: ‘आईचा कर स्लॅब कमी आहे, त्यामुळे कर कमी लागेल.’ परंतु आयकर कायद्यानुसार पैसा मुलाचा असल्यामुळे 1.6 लाख रुपये व्याज मुलाच्या उत्पन्नात जोडले जाईल.
केस स्टडी 2 - भेट दिल्यास कर परिणाम बदलतो
- एका व्यापाऱ्याने आपल्या वडिलांना 15 लाख रुपय भेट म्हणून दिले आणि त्याचे गिफ्ट डीड तयार केले. त्या पैशातून वडिलांनी एफडी केली. एफडीवरील व्याज 1.2 रुपये लाख आहे. या परिस्थितीत पैसा वडिलांचा मानला जातो. व्याजावर कर वडिलांच्या नावावर लागेल तसेच वडील ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे कलम टीटीबी अंतर्गत 50,000 रुपये वजावट मिळू शकते.
केस स्टडी 3 - संयुक्त एफडी पण पैसा मुलाचा
- एका बँकेत एफडी खालीलप्रमाणे केली. प्रथम धारक - वडील, दुसरा धारक - मुलगा. एफडी रक्कम 12 लाख रुपये. मुलाच्या बँकेने टीडीएस वडिलांच्या पॅनवर कापला. परंतु आयकराच्या दृष्टीने पैसा मुलाचा असल्यामुळे व्याज मुलाच्या उत्पन्नात जोडले जाईल. मुलाने टीडीएस क्रेडिट वडिलांकडून फॉर्म 26एएस सामंजस्य करून घ्यावी लागते.
नामनिर्देशित म्हणजे मालक नाही
- एफडी करताना अनेक लोक नामनिर्देशित ठेवतात. परंतु अनेक ज्येष्ठ नागरिक असा समज करतात की, नामनिर्देशित म्हणजे त्या व्यक्तीची मालकी. कायद्याने हे चुकीचे आहे. नामनिर्देशित हा केवळ रक्कम स्वीकारणारा प्रतिनिधी असतो, अंतिम मालकी कायदेशीर वारसदारांकडे जाते. म्हणून नामनिर्देशित असल्यामुळे कर जबाबदारी बदलत नाही.
अंतिम विचार
एफडी कोणाच्या नावावर आहे, हे महत्त्वाचे नाही; पैसा कोणाचा आहे, हे महत्त्वाचे आहे. क्लबिंग तरतुदीमुळे अनेक कुटुंब अनावधानाने कर चुकांची जोखीम घेतात.fd senior citizen निवृत्तीनंतर शांत आयुष्य जगताना कर विषयक अडचणी टाळण्यासाठी योग्य सल्ला, योग्य दस्तऐवजीकरण आणि पारदर्शक व्यवहार आवश्यक आहेत. कर नियोजन म्हणजे फक्त कर बचत नव्हे ती कुटुंबातील आर्थिक सुरक्षितता आणि भविष्यातील वाद टाळण्याची गुरुकिल्ली आहे.
हितेश पारसे