इंदूर,
Gambling at IAS officer's farmhouse इंदूर जिल्ह्यातील एका महिला आयएएस अधिकाऱ्याच्या फार्महाऊसवर पोलिसांनी छापा टाकून १८ जणांना अटक केली आहे. या लोकांवर फार्महाऊसमध्ये बेकायदेशीर जुगार खेळल्याचा आरोप आहे. तसेच, प्रकरणी तीन पोलिस अधिकाऱ्यांनाही निलंबित करण्यात आले आहे.इंदूर शहरापासून सुमारे पन्नास किलोमीटर अंतरावर अवलीपुरा गावातील या फार्महाऊसवर काही लोक जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मंगळवार आणि बुधवारी मध्यरात्री पोलिसांनी फार्महाऊसवर छापा टाकला, तेव्हा १८ जण जुगार करत असताना पकडले गेले, तर सहा जण पळून गेले.

अटक केलेल्या व्यक्तीकडून पोलिसांनी ३० मोबाईल, पत्ते आणि १३.६८ लाख रुपये रोख जप्त केले. हे आरोपी राज्याच्या विविध भागातील रहिवासी आहेत. फार्महाऊसचा मुख्य दरवाजा बंद असूनही लोक आत जुगार खेळत होते. यावर बीएनएस आणि जुगार कायद्याच्या कलमानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मुख्य आरोपी जगदीश राठोड उर्फ कुबडा, फार्महाऊसचा केअरटेकर रणजीत चौधरी आणि इतर अनेक जण पळून गेले. फार्महाऊस आयएएस अधिकारी वंदना वैद्य आणि त्यांच्या कुटुंबाचे असून, वैद्य सध्या मध्य प्रदेश सरकारच्या वित्त विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर कार्यरत आहेत. अटकीनंतर त्यांनी पोलिसांना पत्र लिहून तक्रार केली की काही अज्ञात लोक बेकायदेशीरपणे त्यांच्या फार्महाऊसमध्ये घुसले असून, तेथे गुन्हेगारी कारवाया करत आहेत. त्यांनी या लोकांवर चोरीचा संशय असल्याचेही सांगितले आणि स्वतंत्र फौजदारी खटला दाखल करण्याची मागणी केली.