लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांमध्ये खानपानाच्या सेवांवर तात्पुरता परिणाम

    दिनांक :12-Mar-2026
Total Views |
आयआरसीटीसीने पर्यायी उपाययोजना करण्याचे दिले निर्देश
नागपूर,
IRCTC व्यावसायिक गॅस सिलिंडर उपलब्ध होण्यात विलंब होत असल्याने रेल्वे स्थानकांवरील फूड रिफ्रेशमेंट रूम तसेच खाद्यपदार्थ विक्रेत्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही ठिकाणी गॅस सिलिंडरची टंचाई जाणवत असून यामुळे रेल्वे स्थानकांवरील (बेस किचन) अन्न तयार करण्यास अडचणी निर्माण होत आहे. त्यामुळे काही लांब पल्ल्याच्या गाड्यांतील शिजवलेल्या खानपानाच्या सेवांवर तात्पुरता परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
 
 
railway-one

मायक्रोवेव्ह ओव्हनचा वापर
रेल्वेतील खानपान सेवा सुरळीत ठेवण्यासाठी आयआरसीटीसीने पर्यायी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. कॅटरिंग ऑपरेटर व स्टॉल चालकांना मायक्रोवेव्ह ओव्हन आणि इंडक्शन विद्युत उपकरणांचा वापर वाढवण्यास सांगण्यात आले आहे. तसेच प्रवाशांच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी तयार खाद्यपदार्थांचा (रेडी-टू-इंट) साठा ठेवण्यावरही जोर देण्यात येत आहे.
बेस किचनमध्येच गॅसचा तुटवडा
सुरक्षेच्या कारणास्तव रेल्वेत एलपीजी सिलिंडर ठेवले जात नाही. साधारणपणे बेस किचनमध्ये आधी तयार केलेले अन्न पॅन्ट्री कारमध्ये गरम करून प्रवाशांना दिले जाते. मात्र बेस गॅसचा तुटवडा जाणवत असल्याने अन्न तयार करण्यावर मर्यादा येऊ लागल्या आहेत. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात नागपूर आणि बल्लारशहा येथे बेस किचन आहेत.

फूड प्लाझा व जन आहारवर परिणाम
IRCTC रेल्वेस्थानकांवरील फूड प्लाझा, रिफ्रेशमेंट रूम आणि जन आहार’ केंद्रांना त्यांच्या कामकाजात बदल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. एखाद्या युनिटमध्ये गॅसवर स्वयंपाक बंद करावा लागल्यास संबंधित विभागाला तातडीने कळवणे बंधनकारक करण्यात आले आहे. सध्याच्या घडीला गॅस टंचाईची समस्या जाणवलेली नाही. मात्र, संभाव्य स्थिती लक्षात घेता आगामी काळासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक अमन मित्तल यांनी दिली आहे.