मुंबई,
Isha Dey मराठी मनोरंजनसृष्टीतून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लोकप्रिय विनोदी कार्यक्रम महाराष्ट्राची हास्यजत्रामधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री इशा डे हिने गीतकार आणि लेखक अभिषेक खणकरसोबत पारंपरिक पद्धतीने विवाह केला आहे. कुटुंबीय आणि जवळच्या मित्रमंडळींच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात दोघांनी सात फेरे घेत आयुष्यभर एकमेकांची साथ देण्याची शपथ घेतली. त्यांच्या लग्नाची बातमी समोर येताच चाहत्यांसह मराठी कलाविश्वातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
इशाने काही दिवसांपूर्वीच तिच्या लग्नाआधीच्या विविध विधींचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली होती. त्यानंतर तिच्या मेहेंदी सोहळ्याचे फोटोही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. आता लग्नसोहळ्याचे फोटो समोर आल्यानंतर चाहत्यांमध्ये आणि मित्रपरिवारात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
अभिनेत्री वनिता खरात Isha Dey हिने तिच्या इन्स्टाग्राम खात्यावर इशा आणि अभिषेकच्या लग्नातील काही खास क्षणांचे फोटो शेअर केले. या छायाचित्रांमध्ये नवदांपत्य अत्यंत आनंदी आणि उत्साही दिसत आहे. लग्नासाठी इशाने लाल रंगाची पारंपरिक नऊवारी साडी नेसत सुंदर महाराष्ट्रीयन लूक साकारला होता. पारंपरिक दागिने आणि नथीमुळे तिच्या वेशभूषेला अधिक उठाव मिळाला. तर अभिषेकने मेहेंदी रंगाचा कुर्ता आणि धोतर परिधान करून पारंपरिक पेहरावात हजेरी लावली. एका फोटोमध्ये अभिषेक इशाच्या गळ्यात मंगळसूत्र घालताना दिसत असून तो क्षण विशेष ठरला आहे.वनिता खरातने इशाचा आणखी एक फोटो शेअर करत त्याला “नवराई माझी लाडाची” असे कॅप्शन दिले आहे. इशाच्या लग्नामुळे तिच्या मित्रमैत्रिणींमध्येही उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत असून सोशल मीडियावर चाहत्यांकडून नवदांपत्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.इशाचा पती अभिषेक खणकर हा मराठी मनोरंजनसृष्टीतील परिचित गीतकार आणि लेखक म्हणून ओळखला जातो. त्याने लक्ष्मी निवास आणि खुलता कळी खुलेना या मालिकांची शीर्षकगीते लिहिली आहेत. याशिवाय अनेक मराठी चित्रपटांसाठीही त्याने गीते लिहिली असून त्याच्या कामासाठी त्याला विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.दरम्यान, इशा डेच्या अभिनय कारकिर्दीकडे पाहिल्यास महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमामुळे तिला मोठी लोकप्रियता मिळाली आणि ती प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली. त्याशिवाय तिने अय्या आणि गुलकंद या चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. विशेषतः ‘गुलकंद’मधील तिच्या भूमिकेसाठी तिला अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले. नुकतेच झी मराठी चित्र गौरव २०२६ सोहळ्यात तिला ‘सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्री’ हा पुरस्कार मिळाला आहे.नव्या आयुष्याची सुरुवात करणाऱ्या इशा डे आणि अभिषेक खणकर या नवदांपत्याला चाहत्यांसह संपूर्ण मराठी कलाविश्वाकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत.