नागरी सेवा निकालात नवा गोंधळ; ११३ व्या क्रमांकावर दोन ‘शिखा’चा दावा

12 Mar 2026 10:15:40
नवी दिल्ली,
New confusion in civil service results संघ लोकसेवा आयोगाने नागरी सेवा परीक्षा २०२५ चा निकाल जाहीर केल्यानंतर काही क्रमांकांबाबत गोंधळ निर्माण झाल्याचे चित्र समोर येत आहे. यापूर्वी ३०१ व्या क्रमांकावर दोन उमेदवारांच्या नावाबाबत चर्चा सुरू होती. त्यानंतर आता ११३ व्या क्रमांकाबाबतही नवा वाद निर्माण झाला आहे.माहितीनुसार संघ लोकसेवा आयोगच्या निकालात ११३ व्या क्रमांकावर ‘शिखा’ नावाच्या उमेदवाराचा उल्लेख आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर बुलंदशहर येथील शिखाने हा क्रमांक मिळाल्याचा दावा केला आणि ही बातमी समजताच तिच्या कुटुंबीयांसह स्थानिकांनी मोठा आनंद व्यक्त केला. तिच्या यशाचा आनंद साजरा करत परिसरात अभिनंदनाचा वर्षावही झाला.
 
 
 
upsc
मात्र काही काळानंतर दिल्लीमध्ये राहणाऱ्या आणखी एका शिखाचे नावही पुढे आले. तिच्या मुलाखतीसाठी आलेले बोलावणे आणि क्रमांकाशी संबंधित कागदपत्रे समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाली. या कागदपत्रांच्या आधारे तिनेही ११३ वा क्रमांक मिळविल्याचा दावा केल्यामुळे प्रकरण आणखी चर्चेत आले आहे.दिल्लीतील ही शिखा सध्या हरियाणामध्ये गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही उमेदवारांच्या दाव्यांमुळे समाजमाध्यमांवर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत असून नेमका सत्य क्रमांक कोणाला मिळाला याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
 
 
या प्रकरणाबाबत अद्याप आयोगाकडून अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. त्यामुळे अंतिम निर्णयासाठी संघ लोकसेवा आयोगकडून स्पष्ट माहिती येण्याची प्रतीक्षा केली जात आहे. आयोगाने भूमिका स्पष्ट केल्यानंतरच ११३ वा क्रमांक नेमका कोणत्या उमेदवाराला मिळाला हे निश्चित होणार आहे.यापूर्वीही अशाच प्रकारचा गोंधळ ३०१ व्या क्रमांकाबाबत झाला होता. त्या वेळीही दोन उमेदवारांचे नाव आकांक्षा सिंह असे असल्याने चर्चा रंगली होती. त्यापैकी गाझीपूर येथील आकांक्षा सिंह हिला ३०१ वा क्रमांक मिळाल्याचे नंतर स्पष्ट झाले होते.
Powered By Sangraha 9.0